आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Corona's Entry In A Thousand Villages In Pune District; 'Catch The Virus Mission' Curbs The Growing Carnage

दिव्य मराठी विशेष:पुणे जिल्ह्यात हजार खेड्यांत कोरोनाची नाे एन्ट्री; ‘कॅच द व्हायरस मिशन’मुळे वाढत्या काेराेनावर अंकुश

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये सध्याच कोरोनाच्या प्रादुर्भावाची लक्षणीयरीत्या नाेंद कमी

पुणे शहर, शहरानजीकचा भाग, पिंपरी-चिंचवड परिसर सध्या कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट ठरत आहे. बाधितांच्या संख्येत दररोज उच्चांक नोंदवले जात असतानाच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चित्र कोरोना संसर्गाच्या संदर्भात काहीसे आशादायक आहे. जिल्ह्यातील सुमारे १४०० खेड्यांपैकी तब्बल हजारहून अधिक खेड्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. या भागातील मृत्युदरही सर्वात कमी (एक टक्क्यापेक्षाही कमी) आहे.

पुणे शहरात ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाचे ३९ हजारपेक्षा अधिक रुग्ण आहेत, तर पिंपरी-चिंचवड परिसरात ही संख्या दहा हजारांचा आकडा ओलांडून गेली आहे. या तुलनेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत संसर्गाचे प्रमाण अल्प आहे. जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात सुमारे ४० लाख लोकसंख्या आहे. तेथे कोरोना संसर्गाच्या फक्त २३०० रुग्णांची नोंद झाली आहे, तर मृत्यू संख्या ५२ आहे. याउलट पुणे शहरात आजपर्यंत कोरोनामुळे एक हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ही संख्या अडीचशेच्या घरात आहे. येथे ग्रामीण भागात जिथे कोरोनाचे रुग्ण सापडले तो भाग मुख्यत: शहरी हद्दीच्या लगतचा किंवा महामार्गाजवळचा आहे. पुण्या-मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांमुळे हा संसर्ग काही प्रमाणात पोहोचला आहे. या भागात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येकाला एक अर्ज भरून द्यावा लागतो. मी बाहेरून परत आल्यावर स्वत:च्याच घरात विलगीकरणात राहीन, कुठल्याही बाजाराच्या ठिकाणी, शेजारी अथवा नातेवाइकांकडे जाणार नाही, असे लिहून घेतले जाते. मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मास्कशिवाय जो सापडेल त्याला मोठा दंड केला जातो. शिरूर तालुक्यात सव्वातीन लाख, इंदापूर तालुक्यात १.६२ लाख दंड वसूल करण्यात आला आहे. दंडाचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सौम्य लक्षणे दर्शवणाऱ्यांना घरातच क्वॉरंटाइन केले जाते. पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल गन्सच्या साहाय्याने आशा वर्कर्स यासंदर्भात महत्त्वाचे योगदान देत आहे.

‘कॅच द व्हायरस मिशन’मुळे वाढत्या काेराेनावर अंकुश

‘कॅच द व्हायरस मिशन’ची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हा फरक दिसत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. हे अभियान उत्तम पद्धतीने राबवल्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार थांबवण्यात यश आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. पुणे जिल्ह्यात चौदाशेपेक्षा अधिक खेडी आहेत. त्यातील एक हजार खेडी कोरोनापासून मुक्त आहेत. तिथे आजवर कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.’ अभियानाची जाणीव जागृती, नियमावलींचे काटेकोर पालन, तपासण्या व यंत्रणांमधील समन्वय यामुळे कोरोनाविरोधातील लढाई ग्रामीण भागात प्रभावी ठरत आहे.

दाट वस्तीत प्रतिबंधित क्षेत्रे

कोरोना संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील दाट लोकवस्तीची ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यात हिंजवडी, वाघोली, चाकण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या परिसरात दाट लोकवस्ती तर आहेच, पण आयटी पार्कस, औद्योगिक महामंडळाची केंद्रे असल्याने विविध ठिकाणांहून लोक सतत येत-जात असतात. तिथे विशेष काळजी घेतली जात आहे.