आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी लाइव्ह रिपोर्ट:बिबट्याने जबड्यात धरला उजवा हात; गौरवने डाव्या हाताने दिली कानशिलात, सोनारीतील 12 वर्षीय मुलाच्या धाडसाचे कौतुक

भरत घोटेकर | सिन्नर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिबट्याने हात पकडल्यामुळे 5 टाके पडले आहेत

मक्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने अचानक समाेरच उडी मारली. काही कळायच्या अात माझा उजवा हात त्याच्या जबड्यात सापडला. क्षणभर काय झाले तेही कळेना. मात्र गोंधळून न जाता ताबडतोब डाव्या हाताने त्याच्या जोरदार कानशिलात लगावली. भांबावलेल्या बिबट्याने जबड्यातला हात सोडला आणि काही कळण्याच्या आतच मक्याच्या शेतात जोरात धूम ठोकल्याने माझे प्राण वाचले. ही आपबीती सोनारी येथील १२ वर्षाचा गौरव संजय काळुंगे हा धाडसाने सांगत होता आणि हे ऐकताना त्याच्या कुटुंबीयांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या अंगावर भीतीने शहारे उभे राहत होते. त्याबरोबरच त्याच्या प्रसंगावधानाचे आणि धाडसाचे कौतुकही केले जात होते.

सोनारी येथील १२ वर्षांच्या गौरववर बिबट्याने हल्ला करत त्याला जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेत त्याचा उजवा हात बिबट्याने पकडल्यामुळे ५ टाके पडले आहेत. सिन्नर नगरपालिकेच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यास रात्री उशिरा नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.