आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुछ दिल ने कहा:देव आनंद-कल्पना कार्तिक यांची लव्ह केमिस्ट्री

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९५१-१९५३ या काळात कल्पना कार्तिक यांनी देव आनंद यांच्यासोबत तीन चित्रपट केले होते आणि चौथा चित्रपट ‘टॅक्सी ड्रायव्हर’चे चित्रीकरण सुरू झाले होते. अंधेरीच्या मोहन स्टुडिओमध्ये काही इंटिरिअर दृश्ये चित्रित केली जात होती, तेव्हा या दोघांनी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला.

उ न्मुक्त था बंधन युक्त मेरा मन हो गया । जीवन में पहली बार आज कुछ हो गया । खुल गया सत्य, वास्तविक तथ्य । किंतु नैन परिधि, खुली इस विधि । कि नैन प्रांगण में, था मैं ही मैं । प्रेम बंधन हेतु, बांधा दृष्टि सेतु । दृष्टि सेतु पर भावों का आवागमन हो गया । जीवन में पहली बार आज कुछ हो गया। आजच्या वाचकांना ही भाषा आणि भाव विचित्र वाटतील, पण सत्य हेच आहे की हृदयात निर्माण होणारं वादळ असंच असतं. वस्त्रालंकारांंमध्ये बदल झाला तरी फक्त एका हलक्या स्पर्शाने अंगावर रोमांच उभे राहतात. परंतु आजच्या युगात सगळे काही मिळण्याची अातुरता असते. मात्र, तरीही प्रेम हे प्रेमच राहते.

त्या काळातील स्टार गायक मनमोहिनी, सौंदर्यवती सुरैयाने सदाबहार नायक म्हणवल्या जाणाऱ्या देव आनंदच्या आयुष्यात प्रेमाची लाट आणली! विश्वास ठेवा, या जगातील जवळपास सगळ्या अमर प्रेमकथांचा शेवट शोकांतिकेत झाला आहे- लैला-मजनू, शिरीन-फरहाद, रोमिओ-ज्युलिएट किंवा देव आनंद-सुरैया! सुरैयाच्या आजीने धर्माचे दाखले देत या प्रेमकथेला पुढे जाऊच दिले नाही. त्यामुळे या आजीची नात सुरैया शेवटपर्यंत अविवाहित राहिली अन् ७५ वर्षे एकांतात घालवल्यावर २००४ मध्ये हे जग सोडून गेली. देव-सुरैया जवळपास अडीच ते तीन वर्षे एकत्र होते. १९५० च्या सुमारास नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत गेला. मग सोबत घालवलेल्या गोड आठवणींशिवाय आता काहीच उरले नाही, हे कटू सत्य दोघांनाही कळून चुकले होते.

परंतु, काळ खोल जखमा भरून काढायलाही शिकवत असतो. इकडे नियतीने प्रेयसीला हिरावून घेतले आणि दुसरीकडे देव आनंद यांचा चित्रपट प्रवास प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करू लागला. यादरम्यान, मोठा भाऊ चेतन आनंद यांच्यासोबत देव आनंद यांनी ‘नवकेतन फिल्म्स’ ही स्वतःची निर्मिती संस्था स्थापन केली. या बॅनरखाली देव आनंद यांचे मित्र गुरुदत्त यांनी ‘बाजी’ या नव्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून चित्रपट प्रवासाला सुरुवात केली.

या चित्रपटातील मुख्य भूमिकेत एक पुरुष आणि दोन स्त्री पात्रे होती. नायक देव आनंदसोबत दोन नायिका. त्यातलीच एक सशक्त कलाकार होती गीता बाली. दुसऱ्या नायिकेसाठी चेतन आनंद यांना निर्माते रूप शौरी यांनी एका मुलीचा फोटो दाखवला होता. या मुलीला शौरींनी सिमल्यातील एका शूटिंगच्या ठिकाणी पाहिले. त्या सुंदर मुलीचे नाव मोना सिंघा होते. मोना सिंघाचे कुटुंब पंजाबी-ख्रिश्चन होते. जेव्हा ती चेतन आनंद आणि त्यांची पत्नी उमा आनंद यांना भेटली, तेव्हा उमा यांच्यासोबत आपले नाते असल्याचे बोलण्यातून तिला समजले. मोनाला चित्रपटात काम करण्याची आवड होती, तेच तिचे ध्येय होेते. परिस्थितीही अगदी जुळून आली होती. मोनाला नवकेतन फिल्म्सने ‘बाजी’ चित्रपटातील दुसऱ्या नायिकेच्या पात्रासाठी साइन केले. चेतन आनंद यांनी मोनाला फिल्मी नाव दिले ‘कल्पना कार्तिक’!

खूप संशोधन केल्यानंतर मला कल्पना कार्तिकच्या १९५३ मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून ही माहिती मिळाली. अन्यथा, प्रत्येक पुस्तकात, इंटरनेटवर, विकिपीडियात जे काही लिहिले आहे, ते सगळे अगदी वरवरचे, पोकळ तर्कावर आधारलेले आहे. लेखकांनी ‘बाजी’च्या सेटला १९५१ मध्ये मिलन स्थळ बनवून टाकले, परंतु हे समजून घेणेही आवश्यक आहे की चित्रीकरण ही एक खर्चिक, प्रदीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीला काही वर्षे लागतात. या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातही रॉ स्टॉकवर शूट करणे, लॅबमध्ये त्यावर प्रक्रिया, संकलन, डबिंग, पार्श्वसंगीत, फायनल प्रिंट्स, प्रदर्शनाची तारीख, थिएटरची व्यवस्था आणि चित्रपट प्रदर्शित करणे इत्यादी अनेक कामे आहेतच. या अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून गेल्यावर, प्रेक्षक तो चित्रपट पाहतात आणि त्याला क्षणार्धात हिट किंवा फ्लॉप करतात. तर मी केलेली गणती आणि अनुभवाच्या समीकरणानुसार देव आनंद आणि मोना सिंघा (कल्पना कार्तिक) यांची भेट १९५० च्या मध्यात झाली असावी, कारण ‘बाजी’ १ जुलै १९५१ ला प्रदर्शित झाला होता. देव आनंद यांनी आपल्या आत्मचरित्रात कल्पना कार्तिकसोबतच्या त्यांच्या लग्नाविषयी फारशी माहिती दिली नाही. केवळ रम्य अनुभव आणि काही मजेशीर वर्णनापुरते ती मर्यादित ठेवली. सुरैयापासून विभक्त झाल्यानंतर त्यांना एखाद्या स्त्रीच्या आधाराची गरज होती, हे मानले, तरी त्याबाबत त्यांनी कोणतीही विशिष्ट तारीख, वर्ष, ठिकाण यांचे वर्णन न केल्याने त्याची सत्यता सिद्ध होत नाही.

१९५३ मधील त्याच मुलाखतीत कल्पना कार्तिक म्हणाल्या होत्या की, आपल्याला फक्त स्वत:च्या चित्रपट कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यांच्या आयुष्यात असे कोणी नाही ज्याच्यासोबत त्या लग्न वगैरेचा विचार करू शकतील. देव आनंदसोबत त्यांचे कोणतेही नाते असले, तरी कल्पना कार्तिक यांना ते उघड करायचे नव्हते. १९५३ मधली ही मुलाखत त्यानंतरच्या घटनांची सांगड होती. स्त्रीचा सहवास मिळत नसेल, तर तो मिळवण्याची आतुरता पुरुषाची आसक्ती-उन्माद अधिक दृढ करते. आणि हाच त्याचा स्वभाव असतो. १९५१-१९५३ या काळात कल्पना कार्तिक यांनी देव आनंद यांच्यासोबत तीन चित्रपट केले होते आणि चौथा चित्रपट ‘टॅक्सी ड्रायव्हर’चे चित्रीकरण सुरू होते. अंधेरीच्या मोहन स्टुडिओमध्ये काही इंटिरिअर दृश्ये चित्रित केली जात होती, तेव्हा दोघांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. १५ दिवसांपूर्वीच त्यांनी विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता आणि आधी केलेल्या नियोजनानुसार या विशिष्ट दिवशी लंच ब्रेकदरम्यान कल्पना, देव यांच्या सांगण्यावरून गुपचूप मोहन स्टुडिओच्या प्रॉपर्टी रूममध्ये पोहोचली. तेथे विवाह नोंदणी अधिकाऱ्याला आधीच बोलावले होते. दोन साक्षीदारही होते. त्यातील एक जण अमरजित आणि दुसरा कॅमेरामन (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) व्ही. रात्रा हे होते, असा एक अंदाज आहे. लग्नाची आवश्यक ती औपचारिकता पूर्ण करून दोघे पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज झाले. देव आनंद यांनी कल्पनाला अंगठी घातली, जी चित्रीकरण सुरू झाल्यावर रात्रा यांनी तिला लपवायला सांगितली, कारण त्याआधीच्या शॉटमध्ये कल्पनाच्या बोटात अंगठी नव्हती. त्यामुळे सातत्य राखण्यासाठी असे करणे आवश्यक होते. ५ नोव्हेंबर १९५४ रोजी ‘टॅक्सी ड्रायव्हर’ प्रदर्शित झाला. त्यामुळे देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांचे लग्न १९५४ च्या पहिल्या तिमाहीत किंवा १९५४ च्या जानेवारीत झाले असावे, असा माझा अंदाज आहे. यानंतर देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांचे ‘हाऊस नंबर ४४’ तसेच ‘नौ दो ग्यारह’ हे आणखी दोन चित्रपट आले. त्यानंतर कल्पना कार्तिक यांनी कुटुंबासाठी चित्रपटात काम करणे बंद केले. त्या कदाचित पहिल्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी काम केलेल्या सहाही चित्रपटांत देव आनंद हेच त्यांचे नायक होते. त्या अशा नायिका आहेत, ज्यांनी सर्व चित्रपटांत एकाच नायकासोबत काम केले आणि तोच नायक त्यांचा पतीही झाला.

एखाद्या चित्रपटात नायक बनणे अवघड असले, तरी चांगला पती आणि पिता बनणे त्याहूनही कठीण आहे. या लेखासाठी मला खूप संशोधन करावे लागले, कारण यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती आणि इंटरनेटवरील माहिती खरी नाही. माझी ही मेहनत व्यर्थ जाणार नाही, अशी आशा आहे. नमस्कार. जय हिंद! वंदे मातरम!

बातम्या आणखी आहेत...