आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:रिकव्हरीनंतर तीन महिने होऊ शकतो कोविड -19 चा त्रास; लाँग कोविड म्हणजे नेमके काय? जाणून घ्या याविषयी सविस्तर

रवींद्र भजनी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लाँग कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कोरोना विषाणूशी आपला लढा अजूनही सुरुच आहे. भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला. यावेळी अनेकांना आपला जीव गमवाला लागला आहे. यावेळी या आजाराचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. यालाच 'लाँग कोविड' असे म्हटले जात आहे. म्हणजेच कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. यामध्ये सौम्य स्वरुपाचा ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होते, खोकला, छातीत भरुन येणे, गरगरल्यासारखे होणे, सांधेदुखी, डोकेदुखी, प्रदीर्घ काळ गंध किंवा चव न जाणवणे या गोष्टींचा समावेश आहे. लाँग कोविडच्या अनेक रुग्णांना चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्याही जडल्याचे निदर्शनास आले आहे कोविड 19 चे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास हाती घेतले जात आहेत. काही लोकांमध्ये इन्फेक्शन बरे झाल्यानंतरही लक्षणे का दिसत आहेत? ही लक्षणे किती काळ त्रास देऊ शकतात हे शोधण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे?

डॉक्टर आणि वैद्यकीय संशोधनाशी संबंधित लोक याला लाँग कोविड म्हणत आहेत. लाँग कोविड म्हणजे नेमके काय आणि त्याची लक्षणे व उपचार काय यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सल्लागार, श्वसन चिकित्सा आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. राहुल बाहोत यांच्याशी बातचीत केली. लाँग कोविड म्हणजे नेमके काय ते समजून घेऊया...

लंडनच्या एलिसा पेरेगोने मागील वर्षी कोविड -19 विषाणूच्या सुरुवातीच्या संसर्गापासून बरे झाल्यानंतरही कायम राहिलेल्या लक्षणांचे वर्णन लाँग कोविड म्हणून केले होते. लाँग कोविडची ही लक्षणे काही आठवडे किंवा काही महिने राहू शकतात. म्हणजेच, जरी व्हायरस शरीरातून निघाला असला तरीही त्याची लक्षणे संपत नाहीत. काही लक्षणे संपतच नाहीत. तर काही लक्षणे काही दिवसांनी पुन्हा दिसून येतात.

कोरोनामुक्तीनंतरही कोरोनाची लक्षणे रुग्णांमध्ये चार ते 12 आठवड्यांपर्यंत दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये हा कालावधी अधिक असू शकतो, असे डॉक्टर सांगतात. या लक्षणांमुळे अनेकदा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा आपल्याला करोनाचा संसर्ग झाला की काय असे वाटू लागते.

लाँग कोविडच्या दोन स्टेज आहेत

  • स्टेज - 1: पोस्ट एक्यूट कोविड : लक्षणे 3 ते 12 आठवड्यांपर्यंत राहू राहतात
  • स्टेज -2: क्रॉनिक कोविड: लक्षणे 12 आठवड्यांनंतरही कायम राहतात

लाँग कोविडची लक्षणे कोणती आहेत?

इटलीमध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या 133 लोकांवर अभ्यास करण्यात आला. त्यात असे आढळले आहे की 87.4% रुग्णांमध्ये कोरोनाचे किमान एक लक्षण काय राहिले. थकवा हे सर्वात सामान्य लक्षण होते. खोकला, त्वचेवर पुरळ उठणे, हृदयाचे ठोके वाढणे, डोकेदुखी, अतिसार आणि 'पिन्स आणि निडल' सेन्सेशन अशी इतर लक्षणे आतापर्यंत नोंदवली गेली आहेत. कोविडची लक्षणे दोन गटात विभागली जाऊ शकतात. पहिल्या ग्रुपमध्ये खोकला आणि श्वास घेण्यात अडचणीचा समावेश आहे. सोबतच थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे देखील याच गटात ठेवली आहे. दुसर्‍या गटामध्ये शरीराच्या अनेक अवयवांवर कोरोनाचा परिणाम होतो, असे सांगितले गेले आहे. यामध्ये फुफ्फुसं, यकृत, हृदय, मज्जासंस्था, मूत्रपिंड यासारख्या अवयवांचा समावेश असतो.

फक्त गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना लाँग कोविडचा त्रास होतो का?
नाही... लाँग कोविडचा त्रास सौम्य, किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांसह गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाही होऊ शकतो. आतापर्यंत, यासंदर्भात कोणताही विशिष्ट ट्रेंड दर्शविला गेला नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अहवालात 3171 कोविड रूग्णांचा अभ्यास करण्यात आला, या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते त्यापैकी 69% लोकांना सहा महिन्यांत एक किंवा अधिक वेळा डॉक्टरांकडे जावे लागले.

लाँग कोविडमुळे लोकांना मानसिक त्रास होऊ शकतो का?
लाँग कोविडमुळे एंग्झायटी आणि डिप्रेशन या समस्या उद्भवू शकतात. बरे झालेल्या रुग्णांमध्ये पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) दिसून आला आहे. लॅन्सेट सायकायट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लाँग कोविडमुळे त्रस्त प्रौढ व्यक्तींना मनोविकाराच्या समस्येचे निदान होण्याची अधिक शक्यता असते.

भारतात लाँग कोविडची काय स्थिती आहे?
भारतात लाँग कोविडसंबंधी कोणताही विशिष्ट डेटा उपलब्ध नाही. सरकारने यावर लक्ष ठेवलेले नाही आणि शिवाय यावर कोठेही अभ्यास होताना दिसत नाहीये. आमच्याकडे यूकेमधील डेटा आहे, येथेही कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते, 6 मार्च रोजी संपलेल्याचार आठवड्यात 11 लाख लोकांना कोविडची तीव्र लक्षणे आढळली आहेत. त्यापैकी दोन तृतियांश लक्षणे 12 आठवड्यांपेक्षा जुनी आहेत. भारतातील दुसर्‍या लाटेची आकडेवारी पाहिल्यास लाँग कोविडशी झुंज देणार्‍या लोकांची संख्या खूप जास्त असू शकते. हे आधीपासूनच ताणलेल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर ओझे वाढवू शकते.

रुग्णांना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते?
तज्ज्ञांच्या मते, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर वर्षभर देखरेख करणे आवश्यक आहे. तरच आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो की बरे झालेले लोक पूर्णपणे निरोगी आहेत. लाँग कोविडशी झुंज देणा-या लोकांना मल्टीडिसिप्लिनरी आणि मल्टी केअर अप्रोचने बरे केले जाऊ शकते. सोबतच सकस आहार, चांगली झोप आणि सकारात्मक विचार यामुळे लाँग कोविडवर मात करता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...