आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Destroyed The Life Of Many, Now Building Houses For The People; The Story Of Birju Who Left The Path Of Naxalism ...

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, आता लोकांसाठी घरे बांधतोय; नक्षलवादाचा मार्ग सोडणाऱ्या बिरजूची कहाणी...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जो करेल मनातल्या रावणाचे दहन, त्याच्याच मनात वसेल राम

अनेकांची घरे उद्ध्वस्त करणारा कुख्यात बिरजू आता लोकांसाठी घरे बांधतोय! तब्बल ३३ पोलिसांना मारणारा, तीन गावकऱ्यांचे खून करणारा आणि १६ लाख रुपयांचे बक्षीस ज्याच्या नावावर होते, त्या बिरजू ऊर्फ क्रिष्णा मासा दोरपेटी याने नक्षलवादाचा मार्ग सोडत, मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. आता तो सुखाने जीवन जगतोय. या कुख्यात नक्षलवाद्याचे सीमोल्लंघन त्याच्याच शब्दांत...

समईचा परिसर इवला

घे कुशीत शिंदळ वारा

देहाची वितळण साधी

सोन्याहून लख्ख शहारा…

समई म्हणजे सात्त्विकतेचे, शांततेचे आणि पावित्र्याचे प्रतीक तर भोवतालचा वारा मात्र शिंदळ म्हणजे धुडगूस घालणारा. माणसाच्या मनातही सात्त्विक विचारांभोवती कधी अनैतिक भासणारे वाईट विचार घुमत असतात. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथे आई, वडील, भाऊ, बहीण व पत्नीसोबत सुरळीत जगणे सुरू असताना आयुष्याला ग्रहण लागेल असे कधीच वाटले नव्हते. पाच एकर शेती व तीन खोल्यांच्या घरात सुरळीत सुरू होते. अशात मनातल्या शिंदळ वाऱ्याने उचल खाल्ली. गावात गट्टा दलम कमांडर भास्करचे गावात येणे -जाणे होते. गावात ते बैठका घेत व नाचगाण्यांचे कार्यक्रम करीत. गावकऱ्यांसोबत मीही बैठकांना जात असे. सुरुवातीला सांगकाम्या होतो. त्यांनी सांगितलेली कामे करीत गेलो. कधी कधी कमांडर भास्करसोबत जंगलात जात होतो. दरम्यान नक्षल्यांशी जवळीक निर्माण झाल्याने मन उचल खात होते. कमांडर भास्करलाही हे माहिती होते. त्यानंतर २००२ मध्ये स्वेच्छेने दलममध्ये भरती झालो.

सुरुवातीला डिसेंबर २००२ ते एप्रिल २००७ पर्यंत गट्टा दलममध्ये कार्यरत हाेताे. तिफण चालवणारा मी बंदूक चालवायला शिकलो. शेतात निघालेल्या सापालाही जंगलात सोडणारा मी घातपात करून माणसे मारायला लागलो. विळीवर भाजी चिरताना बोट कापल्यावर थरथरणाऱ्या मला खून केल्यावरही काही वाटेनासे झाले आणि लक्षात आले, स्वत:च नक्षलवादी झालोय.

मन गावाकडे खेचायचे, पण दबाव होता :

जंगल हेच माझे जीवन झाले होते. माझे मन मात्र गावाकडे धाव घेत होते. गावकरी, मित्र, नातेवाईक, शेतशिवार आठवत होते. पण जंगलातून सुटका नव्हती. वरिष्ठ केडरचा दबावही वाढत होता. एक ना एक दिवस पोलिसांच्या गोळीने मृत्यू ठरला होता. २००८ मध्ये आत्मसमर्पण करण्याचा विचार होता. पण, त्या वेळी पोलिस अटक केल्यावरही सरळ तुरुंगात टाकत होते. म्हणून विचार पुढे ढकलला. २०११-१२ मध्ये पोलिसी कारवाया वाढल्या. चकमकीत नक्षली ठार होत होते. त्याच वेळी आत्मसमर्पण करायचे ठरवले. नंतर आत्मसमर्पण पाॅलिसी आली. मग २०१४ मध्ये दुसऱ्या पत्नीसोबत आत्मसमर्पण केले. सरकारने ७ लाख रुपये, भूखंड, घर सारे काही दिले. आता मी गवंडीकाम करतो. त्याचा ३०० रुपये रोज मिळताे.

रँक वाढत गेली तशा माझ्या कारवायाही वाढतच गेल्या

पदोन्नती आमच्यातही असतेच. २००४ मध्ये कंपनी क्रमांक ४ चा प्लॅटून कमांडर झालो. ४ वर्षांपूर्वी शरण आलो, तेव्हा डीव्हीसी होतो. २००६ ते २०१२ दरम्यान ९ मोठ्या घातपाती कारवाया केल्या. त्यात हत्तीगोटा चकमकीत १७ आणि लाहेरी चकमकीत १६ पोलिस जवान मारले, तर तीन गावकऱ्यांचे खून केले. माझी रँक वाढत होती. सरकारने माझ्यावर १६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. यादरम्यान सहकारी महिला नक्षलवादी रामशीला ऊर्फ मंदादसरू पदासोबत सूर जुळले.