आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कोविड-19 : उणे 20 अंशांवरील ‘थ्रोट स्वॅब’चा प्रवास उणे 80 अंशांवरच थांबतो!

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशयिताचा अहवाल येईपर्यंत नेमकी कशी होते प्रक्रिया

(अनुप गाडगे)

संशयिताचा थ्रोट स्वॅब घेण्यापासून ते प्रयोगशाळेतून तपासणी होऊन अहवाल येईपर्यंत नेमकी कशी प्रक्रिया चालते, याबाबत ‘दिव्य मराठी’ने तज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे संशयिताचा स्वॅब घेतल्यापासून त्याला उणे २० अंश तापमानात ठेवावे लागत असून, उणे ८० अंशांवर या स्वॅबचा प्रवास सध्या थांबला आहे.

कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यानंतर वैद्यकीय तज्ञ संबंधित संशयिताच्या घशातील स्राव घेतात आणि ‘व्हायरल ट्रान्स्पोर्ट मीडियम ट्यूब’मध्ये हा स्राव ठेवला जातो. या ट्यूबमध्ये फॉस्फेट बटर सलाइन राहते. दरम्यान, स्वॅब घेतल्यापासून तो उणे २० अंश तापमानात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वॅब घेतानाच संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती ‘आयसीएमआर’ने ठरवून दिलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या अर्जात भरली जाते. त्यानंतर वैद्यकीय यंत्रणेद्वारे घेतलेला स्वॅब ‘आइस बकेट’मध्ये ठेवून प्रयोगशाळेत पोहोचवला जातो. प्रयोगशाळेत पोहोचेपर्यंतही स्वॅब उणे २० अंश किंवा त्याहून कमी तापमानात असणे गरजेचे आहे. कारण प्रयोगशाळेत स्वॅबवर चाचणीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तो ‘फ्रोझन’(घट्ट) अवस्थेत असायला पाहिजे. तो जर द्रव्य रूपात गेला, तर त्याची चाचणी करता येत नाही. त्यामुळे त्या संशयिताचा स्वॅब नव्याने घ्यावा लागतो. त्यामुळे प्रयोगशाळेत स्वॅब पोहोचताच तज्ञ सर्वप्रथम स्वॅबची ‘कोल्डस्केल मेंटेन’ झाली का, ही बाब पडताळणी करतात. तसेच ‘आयसीएमआर’च्या निर्देशानुसार त्याची संपूर्ण माहिती असलेला अर्ज पडताळणी केला जातो. त्यानंतर कोल्डस्केल योग्य असल्यास स्वॅबचा ‘आरएनए’ काढला जातो. आरएनए काढल्यानंतर ‘आरटीपीसीआर’ प्लेट तयार केली जाते. त्यानंतर सदर स्वॅबची चाचणी प्रक्रिया सुरू होते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे पाच ते सहा तासांचा अवधी लागतो. यावेळी प्राधान्याने पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी स्वरूपात देण्यात येते. त्यानंतर निगेटिव्ह अहवालांची माहिती देण्यात येते. तसेच, निकाल आलेल्या स्वॅबचे नेमके काय करायचे, याबाबत कोणत्याही सूचना ‘आयसीएमआर’कडून प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन प्रकारांत वर्गवारी करून हे संपूर्ण स्वॅब उणे ८० अंश तापमानात साठवून ठेवले जात आहेत. अशी माहिती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कोविड १९ विषाणू प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी सहायक प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिली आहे.

दोन किंवा तीन ग्राफ आल्यास ‘पॉझिटिव्ह’

आरटीपीसीआरमध्ये स्वॅब लावल्यानंतर चाचणी पूर्ण झाल्यानंतर दोन किंवा तीन ग्राफ आले तर संबंधित स्वॅबचा निकाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर येते. तसेच, एकच ग्राफ आला तर सदर अहवाल निगेटिव्ह आणि एकही ग्राफ आला नाही, तर सदर स्वॅबचा अहवाल मिळाला नाही, असे आम्ही समजतो. एकही ग्राफ न मिळाल्यास संबंधित संशयिताचा स्वॅब नव्याने घेऊन त्याची पुनर्प्रक्रिया करावी लागते.

म्हणूनच स्वॅब उणे ८० अंश तापमानात ठेवले आहेत

अहवाल आलेले स्वॅब नष्ट करायचे किंवा नाही, किंवा कशाप्रकारे नष्ट करायचे, याबाबत अद्याप ‘आयसीएमआर’कडून कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशी वर्गवारी करून ते उणे ८० अंश तापमानात साठवून ठेवले आहेत. यापैकी कोणताही स्वॅब नमुना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणेकडून पडताळणीसाठी कोणत्याही वेळी मागितले जाऊ शकतात. त्यामुळे ते योग्य प्रकारे साठवणे आवश्यक असल्याचेही डॉ. प्रशांत ठाकरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले

बातम्या आणखी आहेत...