आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कौमार्य चाचणीसारख्या घृणास्पद प्रथेला वगळून धनंजय-प्रियंका विवाहबद्ध

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट परंपरांना दिली मूठमाती

कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरांना विरोध करत पुणे येथे धनंजय तमायचीकर आणि प्रियंका इंद्रेकर यांचा मंगळवारी विवाह झाला. कंजारभाट समाजातील विवाहात बसणाऱ्या जात पंचायतीच्या बैठका इथे झाल्या नाहीत ना कौमार्य परीक्षा झाली. विवाहात आलेल्या नातेवाइकांना समाजातील या प्रथा-परंपरा बंद करून विवाहानंतर नवबंधनात येणाऱ्या दांपत्याला कौमार्य परीक्षा करण्यास भाग पाडू नका. सुशिक्षित कुटुंबातून या प्रथा हद्दपार करून स्त्री सन्मान करा, असे आवाहन करण्यात आले. १९९६ साली कंजारभाट समाजातील कृष्णा इंद्रेकर आणि अरुणा इंद्रेकर यांनी प्रेमविवाह करत या कंजारभाट समाजात चालणाऱ्या कौमार्य चाचणीला कडाडून विरोध केला होता. समाजातील अनिष्ट परंपरांना एका दांपत्याने उघडपणे विरोध करण्याची ती पहिलीच घटना होती. यानंतर समाजाने कृष्णा इंद्रेकर आणि अरुणा इंद्रेकर यांना समाजबाह्य केले होते. तरीही गेली पंचवीस वर्षे दोघांनी समाजातील या प्रथेविरोधातील आपला चिवट लढा चालूच ठेवला. याच दांपत्याचा आदर्श घेत धनंजय तमायचीकर आणि प्रियंका इंद्रेकर यांनी कंजारभाट समाजातील अनिष्ट परंपरा नाकारल्या आहेत. दरम्यान इंद्रेकर दांपत्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट प्रथा परंपरांवर चर्चा सुरू झाली. या प्रथांना विरोध करण्यासाठी तरुणांनी मूठ बांधली आणि स्टॉप द व्ही रिच्युअल नावाने चळवळ उभारली गेली.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा राज्यात लागू केला आहे. त्यानंतरही जात पंचायतींच्या माध्यमातून विविध जाती-जमातींमध्ये लग्न करताना मुलींची पवित्रता तपासण्याच्या नावाखाली कौमार्य चाचणीची अघोरी प्रथा सुरू आहे. या चुकीच्या प्रथांना प्रोत्साहन देणाऱ्यांच्या विरोधात जात पंचायतविरोधी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे तरच छुप्या पद्धतीने होणाऱ्या या प्रथा बंद होतील असे मुंबई मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालयातील उपसंचालक कृष्णा इंद्रेकर यांनी सांगितले.

या आहेत कंजारभाट समाजातील विवाहात प्रथा

> विवाह ठरवताना जात पंचायतीला द्यावी लागते खुशी (पैसे), नाही दिले तर विवाह अवैध ठरविण्यात येतो.

> विवाहात ही बसते जात पंचायत, त्यावेळेसही खुशी दिली जाते.

> विवाहानंतर रात्री वधूची कौमार्य परीक्षा होते

> दुसऱ्या दिवशी पुन्हा पंचायत बसते, भर पंचायतीच्या समोर वधु व्हर्जीन होती की नाही हे वराने सांगायचे असते.

> व्हर्जिन असेल तर समाजात जेवण घालून आनंद साजरा केला जातो.

> नसेल तर मुलीला माहेरी सोडून लग्न अवैध ठरविण्यात येते. इतकेच नाही तर वधुला पंच देतील ती शिक्षा भोगावी लागते. वधूच्या आई वडिलांकडून दंड वसूल केला जातो.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser