आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
त्रिशूरमध्ये ३० जानेवारी २०२० रोजी देशात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. वुहान विद्यापीठात येथील एक विद्यार्थिनी शिकत होती. ती परतली तेव्हा तिला कोराेना झाला होता. या २१ वर्षीय विद्यार्थिनीवर तीन आठवडे उपचार चालले. दोन वेळा चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर गेल्या वर्षी २० फेब्रुवारीस तिला रुग्णालयातून सुटी मिळाली. सध्या चीनसाठी विमानसेवा बंद आहे. त्यामुळे ती ऑनलाइन शिकत आहे. आम्ही विद्यार्थिनीचे नाव प्रसिद्ध करू शकत नाही... वाचा तिची कहाणी तिच्याच शब्दांत...
तेव्हा धास्ती इतकी प्रचंड होती की, मी ज्या सरकारी रुग्णालयात भरती होते ते पूर्ण रिकामे झाले
मी वुहानमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत होते. तेथे एक रहस्यमय संसर्ग झाल्याची चर्चा सुरू झाली. कोरोनाचा उल्लेख नव्हता. भीतीमुळे मी २४ जानेवारी २०२० ला त्रिशूरला परतले. येथे पोहोचल्यावर कोरडा खोकला सुरू झाला. रुग्णालयात गेले. काही चाचण्या झाल्या. ३० जानेवारीला अहवाल आला. पण मला सांगितले नाही. मी एका सरकारी रुग्णालयात होते. त्या खोलीत एक टीव्ही होता. त्रिशूरमध्ये देशातील पहिला कोरोना रुग्ण आढळला अशा बातम्या ३० जानेवारीला संध्याकाळी सुरू झाल्या. या बातम्या माझ्याबाबतच आहेत याचा पत्ता मला नव्हता. पण माझ्या कुटुंबाला सांगितले होते. तेव्हा मला जाणवले की, रुग्णालयातील रुग्ण हळूहळू कमी होत आहेत. दोन दिवसांतच पूर्ण रुग्णालय रिकामे झाले. तेव्हा मला समजले की मीच ती रुग्ण आहे. तोपर्यंत माझी स्थिती खूप सुधारली होती. त्यामुळे भीती कमी होती. माझ्या संपर्कात आलेल्या १४ लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले. त्यात माझे वडीलही होते. मी दीर्घकाळानंतर कुटुंबात परतले होते. पण येथे कुटुंबातील लोकांना क्वॉरंटाइन केले होते. तीन आठवडे एकाच कक्षात राहिले. हा खूप कठीण काळ होता. समुपदेशक मला नियमित कॉल करत होते. त्यामुळे माझे मानसिक स्वास्थ्य चांगले राहिले. दिवस कसा तरी व्यतीत होत होता. रात्री झोप नव्हती. आता सर्व ठीक आहे. वुहानला केव्हा जाऊ शकेन हे माहीत नाही. शिक्षण सुरू ठेवायचे असल्याने ऑनलाइन क्लासेस घेत आहे. पण ते पुरेसे नाही. सरकारने आमच्यासारख्या ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या कॉलेजमध्ये शिक्षणाची व्यवस्था केली तर आमचे करिअर खराब होणार नाही.’
डॉक्टर म्हणाले- तेव्हा उपचार नव्हता, फक्त रुग्णाचा उत्साह वाढवत होतो
प्रारंभी आम्हाला थोडीही कल्पना नव्हती की आम्ही या विद्यार्थिनीवर उपचार करताना एका महामारीचा सामना करत आहोत. आजही आठवते, गेल्या ३० जानेवारीला सायंकाळी ४ वाजता त्या विद्यार्थिनीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री ११ पर्यंत संपूर्ण राज्यातील आरोग्यविषयक तज्ज्ञ, कर्मचारी त्रिशूरला आले. विद्यार्थिनीला कोविड वॉर्डात हलवण्यात आले. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी फाेन केले. त्या मुलीला आम्ही सतत धीर देत होतो. कारण, आमच्याकडे तेव्हा ठोस उपचार नव्हताच. तापावरील काही औषधे आम्ही देत राहिलो. तिच्या आहाराकडे लक्ष दिले. मित्र आणि कुटुंबीयांशी सतत संपर्कात राहा, असे तिला सांगितले. आरोग्यमंत्रीही रोज तिची चौकशी करत. त्यामुळे तिचा उत्साह वाढला. हळूहळू ती सावरली, पूर्ण बरी झाली. त्यानंतर त्याच रुग्णालयात मी ८५०० रुग्णांवर उपचार केले.’ - डॉ. रवी मेनन, त्रिशूर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.