आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दशावतार:गणा धाव रेऽऽ मला पाव रेऽऽ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोककला अन् लोकसंस्कृतीतील गणपती कधी संकीर्तनातून येतो, कधी नाट्यरूपातून प्रगटतो. त्यातही कोकणातील दशावतारी लोकनाट्य असो की नमन खेळ; त्यात तो गणू वा गणोबा असतो, तर कधी देव गजानन म्हणून त्याला कार्यारंभी आवाहन केले जाते. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत तो विधिनाट्यातही अवतीर्ण होतो अन् भक्तांचा, खेळगड्यांचा सखा होऊन जातो.

श्री गणेश हे कला - विद्या यांचे दैवत. चौसष्ट कलांचा अधिपती। तोचि श्री गणपती। असे म्हटले जाते. तो फक्त सुखकर्ता नाही तर विघ्नहर्ताही आहे. आपले कार्य निर्विघ्न पार पडावे, यासाठी श्री गणेशाची अग्रपूजा केली जाते. तो गणांचा अधिपती - गणाधिपती आहे. त्याची अवकृपा होऊ नये, कोणा गणांनी आपल्या कार्यात बाधा आणू नये म्हणून सर्वप्रथम या गणांच्या अधिपतीला राजी करण्याची प्रथा सुरू झाली आणि कार्यारंभी गणेश पूजा होऊ लागली. मग ती वैदिक संस्कृती असो वा आपली लोकसंस्कृती, कोणतेही कार्य असो वा कला; त्याच्या सुरुवातीलाच गणेशाला ते कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस नेण्याचे आवाहन करण्यात येऊ लागले. लोकसंस्कृतीत चालत असलेल्या विधीत गणरायाचे अग्रस्थान आहे तसे ते नाट्यातही आहे. कोकणातील प्रसिद्ध दशावतारी लोकनाट्यात सूत्रधार गणेशाचे असे स्तवन करतो आणि आपल्या रिद्धीसिद्धीसह नृत्य करीत श्री गणेश अवतीर्ण होतात... नमन गणराया पहिले नमन गणराया ऽऽ ऐसी गजवदनाची ज्याने भक्ती केली साची हो म्हणून रामदास लागे तुझ्या चरणी हो गणपतीया तुझे नाम स्मरणे हो ऽऽ दशावताराचा सूत्रधार या स्तवनात गणरायाचे वर्णन करताना त्यांच्या व्यंगावरही भाष्य करतो. मग गणेशाच्या रागाची त्यांना भीती वाटत नसेल का? तर नाही. याचे कारण म्हणजे ते त्याला आपल्यातीलच एक मानतात. त्याला खेळात सवंगडी करून घेतात. त्याला असे सहभागी करून घेतल्याने इतर गणांचा उपद्रव होण्याची शक्यता नाही आणि कार्य निर्विघ्न पार पडते. गणपती प्रत्येक लोककलेत एका वेगळ्या रूपात प्रकट होताना दिसतो. जसा तो दशावतारात आहे, तसाच तो नमन खेळात आहे, कीर्तनात आहे. तो कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात येतो आणि चित्रकथीतही येतो. कीर्तनात तो नामसंकीर्तनातून आळवला जातो. नमन खेळात दशावताराप्रमाणे अवतीर्ण होतो. कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात गणपतीची बाहुली येते. रिद्धीसिद्धी त्याच्या सोबत येतात आणि दशावताराप्रमाणे इथेही त्याची विनोदी शैलीने नाट्यरूपात आळवणी केली जाते. चित्रकथीमध्ये गणपतीचे चित्र पाटावर ठेवून कीर्तनाप्रमाणे नामस्तवनाने आराधना करतात. पण, या सगळ्या कला प्रकारांत गणपतीला आपल्यातील खेळगडी मानून त्याला आवाहन केल्याचे दिसते. म्हणूनच कधी त्याला ‘गणू’, कधी ‘गणोबा’ अशा आपुलकीच्या नावाने आवाहन केले जाते... गौरीचा बाळ गे गणोबा धाकला चोवीस पानाचा काय विडा ठेविला मानाचा गौरीचा बाळ गे गणोबा धाकला शेंदूर माखला काय सोंडेवरी रामा ऽऽ इतर देवतांची जशी काकडा आरती होते, तशी ठाकर आदिवासींमध्ये स्त्रिया गणेशाचे कान उघडण्याची गाणी म्हणतात. ती डोणा गीते म्हणून ओळखली जातात. यात डोणा नावाचे एक लाकडी भांडे उलटे करून त्यावर चुलीतील राख टाकून करवंटीच्या डवलीच्या दांड्याने घर्षणातून सूर काढला जातो. या सुरावटीवर ठाकर आदिवासी स्त्रिया गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून सकाळी गणपतीची गाणी गाऊन त्याला जागे करतात. यातही गणेशाला गणोबा म्हणून मनवले जाते. उत्तर कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात ‘नमन खेळ’ नावाचा नाट्यप्रकार प्रचलित आहे. यामध्ये अर्ध कमानकृती मानवी साखळी केली जाते आणि ती मृदंगाच्या तालावर लयबद्ध पद्धतीने मागे-पुढे सरकत असते. पयलं नमन हो पयलं नमनऽऽ करूनी वंदन हो गणेश देवाला पयलं नमन हो पयलं नमनऽऽ अशी आळवणी करताच मानवी कमानीच्या मध्यभागी पडद्याआडून गणेशाचे आगमन होते आणि खेळगड्यांसोबत तो डोलू लागतो, खेळू लागतो. पंचमहाभूतांना नमन करेपर्यंत खेळगड्यांसोबत तो रंगमंचावर खेळत असतो. कोकणातल्या जाखडी नृत्याच्या सामन्यातही गणेशाचा धावा केला जातो... गणा धाव रे, मला पाव रे ऽऽ तुझ्या रूपाचे किती गुण गाऊ रे ऽऽ तू दर्शन आम्हाला दाव रे ऽऽ या गीताने जाखडीची सुरुवात होते. या कला प्रकारातही त्याला मैत्रीच्या नात्याने ‘गणा धाव रेऽऽ’ अशी साद घातली जाते. लोकसाहित्य, लोककलांमधील गणपती हा आपल्या संस्कृतीसारखा रांगडा आहे. तो आपल्यातलाच एक आहे. तो आमचा गणू, तोच आमचा लाडका गणोबा आहे. लोककला आणि लोकसंस्कृतीमधील गणपती असा कधी संकीर्तनातून येतो, तर कधी नाट्यरूपातून प्रगटतो. कधी तो गणू असतो, कधी गणोबा होतो, तर कधी देव गजानन म्हणून त्याला आळवत कार्यारंभी येण्याचे आवाहन केले जाते. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत तो विधिनाट्यातही अवतीर्ण होतो आणि भक्तांचा, खेळगड्यांचा सखा होऊन जातो.

रामचंद्र वरक lavannyaram@gmail.com {संपर्क : 9594307975

बातम्या आणखी आहेत...