आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उग्र वास, जखमेमधलं रक्त, रस्त्यावरचा अपघात बघितला तर अनेकींना भोवळ येते. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्याकडेच अनेकींचा कल असतो. शिवाय ‘तिला’ अॅलर्जी आहे किंवा ती ‘बाई’ आहे म्हणूनही तिला हेतुपुरस्सर यापासून लांब ठेवलं जातं. मग अशा स्थितीत एखादी जर थेट पोस्टमाॅर्टेम रूममध्येच जाऊन धडकली तर? सामान्यपणे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणालाही परवानगी नसलेल्या पोस्टमाॅर्टेम रूममधून केलेला रिपोर्ताज...
वार्ताहर म्हणून काम करताना हत्या, आत्महत्या, अपघात, घातपात या घटना नवीन नसतात. छिन्नविच्छिन्न झालेली शरीरे, रक्ताची थारोळी अशा दृश्यांची डोळ्यांना आणि मनालाही हळूहळू सवय होऊ लागते. मृत्यू “कव्हर’ करणं हे रूटीन बनून जातं. पण ते कव्हरेज घटनास्थळ, रुग्णालय किंवा मृताचे घर एवढेच सीमित असते. “संबंधिताचे शव शवविच्छेदनासाठी नेले’ हे चार शब्द बातम्यांमध्ये नेहमी लिहितोही. पीएम रूमच्या बाहेर कधी ताटकळलेल्या, कधी जिवाचा कोट करून रडणाऱ्या महिला नेहमीच पाहत आले. पण पीएम रूमची भिंत या साऱ्याची सीमा होती. त्याच्यापलीकडे जाण्याचा प्रसंग कधीच आला नव्हता. त्यामुळे “बिनबायकांच्या जगा’चे वार्तांकन करण्याचे ठरले तेव्हा आठवली ती पीएम रूम.
मृत व्यक्तीचे पोस्टमाॅर्टेम नेमके कसे करतात हे जाणून घेण्याची मनात खूप इच्छा होती. मात्र पत्रकार म्हणून नोकरी करत असले तरी या ठिकाणी कधी जाण्याची हिंमत झाली नाही. मात्र यंदा या ठिकाणी जाऊन अनुभव घ्यायचे ठरले. मी मनाची पूर्ण तयारी केली.आजवर बाहेर फिरत असताना अनेक अपघात पाहिले. मात्र अजूनही पोस्टमाॅर्टेमच नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो. लहानपणी तर मृत्यूचे खूप भय, पण त्यापेक्षा जास्त भय होते मृत व्यक्तीच्या शरीराचे. दररोज ज्यांचे मृत शरीराशी काम असते अशा शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य कसे असेल ? का करत असतील ते हे काम ? काय वाटत असेल त्यांना हे सर्व करताना ? मनात अशा अनेक विचारांचे थैमान रात्रीपासूनच सुरू झाले.
पीएम रूमचे वार्तांकन करण्याचे ठरले. पण सकाळपासूनच मनात अनामिक धडकी भरली होती. २०१३ ची एक घटना मनात ताजी होती. त्या वेळी पीएम करण्यासाठी गेलेल्या डॉ. विजया चौधरी यांची तेथील कर्मचाऱ्यांनीच हत्या करून बेवारस मृतदेह म्हणून विल्हेवाट लावल्याची घटना घडली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा रुग्णालयातील पीएम रूममध्ये एकाही महिलेने पाऊल ठेवले नव्हते. या विशेष वार्तांकनासाठी पीएम रूमची निवड केल्यावर तो प्रसंग मनातून मागे सारला आणि कामाला लागले. पहिले काम होते ते “बॉडी’ येण्याची वाट पाहण्याचे. त्यानेच पहिल्यांदा मनावर दडपण यायला सुरुवात झाली. जिवंत माणसांची आपण अनेकदा वाट पाहतो, पण इथे मी मेलेल्या माणसाची वाट पाहत होते. जगाच्या दृष्टीने ती फक्त एक “बॉडी’ असणार होती. कुणाची बॉडी असेल, कशानं मृत्यू झाला असेल, आपल्याला ते बघवेल का, सहन होईल का, हे विचारचक्र डोक्यात भिरभिरू लागलं.
विचारांचे ते वादळ घेऊनच ऑफिसला आले. थोडे काम झाल्यावर अचानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदनगृहातून फोन आला : पोस्टमाॅर्टेमसाठी दोन बॉडी आल्या आहेत. माझ्या छातीत धडधड वाढली. नेहमी बातम्यांसाठी जाण्याचा रुग्णालयाचा रस्ता या वेळी अवघड वाटत होता. डोक्यातले प्रश्न सुरूच होते. कसे असेल तिथले वातावरण? कुणाची असेल ती बॉडी? या प्रश्नांपेक्षा मला ते बघून भीती तर वाटणार नाही ना?
शवविच्छेदनगृहापाशी पोहोचले. बाहेर मृतांचे नातेवाईक उभे होते. एरवी त्यांच्याशी बोलून घटनेची माहिती घेणारी मी, या वेळी थेट आतच गेले. रूम एकदम स्वच्छ होती. आत डॉ. मिलिंद बारी होते. टेबलावर दोन मृतदेह होते. एका मृतदेहाची कल्पना करीत मी रात्रीपासून भीतीवर मात करण्याचा सराव करीत होते. इथे दोन मृतदेह. कल्पनेतील चित्र आणि प्रत्यक्षातील दृश्य... छातीतील धडधड पुन्हा वाढली. हळूच दबक्या पावलांनी मी बाजूला जाऊन उभी राहिले. डॉ. बारी माहिती देत होते. एक मृतदेह ४६ वर्षीय पुरुषाचा होता तर दुसरी बॉडी २७ वर्षांच्या एका तरुणाची होती. एक शहरातील होता, एक परराज्यातील. दोघांचाही मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला. एकाचा रुग्णालयात दाखल होताच तासाभरात, तर दुसऱ्याचा रेल्वेच्या प्रवासात. म्हणून त्यांची शरीरे विच्छेदनासाठी आणली होती.
पीएम रूममधील अनिल घेंघट आणि पवन जाधव या दोन्ही कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन करायला सुरुवात केली. छातीवर चिरा मारताच मी घट्ट डोळे मिटले. दादा म्हणाले, घाबरू नकोस, याकडे एक यंत्र म्हणून बघ, मग काही होणार नाही. मी हळूहळू डोळे उघडून ते काय करतायत ते बघू लागले. माझ्या मनातील भीतीवर मात केली तशी माझी विचारांची प्रक्रिया सुरू झाली. डॉक्टर बारी आणि दादा सांगत होते, हे हृदय, ही किडनी... बोलता बोलता माझ्या मनातील भीतीचा लवलेशही उरला नव्हता. एरवी ज्या तटस्थपणे मी बातम्यांसाठी माहिती विचारते, तपशील घेते तेवढ्याच तटस्थपणे ते शव आणि शवविच्छेदनाची ती प्रक्रिया पाहत होते. एरवी संशयास्पद मृत्यूंच्या बातम्यांमध्ये आम्ही व्हिसेरा रिपोर्ट हे शब्द वापरतो. मी आज व्हिसेरा काढण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष बघत होते.
मी हळूच दादांना विचारले, इकडे महिला डॉक्टर येत नाहीत का ? त्यांनी सांगितले, डॉ. विजया चौधरी प्रकरणानंतर या ठिकाणी अनेक बदल झाले. सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले. त्यांना भीती वाटत नाही का, मी माझ्या मनातला प्रश्न विचारला. ते म्हणाले, “पहिलं पीएम केलं तेव्हा खूप भीती वाटली होती. कित्येक दिवस ते दृश्यच समोर दिसत होतं. काही दिवसांनी सवय झाली. आता तर पोस्टमाॅर्टेम करताना काहीच वाटत नाही.’ त्यांच्या या उत्तरांनी माझ्या मनाती भीती हळूहळू कमी होत गेली. तटस्थपणे पाहिले की भीती कमी होते याचा अनुभव तर काही मिनिटांपूर्वी याच पीएम रूममध्ये घेतला होता. सवयीने भीतीवर मात करता येते हेही मी इथे शिकले.या पीएम रूममध्ये कुणाकुणाची शरीरे येत असतील. महिला, पुरुष, वृद्ध, लहान चिमुरडे... विचारांच्या चक्राने दिशा बदलली होती. बाजूलाच शवागार होतं. पीएम रूममध्ये भीती चेपल्यावर मी शवागारात गेले. बरेच मृतदेह तेथे डिफ्रिजमध्ये ठेवले होते. चित्रपटात बघतो ते डिफ्रिजच्या कप्प्यातून मृतदेह बाहेर काढण्याचं दृश्य आठवलं. शवागारातील डिफ्रिज तसेच होते. थोडे गंजलेले, जुने झालेले, अनेक मृतदेह अंगावर सांभाळून जीर्ण झालेले. कर्मचारी माहिती देत होते, बेवारस मृतदेह येथे ओळख पटेपर्यंत ठेवले जातात. दोन-तीन दिवस बेवारस असलेल्या त्या देहाला वारस मिळतात. ते म्हणाले, चला दाखवतो.
त्यांच्यामागे माझी पावले वळली, पण शवागारात कुजका वास तर येत नसेल ना, मृतदेह सडलेले तर नसतील ना, या विचारांनी पुन्हा माझा कब्जा घेणं सुरू केलं. प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. मृतदेह होते, पण ना कुजका वास होता ना सडका दर्प. निर्धास्तपणे मी माहिती घेतली. तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
पीएम रूम असो वा शवागार, जेथे महिला जातच नाही, आपण कधी गेलो नाही तेथे जायचे या कल्पनेने आदल्या रात्रीपासून माझ्या छातीत थैमान घालणारी धडकी कुठल्या कुठे पळून गेली होती. भीती ही मनात असते. ती वाढवायची की त्यावर मात करून संपवायची हे आपल्यावर अवलंबून असतं हे मी तेथे अनुभवले. अर्थात, त्यासाठी मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावाच लागला. कदाचित, त्यामुळेच त्या भीतीवर मी मात करू शकले आणि बाई म्हणून पीएम रूमभोवती असलेले एक भय संपवू शकले.
‘पीएम’रुमभोवतीचे भय...
शवविच्छेदनगृह अर्थात पोस्ट मार्टेम रूम, जेथे महिला जातच नाही, अशा ठिकाणी आपण जायचे या कल्पनेने मी अस्वस्थ झाले होते खरी मात्र आदल्या रात्रीपासून माझ्या छातीत थैमान घालणारी धडकी कुठल्या कुठे पळून गेली होती.
भीती ही मनात असते. ती वाढवायची की त्यावर मात करून संपवायची हे आपल्यावर अवलंबून असतं हे मी तेथे अनुभवले. अर्थात, त्यासाठी मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावाच लागला. कदाचित, त्यामुळेच त्या भीतीवर मी मात करू शकले आणि बाई म्हणून पीएम रूमभोवती असलेले एक भय संपवू शकले.
संपर्क : ७०२०२०७६०८
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.