आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅमेर्‍यामध्ये कैद झाले अंगावर शहारा आणणारे क्षण:कोरोना काळातील 15 छायाचित्रांची अस्वस्थ करणारी कहाणी, कॅमे-यात कैद करणारे काही फोटोग्राफर नैराश्यात गेले तर काही अद्याप सावरले नाहीत

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक हजार शब्द जे सांगू शकणार नाहीत त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते... बघुयात कोरोना काळातील स्तब्ध करणारी काही छायाचित्रे...

कोविड सेंटरमध्ये जाण्यापूर्वी शेवटच्या वेळी आपल्या पतीचा हात हातात धरणारी बायको असो, मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या व्यक्तीला अनेक महिन्यांनी भेटणारे त्याचे कुटुंबीय असो, पीडित रुग्णाला धीर देणारी परिचारिका असो किंवा डोळ्यासमोर रुग्णाला मृत्यूच्या दाढेत जाताना बघणारा डॉक्टर असो, किंवा दररोज कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी असो... असे कितीतरी अस्वस्थ करणारे क्षण छायाचित्रांच्या रुपात आपल्या डोळ्यांसमोर तरळत असतात. मात्र कदाचितच आपले लक्ष हे क्षण आपल्या कॅमे-यात कैद करणा-या फोटोग्राफर्सकडे जात असावे...

असोसिएट प्रेस अर्थात AP ने 13 देशांतील 15 फोटोग्राफर्सकडून त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम केलेली छायाचित्रे मागवली होती. सोबतच या छायाचित्रांमागील कहाणीसुद्धा त्यांना विचारली होती. एक नजर टाकुयात, अशा काही छायाचित्रांवर आणि जाणूून घेऊयात या छायाचित्रांमुळे या फोटोग्राफर्सच्या जीवनावर कसा परिणाम झाला...

(फोटो- AP Photo/Ebrahim Noroozi)
(फोटो- AP Photo/Ebrahim Noroozi)

19 डिसेंबर 2020, उत्तर इराणचे घीमशहर. छायाचित्रकार इब्राहिम नोरुझी दररोज प्रमाणे फोटो काढण्यासाठी बाहेर गेले. तेवढ्यात, त्यांच्या डोळ्यासमोर एक भयंकर दृश्य समोर आले, जे त्यांना आपल्या कॅमे-यात कैद करण्यासाठी कॅमेरा हातात घेण्याची हिंमत झाली नव्हती. मग त्यांनी 18 वर्षीय मो. हुसैन खोशनजर, 31 वर्षीय हसन कबीर आणि 53 वर्षीय अली रहिमी यांना पाहिले, हे तिघेजण कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तीचा दफनविधी करण्यापूर्वी त्याचा मृतदेह स्वच्छ करत होते. इब्राहिम सांगतो, 'फक्त एक प्रेत पाहून मी हादरलो होतो, हे कामगार रोज 500 मृतदेह दफन करतात. आणि त्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा कामावर हजर राहतात. त्यांचे समर्पण पाहून मी स्वतःला सावरले, अन्यथा तो क्षण मला आतून हादरवणारा होता.' त्याच्या डोळ्यासमोर कोरोनाने मृत पावलेल्या 59 वर्षीय व्यक्तीला दफन करण्यापूर्वी आंघोळ घातली जात होती.

(फोटो- AP Photo/Alessandra Tarantino)
(फोटो- AP Photo/Alessandra Tarantino)

आपण हे छायाचित्र पाहिले का? पुन्हा एकदा पहा. काही अंदाज बांधता येतोय का? 18 एप्रिल 2020 चा हा फोटो आहे. रोममध्ये प्रसिद्ध रॉनी-रोलर सर्कस शो होणार होता. पण त्याच काळात इटलीत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला. पण एक सर्कसमध्ये काम करणारी महिलातयार होऊन स्टेजवर आली आणि तिने तो शो केला. मात्र तिला पाहण्यासाठी एकही प्रेक्षक नव्हता. त्या क्षणाचा फोटो काढणारे अलेसेंड्रा टारनटिनो सांगतात की, संगीत आणि प्रेक्षकांविना खेळ सादर करणा-या त्या व्यक्तीच्या चेह यावरील भाव बघणे हे मला आतून कोलमडून टाकणारे होते.

(फोटो- AP Photo/Alexander Zemlianichenko)
(फोटो- AP Photo/Alexander Zemlianichenko)

एपी फोटोग्राफर अलेक्झांडर जमेलियानिचेन्को आजही मॉस्कोचे रशियन फादर वसिली गेलवान यांच्या संपर्कात आहेत, जे आजारी व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यांचा तुटलेला विश्वास पुन्हा निर्माण करतात. अलेक्झांडर सांगतात की, 1 जून 2020 च्या या फोटोने त्यांच्यावर खोल प्रभाव पाडला. यामध्ये दोन गोष्टी आहेत, आजारी स्त्रीबद्दल फादरची सहानुभूती आणि फादरच्या मनात भीती असूनदेखील लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे. या छायाचित्रामुळे अलेक्झांडर यांच्यात बदल झाला आणि विषाणूची भीती कमी झाली.

(फोटो- AP Photo/Natacha Pisarenko)
(फोटो- AP Photo/Natacha Pisarenko)

अर्जेंटिनाची छायाचित्रकार नताशा पिजोरेंको जेव्हा जेव्हा तिने काढलेला हा फोटो बघते, तेव्हा तिचे मन प्रफुल्लित होते. ती सांगते, 13 ऑगस्ट 2020 रोजी, 84 वर्षीय ब्लँका ऑर्टिजला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या वृद्ध महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली होती, नताशाने फोटो काढण्यासाठी जेव्हा कॅमेरा बाहेर काढला तेव्हा ब्लँका यांनी अशी उत्साहात प्रतिक्रिया दिली. हा क्षण कॅमे-यात कैद करताना नताशाचे डोळे पाणावले होते. ती म्हणते, 'हा माझ्या आयुष्यातील एक अनोखा आणि आनंदी क्षण होता. अनेकदा हे छायाचित्र बघून मला आत्मविश्वास मिळतो.'

(फोटो- AP Photo/Felipe Dana)
(फोटो- AP Photo/Felipe Dana)

ब्राझीलचे फोटोग्राफर फिलिप डैना यांना माहामारीच्या काळात पहिल्यांदा स्पेनमध्ये एका असाईनमेंटवर पाठवण्यात आले होते. मात्र अचानक त्यांना ब्राझीलला बोलावण्यात आले. त्यांना फ्युनरल वर्कर्स म्हणजेच अंत्यसंस्कार करणा-या कर्मचा-यांचे फोटो काढण्यास सांगण्यात आले. जेव्हा त्यांनी काम सुरू केले तेव्हा त्यांनी मृतदेह रस्त्याऐवजी शहरापासून दूर असलेल्या एका नदीतून नेताना पाहिले. त्यांना यामागचे कारण समजले नाही. म्हणून त्यांनी भाड्याने एक बोट घेतली आणि मृतदेह घेऊन जाणा-या बोटींचा पाठलाग सुरू केला. नंतर त्यांना मृतदेह नावेतून का नेले जात आहे, हे समजले असता मोठा धक्का बसला. रस्त्यावरुन मृतदेह नेल्यास विषाणू पसरण्याची मोठी भीती होती. त्यामुळे मृतदेह पाण्याच्या वाटेने नेले जात होते. हे दृश्य पाहिल्यानंतर फिलिप यांच्या मनात अशी भीती निर्माण झाली की, ते आजही यातून सावरलेले नाहीत.

(फोटो- AP Photo/Ariana Cubillos)
(फोटो- AP Photo/Ariana Cubillos)

जेव्हा एरियाना क्युबिलोस त्यांनी काढलेले हे छायाचित्र बघतात, तेव्हा त्यांच्या मनात एक अनामिक भीती दाटून येते. त्यांना वाटते की, कोरोनाने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. हा फोटो 8 ऑगस्ट 2020 चा आहे. यात व्हेनेझुएला पोलिस कर्फ्यूचे पालन न करणा-या काही लोकांना व्हॅनमधून घेऊन जात आहेत.

(फोटो- AP Photo/Manish Swarup)
(फोटो- AP Photo/Manish Swarup)

दिल्लीचे छायाचित्रकार मनीष स्वरूप, जेव्हा जेव्हा त्यांनी काढलेला हा फोटो बघतात तेव्हा त्यांना विलक्षण एकटेपणा आणि तणाव जाणवतो. मनीष यांनी हा फोटो तेव्हा काढला होता, जेव्हा प्रवासी मजुरांसह आलेल्या एका मुलीला शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. या मुलीच्या आजूबाजूला कुणीही नव्हते आणि ती उदासीन डोळ्यांनी खिडकीतून बाहेर बघत होती.

(फोटो- AP Photo/Jae C. Hong)
(फोटो- AP Photo/Jae C. Hong)

कॅलिफोर्नियातील सेंट ज्युड मेडिकल सेंटरचा हा फोटो जे सी हाँग यांनी काढला होता. जाय त्यावेळी आपल्या कौटुंबिक कामासाठी सेंटरवर गेले होते. त्यावेळी एक पत्नी आपल्या पतीला अखेरचा निरोप देत होती. हे छायाचित्र त्यांनी काढले, परंतु या छायाचित्राने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला. ते म्हणतात, "माझ्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच एका व्यक्तीचा मृत्यू होताना जवळून पाहिले होते."

(फोटो- AP Photo/John Minchillo)
(फोटो- AP Photo/John Minchillo)

गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या सर्व रुग्णालये आणि स्मशानभूमीत फोटो पत्रकारांवर बंदी घालण्यात आली होती. पण नंतर काही रुग्णालयांनी छायाचित्रकारांना परवानगी दिली. त्यांना वाटले की, जेव्हा लोक सत्य त्यांच्या डोळ्यांनी पाहतील तेव्हा बहुधा ते या रोगाविषयी गंभीरपणे घेतील. त्यावेळी फोटोग्राफर जॉन मिनचिलो यांना एका इस्पितळात जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या डोळ्यासमोर एका कोरोना रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयातील एक स्टाफ त्या व्यक्तीवर उपचार करत होता, तर इतर जण रुग्णाचा आत्मविश्वास ढासळू नये, यासाठी विचित्र गोष्टी करीत होते. छायाचित्रकार जॉन म्हणतात, त्यावेळी त्यांच्या मेंदूने क्षणभर काम करणे थांबवले होते. हा फोटो काढायचा की नाही हेदेखील ते ठरवू शकत नव्हते.

(फोटो- AP Photo/Ng Han Guan)
(फोटो- AP Photo/Ng Han Guan)

हा फोटो चीनच्या वुहान शहरातील आहे. लॉकडाउन संपल्यानंतर 76 दिवसांनी फोटोग्राफर एनजी हॅन गुआन फोटो काढण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना एक मुलगा मास्क घालून झोपलेला दिसला. हे पाहून त्यांच्या मनात नकारात्मकता उमटली. गेल्या अडीच महिन्यांतील त्या सर्व गोष्टी आठवल्या, जेव्हा संपूर्ण शहर मृत्यूच्या दाढेत गेले होते. त्यानंतर एखाद दुसरे लोकांमध्ये त्यांना आशेचा किरण दिसला.

(फोटो- AP Photo/Emilio Morenatti)
(फोटो- AP Photo/Emilio Morenatti)

22 जून 2020 रोजी स्पेनच्या बार्सिलोना येथील रुग्णालयात जाण्यापूर्वी 81 वर्षीय ऑगस्टीना कॅनामारोने आपल्या 84 वर्षीय पती पास्कल पेरेझला मिठी मारली व किस केले. त्या दोघांमध्ये एक प्लास्टिकची चादर होती. हा क्षण कॅमे-यात कैद करणा-या इमिलो मॉरेनटी म्हणतात, 'फोटो काढताना मी स्वत:ला सावरु शकले नाही. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले आणि माझ्या मनात वेदना जाणवली.'

(फोटो- AP Photo/Jerome Delay)
(फोटो- AP Photo/Jerome Delay)

28 मार्च 2020, पूर्व जोहान्सबर्गमधील अलेक्झांड्रा टाउनशिपमधील बॉईज वसतिगृहासमोर बंदुकधारी पोलिस कर्मचारी आणि त्यांना बघणारे लोक. छायाचित्रकार जेरोम देरी यांनी सांगतात की, हे छायाचित्र पाहिल्याबरोबर त्यांना 1994 च्या पूर्वीच्या दक्षिण आफ्रिकेची आठवण येते. जेव्हा ते हा फोटो काढत होते, तेव्हा बॉईज हॉस्टेलमधील लोक ओरडून म्हणत होते, "आम्ही बाहेर गेलो नाही, काम केले नाही, तर काय खाणार? आमच्याकडे खायला काहीही नाही.'

(फोटो- AP Photo/Rodrigo Abd)
(फोटो- AP Photo/Rodrigo Abd)

पेरूचे लिमा शहर. येथे एक मोठे वाळवंट आहे. येथे सुमारे एक कोटी लोक अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतात. बर्‍याच वेळा त्यांना पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही. अशा ठिकाणी काम करणा-या आरोग्य सेवकाला कोरोना रूग्णाची काळजी घेणे आणि त्याचा मृत्यू झाल्यास त्याला पुरणे किती कठीण असेल, याचा विचार न केलेलाच बरा. फोटोग्राफर रॉड्रिगो एबीडी सांगतात, "मी हे छायाचित्र कधीही विसरू शकत नाही, फ्यूनरल स्टाफ अशा कठीण ठिकाणी काम करीत होते, त्यांना बघून वेदना आणि तत्परता हे दोन्ही भाव येतात."

(फोटो- AP Photo/Oded Balilty)
(फोटो- AP Photo/Oded Balilty)

21 सप्टेंबर 2020 रोजी हा फोटो इस्त्रायली फोटोग्राफ ओडेद बॅलिल्टी यांनी काढला होता. ते म्हणतात, जेव्हा जर्मन हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर इस्रायलच्या लोकांना बंदी बनवून त्यांना ठार मारत होता, तेव्हा त्यातून बजावलेले एहोशुआ डेटसेनिगर आपल्या हातावरील बंदिवान क्रमांकाच्या टॅटूवर ताबीज बांधताना दिसले. ते सकाळच्या प्रार्थनेसाठी यहूदी लोकांचे सभास्थान सिनेगॉग येथे जात आहेत. सरकारने ते केवळ 20 लोकांसाठी उघडले होते. ओडेद सांगतात, "मला वाटलं की एहोशुआ यांना पाहिल्यानंतर त्यांनी पूर्वीचे युद्धही जिंकले होते, आता ते पुन्हा एकदा दुसर्‍या युद्धासाठी सज्ज झाले आहेत. या गोष्टीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. '

(फोटो- AP Photo/Andre Penner)
(फोटो- AP Photo/Andre Penner)

हा शेवटचा फोटो 1 एप्रिल 2020 चा आहे. ही भयावह जागा ब्राझीलच्या साओ पाउलोची आहे. हे छायाचित्र आंद्रे पेनर यांनी काढले आहे. जेव्हा हे छायाचित्र पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तेव्हा राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सनारो यांनी याला 'फेक न्यूज' म्हटले होते. खरं तर, त्यावेळी ब्राझील सरकार कोरोनाने मृत पावलेल्यांची अचूक आकडेवारी सांगताना सतत टाळाटाळ करीत होते. त्यावेळी आंद्रे यांनी आपल्या घरातून ड्रोन उडवून हे छायाचित्र काढले होते. त्यांना भीती वाटत होती की जर ते बाहेर गेले तर त्यांना विषाणूची लागण होईल. पण हे चित्र पाहिल्यानंतर त्यांच्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली.

बातम्या आणखी आहेत...