आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Covid Waste Collection Is Not Accounted For, Only Carried Away By A Competent Contractor Instead Of Picking It Up

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीबी ओरिजिनल:कोविड कचरा संकलनाचा हिशेब नाही, मातब्बर ठेकेदाराने तो उचलण्याऐवजी केवळ वाहून नेला

मालेगाव (शंकर वाघ)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठेकेदाराने स्पॉटवरून जैविक कचऱ्याचे संकलन नाकारल्याने मालेगावातील रुग्णालयात अशा प्रकारे कोविड कचऱ्याचे ढीग पडले होते. (संग्रहित) - Divya Marathi
ठेकेदाराने स्पॉटवरून जैविक कचऱ्याचे संकलन नाकारल्याने मालेगावातील रुग्णालयात अशा प्रकारे कोविड कचऱ्याचे ढीग पडले होते. (संग्रहित)
  • ठेकेदाराच्या मक्तेदारीपुढे पालिकाही हतबल, सफाई कर्मचाऱ्यांवरच भिस्त
  • हॉटस्पॉट मालेगावात रुग्णसंख्येचा आलेख थोडा घसरला, पण धोका कायमच

कोरोनाविरोधातील युद्धात महत्त्वाची जबाबदारी व जोखमीच्या ‘कोविड जैविक कचरा’ संकलन काळात ठेकेदाराने कातडी बचाव भूमिका घेतली. त्यामुळे मालेगाव पालिका प्रशासन हतबल झाले आहे. ठेकेदाराने दाखवलेली ‘मक्तेदारी’ व अटी-शर्तीमुळे गरजू प्रशासनाने आपल्याच सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून कचरा संकलित केला. ठेकेदाराने फक्त तो वाहून नेला.

मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. सध्या रुग्णसंख्येचा आलेख घसरलेला असला तरी धोका टळलेला नाही. पहिले दोन महिने पालिकेने कोरोनाचा हल्ला परतावून लावताना प्रचंड संघर्ष केला. या युद्धात सर्वात मोठी अन् सतर्कपणे कोविड कक्षातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जोखीम,जबाबदारी जैविक कचरा संकलन करणाऱ्या संस्थेची होती. मात्र पहिल्या दिवसापासून या संस्थेने आपली या क्षेत्रातील ‘मक्तेदारी’ पालिका प्रशासनाला दाखवली. कोविड कक्षातील कचरा उचलण्यास आपले कर्मचारी जाणार नाहीत. कचरा गाडीत आणून टाकावा तरच तो वाहून नेला जाईल ही अट घातली. ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्याला प्रशासनाने पीपीई किट देण्याची तयारी दाखवली, मात्र ठेकेदाराने आडमुठेगिरी कायम ठेवली. रुग्णालयात जैविक कचऱ्याचा खच साठत असताना ठेकेदाराचा हेका कायम राहिला. अखेरीस कोविड कक्षातील कचरा पालिका सफाई कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून संकलित करत ठेकेदाराच्या गाडीत टाकला. जीवन हॉस्पिटल व मन्सुरा कॅम्पसमधील कोविड कक्ष आवारात तर ठेकेदाराची गाडीच येत नव्हती. त्यामुळे थेट रस्त्यावर गाडीपर्यंत हा कचरा पालिका कर्मचाऱ्यांनी वाहून नेला.

किमान वेतनाशिवाय राबत आहेत शेवटच्या पायरीवरील कंत्राटी योद्धे

कोविडविरोधातील लढाईत फ्रंटलाइन वॉरियर्स असलेल्यांवर फुले उधळली जात असताना या साखळीतील शेवटच्या पायरीवरील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मात्र किमान वेतनही नाकारले जात असल्याची टीका मुंबईतील कचरा वाहतूक श्रमिक संघाचे मिलिंद रानडे यांनी केली आहे. कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट असलेल्या मुंबई शहरात अकरा हजारांपेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहेत. साडेसहा हजार कंंत्राटी स्वच्छता कर्मचारी आहेत आणि पाच हजार दत्तक वस्ती योजना या गोंडस नावाखालील स्वच्छता कर्मचारी आहेत. या साऱ्यांना किमान वेतनाच्याही निम्मा पगार दिला जातो, सुरक्षा साधने दिली जात नाहीत. कोविड वॉर्डमधील जैविक कचरा ठेकेदार घेऊन जातो, मात्र तो वेचण्याचे काम कंत्राटी कामगारांनाच करावे लागत आहे. साऊथ परेल वॉर्डमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट घरी नेऊन धुऊन वापरण्यास सांगण्यात आले. कचरा वाहतूक करणारा वांद्रे येथील एक कामगार कोरोनाचा बळी ठरलेला आहे.

संकलनात अनियमितता

कोविड कक्षातील कचरा संकलन करताना ठेकेदार संस्थेची मुजोरी कायम होती. ठरलेल्या वेळेत गाडी न आल्याने पालिका प्रशासनाच्या कामकाजावर तासेरे ओढले गेले. कधी एक दिवसानंतर, तर कधी दोन दिवसांआड ठेकेदाराचे वाहन आले. फारण हॉस्पिटलमध्ये तर तब्बल २ दिवस पीपीई किट व इतर जैविक कचरा हा संकलन वाहनशिवाय उघड्यावर होता. याची थेट उपायुक्तांकडे तक्रार झाल्यानंतर कचरा उचलला गेला.

लाखोंच्या गैरव्यवहाराची शक्यता

शासन निर्देशानुसार कोविड कचरा संकलन व वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहन सुचवण्यात आले आहे. यासाठी वेगळा मोबदला शंभर रुपये ठरला आहे. मालेगावच्या सुमारे १२ कोविड कक्षातून गेल्या दोन महिन्यांत किती कचरा गोळा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ठेकेदाराने नेमका किती कोविड कचरा संकलित केला यावर नियमन नाही. त्यामुळे ठेकेदार देणार त्या रकमेची बिले अदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांत नेमका किती किलो कोविड जैविक कचरा संकलित केला याचा पालिकेकडे आजतागायक कोणताही हिशेब नाही. या पळवाटेचा गैरफायदा घेऊन कोविड कचरा हे नजीकच्या काळातील लाखोंच्या गैरव्यवहाराचे कुरण ठरले आहे.

बिले दिलेली नाहीत त्यामुळे सध्या संकलनाची माहिती हाती नाही

कोविड कचरा संकलन केल्याची अद्याप ठेकेदार संस्थेने बिले दिलेली नाहीत. त्यामुळे किती कोविड जैविक कचरा गोळा झाला याची माहिती हाती आलेली नाही. सदर ठेकेदाराने बिले अदा करताना त्याने दिलेल्या अनियमित सेवेचा विचार केला जाईल. - नितीन कापडणीस, उपायुक्त.

बातम्या आणखी आहेत...