आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBSE सचिव अनुराग त्रिपाठी यांची मुलाखत:बारावीचा निकाल लागण्यास अद्याप वेळ लागेल, परिस्थिती सामान्य होईपर्यंत ऑनलाइन क्लास सुरू राहतील

रवि यादव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भास्करसोबतच्या खास बातचीतमध्ये सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बारावीचा निकाल कसा लागणार? कार्यपद्धती कशी असेल?, असे विविध प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. सीबीएसई कडून लवकरच कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे. भास्करसोबतच्या खास बातचीतमध्ये सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सध्या सुरु असलेल्या ऑनलाइन वर्गातून मुलांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले आहेत.

प्रश्नः बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर सीबीएसई कधीपर्यंत निकाल जाहीर करेल?

उत्तरः अद्याप क्रायटेरिया निश्चित झालेला नाही. याला अजून दोन आठवडे लागतील. एकदा निकष ठरल्यानंतर देशातील सर्व शाळांकडून डेटा गोळा केला जाईल. यानंतर मुलांचा डेटा अपलोड केला जाईल. याला बराच काळ लागेल. सध्या निश्चित तारीख देणे शक्य नाही, परंतु दोन आठवड्यांनंतर क्रायटेरिया नेमका काय असेल, याची माहिती दिली जाऊ शकेल.

प्रश्न: निकष ठरवण्यासाठी कोणत्या पॅरामीटर्सचा समावेश केला जात आहे?

उत्तरः आराखडा तयार होण्यासाठी दोन आठवडे लागतील. यासंदर्भात एक समिती गठित केली असून ती कार्यरत आहे. जे अंतिम निकष केले जातील ते लागू होतील. प्रत्येकजण त्याची वाट पाहत आहे.

प्रश्नः सीबीएसईने मुलांना परीक्षेसाठी संधी देणार असल्याचे सांगितले आहे. मुले कधीपर्यंत परीक्षा देऊ शकतील?

उत्तर: कोरोना संकटामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ,एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची असेल तर त्याला तो पर्याय दिला जाणार आहे. कोरोनाची स्थिती ज्यावेळेस सामान्य होईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.

प्रश्न: परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कोणते गुण ग्राह्य धरले जातील, त्याच्या गुणपत्रिकेत परीक्षेपूर्वीचे गुण नमूद केले जातील की परीक्षेनंतरचे?

उत्तरः सीबीएसई बोर्डाकडून तयार करण्यात आलेल्या फॉर्म्युलावर एखादा विद्यार्थी समाधानी नसल्यास त्याच्याकडे निकालाविरोधात अपील करण्याचा पर्याय असेल. अशा वेळी विद्यार्थी लेखी परीक्षा देऊ शकतात. अशा परिस्थितीत जो निकाल नंतर येईल तो अंतिम असेल.

प्रश्नः कोरोनामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले असे आपल्याला वाटते का?

उत्तरः कोरोनामुळे आम्ही बारावीच्या मुलांची परीक्षा घेऊ शकत नाहीये. मुलांचे बहुतेक शिक्षण ऑनलाईन झाले आहे. कोरोनामुळे मुलांना अभ्यासात त्रास झाला यात काही शंका नाही. शाळा व मुलांना अडचणींचा सामना करावा लागला. हे संपूर्ण जगाबरोबर घडले आहे.

प्रश्नः सीबीएसईने इयत्ता 12 वीचा अभ्यासक्रम कमी केला आहे, पण भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना याचा फटका बसू शकतो का?

उत्तरः आपण सर्वजण मुलांच्या भविष्यासाठी जे योग्य आणि चांगले आहे, ते करत आहोत. सीबीएसई देखील मुलांच्या भवितव्यासाठी प्रयत्नरत आहे आणि मुले स्वतः देखील प्रयत्न करत आहेत. आपण याकडे त्रास किंवा अडचण म्हणून पाहू नये. या कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी आम्ही अभ्यासक्रम 70% कमी केला आहे. स्पर्धा परीक्षा कशा घेण्यात येतील याबद्दल मी काही सांगू शकत नाही. कारण मी सीबीएसईचा भाग आहे आणि त्यावर भाष्य करणे योग्य नाही.

प्रश्नः नवीन सत्रासाठी मुलांचे ऑनलाइन क्लास सुरू झाले आहेत आणि आता 18 वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही तर मग मुलांवर काय फरक पडेल?

उत्तरः मला आशा आहे की आज नाही तर उद्या परिस्थिती ठीक होईल. जेव्हा परिस्थिती योग्य असेल तेव्हा मुलांचे शिक्षण आणि सामान्य जीवन पुन्हा रुळावर येईल. जोपर्यंत वातावरण योग्य नाही, तोपर्यंत आमच्याकडे असलेला सर्वोत्तम पर्याय हा ऑनलाइन क्लासचा आहे. मागील वर्षीही क्लास घेण्यात आले होते आणि यावर्षीही ऑनलाईन शिक्षण चालू आहे.

प्रश्न: आपण देशभरातील मुलांना काय सांगू इच्छिता?

उत्तरः आम्ही आमच्या शाळांमध्ये मुलांना अशा प्रकारे मुलांना तयार करतो की, कोणतीही कठीण परिस्थिती उद्भवल्यास मुले निर्णय घेऊ शकतात आणि आयुष्यात पुढे जाऊ शकतात. कोरोना ही अशी समस्या आहे, ज्यामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. आम्हाला फक्त अशी आशा आहे की आमची मुले या परिस्थितीत चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतील. मी मुलांना एवढेच सांगू इच्छित आहे की, शिक्षणाचे उद्दीष्ट म्हणजे त्यांना एक चांगले मनुष्य बनविणे. म्हणूनच, मुलांनी असा विचार करू नये की जर परीक्षा दिली गेली नाही तर त्यामुळे खूप मोठे नुकसान होईल.

परीक्षा कधीच अंतिम नसते. ती आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यात द्यावी लागते. मुलांनी परीक्षेतील गुण घेण्यापेक्षा आपली क्षमता विकसित करणे अधिक महत्वाचे आहे. जरी गुण कमीअधिक असेल तरी आपल्याकडे क्षमता असेल तर आपण आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. मुलांनी नंबर्सच्या रेसमधून बाहेर पडून स्वतःची क्षमता विकसित करायला हवी, जे जीवन जगण्यासाठी आणि देश घडविण्यात अधिक प्रभावी ठरेल. मुलांनी स्वतःच्या विकासासाठी सेल्फ स्टडीवरही लक्ष द्यायला हवे.

बातम्या आणखी आहेत...