आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'आमचे पूर्वज लाहोरहून दिल्लीत आले होते. आमच्या वडिलांचे नशीब खराब होते म्हणून आम्ही मंगोलपुरीत येऊन स्थायिक झालो. नाहीतर आमच्यासारखे खन्ना दिल्लीतील पटेल नगर सारख्या छान भागात आणि मुंबईसारख्या शहरात राहतात. फुटक्या नशिबाने आम्हाला इथे आणले.'
दिल्लीच्या हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी दीपक आणि अमित खन्ना यांची मावशी त्यांच्या दोन खोल्यांच्या छोट्या घरात मला हे सांगते.
कंझावाला येथे 20 वर्षीय अंजलीला गाडीखाली फरफटत नेऊन मारणाऱ्या आरोपींविषयी माहिती घेण्यासाठी मी मंगोलपुरीत पोहोचलो. हे ठिकाण सुलतानपुरी पोलीस ठाण्यापासून तीन किमी अंतरावर आहे. सर्व आरोपी सुलतानपुरी पोलीस ठाण्यातच बंद आहेत. पाचही आरोपींच्या घरांना कुलूप आहे. शेजाऱ्यांशी बोलल्यानंतर असे आढळून आले की, चारही आरोपींचा दारू पिऊन भांडण किंवा हाणामारी केल्याचा कोणताही रेकॉर्ड नाही. फक्त मनोज मित्तलबद्दल एका शेजाऱ्याने सांगितले की, तो सट्ट्याचे काम करायचा.
मी राज पार्क पोलिस ठाण्यासमोर उभा होतो. इथे काही लोक पोलिस ठाण्यासमोर बसून पत्ते खेळताना आढळून आले. या प्रकरणातील 4 आरोपींसोबत या लोकांची दररोज उठबस होती असे कळाले. या ठिकाणी उपस्थित असलेले लोक म्हणतात, 'जर ही घटना घडली नसती, तर ते तुम्हाला रोज सकाळ-संध्याकाळ या ठिकाणीच भेटले असते. आता त्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या मुलांबद्दल कधीही चुकीचे ऐकले नव्हते.'
शेकताना पत्ते खेळणाऱ्या एका माणसाला जवळ बोलावले आणि एका व्यक्तीकडे इशारा करत म्हणाला, 'पिवळा टी-शर्ट आणि काळी हुडी घातलेला तो माणूस उभा आहे, तो अमितचा भाऊ आहे. आम्ही त्याला भेटायला त्याच्या जवळ गेलो. मी प्रसारमाध्यमांतील आहे हे कळल्यावर तो नाराज झाला. म्हणाला - 'आम्हाला काही माहीत नाही, माझा एक भाऊ होता, पण आता तो मेला आहे. मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याच्या स्थितीत नाही. मला एकटे सोड आणि निघून जा.'
त्याने आपले नावही सांगितले नाही, इतरांना ओरडून सांगितले- 'माझे नाव कोणीही सांगू नये, माझा कोणाशीही संबंध नाही'.
तेवढ्यात एक माणूस आला आणि म्हणाला, 'मी अमित आणि दीपकचा दूरचा भाऊ आहे. माझी आई दोघांची मावशी आहे. चला त्यांना भेटून घ्या.'
मी त्याच्याबरोबर गेलो. घरात बेडवर एक वृद्ध महिला पडलेल्या दिसल्या. त्यांचे नाव निर्मला खन्ना. 62 वर्षीय निर्मलांना श्वसनाचा आजार आहे. आम्ही जसे दारातून विचारले की, ‘दीपक-अमित को जानती है’ त्या लगेच उठून बसल्या.
त्या म्हणू लागल्या- 'त्यांचे वडील बस चालवायचे. दोन्ही मुलं माझ्यासमोरच जन्मली होती. दोघंही कमी शिकलेले होते. अमित बारावीपर्यंत शिकून बँकेत काही काम करायचा. काळू (दीपक) बहुधा आठवीपर्यंत शिकला आणि ग्रामीण सेवेत ड्रायव्हर म्हणून काम करायचा.'
'नवीन वर्षाच्या दिवशी दोघेही यारी-दोस्तीत गेले. काही वर्षांपूर्वी कुटुंबात भांडण झाले होते. आता आमचे संबंध चांगले नाहीत, फारसे येणे-जाणे होत नाही. पोलिसांनी दीपकला यानंतरच ताब्यात घेतले.'
यानंतर आम्ही अमितचे घर शोधण्यासाठी निघालो. मंगोलपुरीतील घरे मजल्यानुसार विकली जातात. अमित एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होता. तळमजल्यावर राहणारा राजीव सांगतो, 'हे घर अमितच्या आईच्या नावावर आहे. अमित रोज ऑफिसला जायचा, तो एसबीआय कार्डसाठी काम करायचा. शिकलेला मुलगा वाटायचा.'
आम्ही विचारले, कधी दारू पिऊन भांडण, गोंधळ केला होता का?
उत्तर मिळाले- 'तो दारू प्यायचा की नाही, हे माहित नाही, कारण हे कळण्याची कधी गरजच पडली नाही. कधीही भांडण, गोंधळ किंवा हाणामारी झाली नाही. हे लोक जवळपास 10 वर्षांपासून या ठिकाणी राहत आहेत.'
आमचे म्हणणे ऐकून 55 वर्षांच्या संतोषी आल्या. त्या दीपक आणि अमितच्या शेजारी आहेत. म्हणाल्या- 'खरं सांगू, मला विश्वास बसत नाही की हे घडले आहे. ही कामकाज करणारी शिकलेली मुलं होती. त्यांना रोज ये-जा करताना बघायचे, आमची अनेक वर्षांपासून ओळख आहे.'
मी गल्लीत बांधलेल्या माचिसच्या पेट्यांसारख्या घरांजवळून जात होतो. माझे पुढचे ठिकाण मिथुनचे घर होते. 26 वर्षीय मिथुन हेअर ड्रेसरचे काम करायचा. शेजाऱ्यांनी सांगितले की, 'मिथुनचे कुटुंब जाटव समाजाचे आहे. हा मुलगा फारसा घरी राहत नव्हता. घरातून कामावर आणि कामावरून घरी. आम्ही अनेक वर्षांपासून तेच पाहत आहोत. हे कसे घडले यावर विश्वास बसत नाही. मिथुनने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कुटुंबात तीन भाऊ, एक बहीण (आता विवाहित) आहे. मिथुनचा मोठा भाऊ राजेंद्र आरओ फिटिंग आणि दुरुस्तीचे काम करतो.'
दिल्लीच्या थंडीत मिथुनच्या घराजवळ शेकोटी पेटवणाऱ्या लोकांना विश्वास वाटत नाही की त्यांच्या शेजारी राहणारा मुलगा नवीन वर्षात देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रकरणातील आरोपी आहे.
कृष्णा (27) हा देखील या खून प्रकरणातील आरोपी आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील स्पॅनिश कल्चर सेंटरमध्ये तो काम करायचा. जेव्हा मी कृष्णाच्या घरी पोहोचलो तेव्हा मला दरवाजा बंद दिसला. संपूर्ण रस्ता शांत होता, फक्त एक-दोन मुलं इकडे तिकडे धावत होती. मी कृष्णाच्या समोरच्या घराचा दरवाजा ठोठावला. दोन महिला भोजपुरीमध्ये बोलत बाहेर आल्या.
आम्ही विचारले- 'कृष्णा तुमचा शेजारी होता?'
उत्तर मिळाले- 'आम्हाला जास्त माहिती नाही, आम्ही आमचे काम पाहतो. त्यांचे कुटुंबही फारसे मिसळत नव्हते. घरात आई-वडील आणि तीन भाऊ आहेत. वडील एस ब्लॉकमध्ये फळांचे दुकान लावायचे. कृष्णाबद्दल सांगायचे तर, आजपर्यंत कधीही भांडण, मारामारी, गोंधळ असे काही झाले नाही.
चारही आरोपी दीपक, अमित, कृष्णा आणि मिथुन यांची घरे मंगोलपुरीतच आसपास आहेत. पाचवा आरोपी मनोज मित्तल याचे घर येथून साडेतीन किमी अंतरावर आहे. तिथे पोहोचल्यावर इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्यांनी सांगितले की, मनोजचे घर दुसऱ्या मजल्यावर आहे. एका शेजाऱ्याला विचारले की, मित्तलचा प्रभाव एवढा कसा वाढला की गल्लीत भाजपच्या नावाने पोस्टर लावायला लागला.
उत्तर मिळाले- 'म्हणायला त्याचे रेशनचे दुकान आहे, पण तो सट्टेबाजीसारखे दुसरे दोन नंबरचे धंदेही करत असे. पोलिसांपासून सर्वांना सट्ट्याची माहिती आहे.'
याबाबत जाणून घेण्यासाठी रोहिणीचे डीसीपी जीएस सिद्धू यांना फोन केला, मात्र हा कॉल रिसीव्ह झाला नाही.
मी दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो आणि मित्तलच्या घराची बेल वाजवली. कोणीही दार उघडले नाही. शेजाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मनोज मित्तल हा त्याच्या पत्नीसोबत सुमारे 4 वर्षांपासून येथे राहतो. त्याला मूल नाही. पत्नी त्रस्त होऊन माहेरी गेली आहे. हे कुटुंब आपल्या कामाशी काम ठेवायचे. मनोज मित्तल बहुतेक रात्री उशिरा घरी यायचा आणि तो दारू पिलेला असायचा. पण भांडण-मारामारी कधी केली नाही.
दिल्ली भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, मनोज मित्तल हा सुलतानपुरीतील पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच डाटा एन्ट्री सेलचा सहसंयोजक बनवण्यात आले होते. सुलतानपुरीमध्ये त्याचे अभिनंदन करणारे पोस्टरही लावण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.