एक्सप्लेनर:वाढती 'R' व्हॅल्यू कोरोनाच्या तिसर्या लाटेचे संकेत तर नाही ना; जाणून घ्या कोरोनाचा R फॅक्टर म्हणजे काय
- याविषयी जाणून घ्या सविस्तर...
केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी कोविड -19 च्या वाढत्या 'R' फॅक्टरविषयी सर्व राज्यांना सतर्क केले आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, आर फॅक्टर 1.0 पेक्षा जास्त असणे हे कोविड -19 च्या वाढत्या केसेसचे लक्षण आहे. म्हणूनच, अधिका-यांनी सतर्क राहून गर्दीच्या ठिकाणी मास्क, सामाजिक अंतर आणि इतर कोविड -19 प्रतिबंधक उपायांचे काटेकोरपणे पालन होते की नाही याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.
पण तरीही, हा 'R' फॅक्टर काय आहे, ज्यामुळे सरकार इतके चिंताग्रस्त आहे? यात वाढ होत राहिल्यास लॉकडाऊनचा धोका वाढेल का? सद्यस्थितीत R फॅक्टरमुळे प्रकरणांमध्ये कशी कशी दिसून येत आहे?, याविषयी जाणून घ्या सविस्तर...
R व्हॅल्यूमुळे प्रकरणे कशी वाढतात?
- डेटा वैज्ञानिकांच्या मते, R फॅक्टर म्हणजे पुनरुत्पादन दर आहे. यावरुन संक्रमित व्यक्तींमुळे किती लोक संक्रमित होत आहेत किंवा होऊ शकतात, हे समजते. जर R फॅक्टर 1.0 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ असा की प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दुसरीकडे, R फॅक्टर 1.0 पेक्षा कमी असणे किंवा त्यात घसरण होत जाणे हे कमी होणा-या प्रकरणांचा संकेत आहे. हे 100 लोकांना संसर्ग झाल्यास देखील समजले जाऊ शकते. जर 100 लोक संक्रमित असेल तर R व्हॅल्यू 1 होईल. परंतु जर ते 80 लोकांना संक्रमित करत असतील तर R व्हॅल्यू 0.80 असेल.
सध्या भारतात R व्हॅल्यूची स्थिती काय आहे?
- चेन्नईच्या इन्सिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स सायन्सेस (आयएमएससी) च्या अभ्यासानुसार, सध्या देशात R फॅक्टर 1.0 पेक्षा कमी असून काही राज्यांत तो झपाट्याने वाढत आहे. मेच्या मध्यभागी आर फॅक्टर संपूर्ण भारतभर 0.78 होता. म्हणजेच 100 लोक 78 लोकांना संक्रमित करत होते. परंतु जूनच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात R व्हॅल्यू 0.88 वर वाढली आहे. म्हणजेच, 100 लोक 88 लोकांना संक्रमित करीत आहेत.
- या अभ्यासानुसार, 9 मार्च ते 21 एप्रिल दरम्यानची R व्हॅल्यू 1.37 होती. यामुळे याकाळात प्रकरणे झपाट्याने वाढत होते आणि दुसरी लाट आपल्या शिखरावर जात होती. 24 एप्रिल ते 1 मे दरम्यान R व्हॅल्यू 1.18 होती आणि नंतर 29 एप्रिल ते 7 मे दरम्यान ती 1.10 वर आली. तेव्हापासून R व्हॅल्यूत सातत्याने घसरण बघायला मिळाली आहे. परिणामी, प्रकरणेही कमी होत गेली.
कोणत्या राज्यात R व्हॅल्यू धोक्याची पातळी ओलांडत आहे?
संशोधकांच्या टीमचे नेतृत्व करणारे सीताभ्र सिन्हा यांनी सांगितले की, भारतात R व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे. परंतु अॅक्टिव प्रकरणांच्या संख्येत घट होण्याची गती मंदावली आहे. हे ईशान्येकडील काही राज्ये आणि केरळमधील वाढीव R व्हॅल्यूमुळे आहे.
सिन्हा म्हणतात की, R व्हॅल्यू जितकी कमी होईल, तितक्या वेगाने नवीन प्रकरणे कमी होत जातील. त्याचप्रमाणे जर R व्हॅल्यू 1.0 पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक राऊंडमध्ये संक्रमित लोकांची संख्या वाढेल. तांत्रिकदृष्ट्या याला एपिडेमिक फेज असे म्हणतात.
अॅक्टिव केसेसमध्ये R व्हॅल्यूमुळे किती फरक येतो?
- 9 मे नंतर R व्हॅल्यूत घट झाली असल्याचे सिन्हा यांचे म्हणणे आहे. 15 मे ते 26 जून दरम्यान त्यात घट होऊन ते 0.78 वर आले होते. परंतु 20 जूननंतर ते वाढून 0.88 झाले. जोपर्यंत R व्हॅल्यू 1.0 चा टप्पा ओलांडत नाही तोपर्यंत प्रकरणे फार वेगाने वाढणार नाहीत, परंतु R व्हॅल्यूची वाढ चिंताजनक आहे.
- त्यांनी हे उदाहरण देऊन समजावून सांगितले. ते म्हणाले, जर R व्हॅल्यू 0.78 वर कायम राहिली तर 27 जुलैपर्यंत अॅक्टिव प्रकरणांमध्ये घट होऊन ते 1.5 लाखांपेक्षा कमी होतील. परंतु आता R व्हॅल्यू 0.88 वर वाढली आहे आणि त्यामध्ये पुढे कोणताही बदल झाला नाही, तर 27 जुलै रोजी, अॅक्टिव प्रकरणे 3 लाखांच्या आसपास असतील. म्हणजेच, R व्हॅल्यू मधील 0.1 चा फरक देखील दोन आठवड्यांत सक्रिय प्रकरणांची संख्या दुप्पट करू शकतो.
कोणत्या राज्यांत वाढली R व्हॅल्यू ?
- 16 जुलै रोजी महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या 1.07 लाखांवर आली. परंतु चिंताजनक बाब म्हणजे 30 मे रोजी राज्याची R व्हॅल्यू 0.84 होती, जी जूनच्या शेवटी 0.89 वर गेली होती. या काळात महाराष्ट्रात प्रकरणे झपाट्याने वाढली.
- केरळबद्दल बोलायचे झाले तर तेथे 1.19 लाख अॅक्टिव केस आहेत. या महिन्याच्या सुरुवातीस येथील R व्हॅल्यू 1.10 पर्यंत गेले होते. हेच कारण आहे की, इथे रिकव्हर होणा-या केसेसच्या तुलनेच संसर्गाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. महाराष्ट्र आणि केरळ बद्दल बोलायचे तर या दोन राज्यांतील मिळून सध्या देशात 50% पेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत.
- अभ्यासानुसार, मणिपूरची R व्हॅल्यू 1.07 आहे, तर मेघालयात 0.92, त्रिपुरामध्ये 1.15, मिझोरममध्ये 0.86, अरुणाचल प्रदेशात 1.14, सिक्कीममध्ये 0.88 आणि आसाममध्ये 0.86 आहे. म्हणजेच या राज्यांत मागील महिन्यात घट झाल्यानंतर आता पुन्हा नवीन केसेस वेगाने वाढत आहेत.
वाढत्या R व्हॅल्यूमुळे लॉकडाऊन लागू शकते का?
- होय नक्कीच. जर R व्हॅल्यू वाढत राहिली आणि ती 1.0 पर्यंत पोहोचली तर लॉकडाऊन पुन्हा लागू शकते. हे एक सूत्र आहे जे केंद्र व राज्य सरकार फॉलो करीत आहेत. सध्या त्यांचे लक्ष पॉझिटिव्ह रेटवर आहे.
- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, R व्हॅल्यूवर केवळ लॉकडाऊन आणि कडक निर्बंधाच्या मदतीने नियंत्रण आणले जाऊ शकते. जर लोक बाहेर आले नाहीत तर संक्रमित व्यक्ती इतर लोकांना संक्रमित करू शकणार नाही. मे मध्येही आर-व्हॅल्यू कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे लॉकडाऊन. तेव्हा दुसरी लाट ओसरु लागली होती.