आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:वाचलं का?

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या नवऱ्यात अचानक एवढा बदल कसा घडला, हे आरतीला कळत नव्हतं. पण, जे घडत होतं ते तिला सुखावणारं होतं. रविवारी पहिल्यांदा जयेश सकाळी लवकर उठला. पुन्हा दाढी ट्रीम केली. स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट घालून निघाला. तिला वाटलं, जयेश आपल्यासोबत बाहेर जायचा प्लॅन करतोय. पण, तो एकटाच निघाला. ती निराश झाली. जयेशला बाहेर पडताना, ‘तू भारी दिसतोयस..’ हे सांगायला मात्र विसरली नाही. त्याला आणखी बरं वाटलं. तो ठरलेल्या कॉफी शॉपमध्ये गेला...

ज येशला ओळखणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्याची वाचनाची आवड. प्रेयसीबद्दल बोलावं तसं जयेश आवडत्या पुस्तकाबद्दल बोलतो. त्याच्या बायकोला प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवायची सवय. सगळं घर कसं नीटनेटकं हवं, हा आरतीचा आग्रह. पण पुस्तकाच्या बाबतीत मात्र ती घाबरून असायची. जयेशला पुस्तक इकडचं तिकडं केलेलं मुळीच खपायचं नाही. खरं तर वाचून माणसं बदलतात. पण ते बदल सगळ्यांचे सारखेच असतात असं नाही. काही लोक वाचून आनंदी होतात. काही लोक निराश होतात. काही लोक वक्तशीर होतात. काही लोक आळशी होतात. वाचणारा प्रत्येक माणूस वेगळा असतो. कदाचित तो जे वाचतो त्याचाही प्रभाव असेल. पण, जयेश एकूणच जड आणि जाड पुस्तकं वाचणारा. त्याच्या तोंडी येणारी नावं त्याच्या बायकोने किंवा मित्रांनी कधी ऐकलेलीही नसायची. काफ्का, बेकेट, रसेल वगैरे नावं जयेशच्या तोंडी असतात. ऐकणारा फक्त नावं ऐकूनच दडपून गेला पाहिजे. सगळ्या मित्रांना जयेशबद्दल त्याच्या वाचनामुळं आदर आहे. पण, खूप लोकांना तो रुक्षही वाटायचा. म्हणजे कुठं तरी निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर सगळे फिरत असताना जयेश नेमका वाचत बसलेला असणार. पार्टी चालू असेल, सगळे धमाल करत असतील, नाचत असतील आणि जयेश एका कोपऱ्यात सेपियन्स वाचत बसलेला असेल. मित्रमंडळी नाराज व्हायची. पण, त्याला बदलायचा प्रयत्न सगळ्यांनी सोडून दिला होता. कारण ते अशक्य होतं.

वाचनाची आवड असल्याने जयेश घरातही स्वतःच्या विश्वातच असायचा. पुस्तकांच्या जगात. आरतीला वेब सिरीज बघायचा नाद. स्वयंपाकाची आवड. गाण्याची आवड. पण, हळूहळू तिच्या लक्षात आलं होतं, की या सगळ्या गोष्टी आपण एकटीनेच करायच्या आहेत. तिला खूपदा वाटायचं की एक पुस्तक दोघांना वाचता यायला हवं. पण, ते शक्य नव्हतं. अर्थात तिची तक्रार नव्हती. जयेशचा कायम गंभीर असणारा चेहरा तिच्या सवयीचा झाला होता. ती नवीन ड्रेस घालून त्याच्यासमोर उभी असायची आणि जयेश मार्क्वेझबद्दल बोलत राहायचा. त्याच्या लक्षातही यायचं नाही की तिनं नवीन ड्रेस घातलाय. पण, आरती या गोष्टी फार मनावर घ्यायची नाही. लहान मुलाकडं बघून हसावं तशी ती हसायची. जगाची चिंता वाहणारा नवरा आपल्या नशिबी आलाय, हे तिनं खेळकरपणे स्वीकारलं. दुसरी कुणी असती तर एवढा अनरोमॅन्टिक वाटणारा नवरा सोडून गेली असती. पण, एखादा माणूस असाही असू शकतो किंवा असतो, हे तिनं मनोमन स्वीकारलं होतं. त्यामुळं दोघांचा संसार तसा सुखाचा होता. पुस्तक समजून घ्यायचा प्रयत्न केला, की त्यात गोडी वाढते. संसाराचंही तसंच. जोडीदाराला समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. खूपदा जमून जाते भट्टी... जयेश आणि आरतीचा संसार असा सुरळीत चालू होता. पण अचानक एक घटना घडली. घटना अगदी छोटी. नेहमीप्रमाणं जयेशने वाचनालयातून आवडत्या लेखकाचं एक पुस्तक आणलं. ऑफिसच्या कामातून सवड मिळाली आणि त्यानं वाचायला सुरुवात केली. त्याला खरं तर पुस्तकाचं पान मुडपलेलं असलं तरी राग येतो. पण, त्या पुस्तकात पेन्सिलनं खुणा केलेल्या होत्या. आधी जयेशला राग आला. पण त्याच्याही नकळत तो ज्या ज्या पानावर पेन्सिलने खुणा केलेल्या आहेत, ते वाचू लागला. कारण खुणा केलेल्या सगळ्या ओळी त्याला आवडलेल्या होत्या. त्याला खुणा करायच्या असत्या, तर त्या आणि तेवढ्याच ओळींखाली त्यानं त्या केल्या असत्या. आपल्या विचारांशी एवढे मिळतेजुळते विचार असणारी कुणीतरी व्यक्ती आहे, हे बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. एरवी पुस्तकांबद्दल बोलताना लोक जेव्हा आपली आवड सांगायचे तेव्हा लगेच जयेश नाराज व्हायचा. कारण आपल्याकडं वाचन म्हणजे ठराविक पाच-दहा पुस्तकंच बहुतेक लोकांना माहीत असतात...

..तर जयेश खूप वेळ त्या खुणा केलेल्या ओळी बघत बसला. अचानक त्याच्या डोक्यात विचार आला, ही कोण व्यक्ती आहे ते शोधलं पाहिजे. वाचनालयातल्या पुस्तकात ते शोधणं सोपंही असतं. आपल्याआधी कुणी पुस्तक नेलंय, हे लक्षात येतं. तशी नोंद असते पुस्तकाच्या कव्हरच्या आत. एक कार्ड असतं. त्यावर पुस्तक याआधी कुणी कुणी वाचलेलं आहे, त्याची त्या कार्डवर नोंद असते. म्हणजे त्या व्यक्तीचा वाचनालयाचा खाते क्रमांक असतो. आणि पुस्तक वाचायला नेल्याची तारीख असते. पण, त्यावरून नाव कसं कळणार? जयेशने प्रयत्न करायचा ठरवला. सुदैवाने त्याच्याआधी पुस्तक फक्त एका व्यक्तीनं वाचायला नेलं होतं. जयेश वाचनालयात गेला. तो तिथं एवढ्या वेळा जात असतो की तिथली सगळी माणसं त्याला ओळखतात. कामाशिवाय एक शब्दही न बोलणारा जयेश अशी त्याची ओळख. पण त्या दिवशी जयेशने मुद्दाम चौकशी केली. जयेशबद्दल चांगलं मत असल्यामुळं वाचनालयात असलेल्या बाईंनी आधी पुस्तक कुणी नेलं ते कॉम्प्युटरवर शोधलं. कार्ड नंबर टाकला आणि नाव आलं. प्राजक्ता दळवी. स्त्रीचं नाव ऐकून जयेश गोंधळला. खरं तर त्याला त्या व्यक्तीला भेटायचं होतं. पण, ती स्त्री आहे, हे समजल्यावर तो आता निघायच्या तयारीत होता. ती कोण आहे, हे समजून घ्यायची उत्सुकता मनात होती, पण तसं बोलून दाखवायची त्याची हिंमत झाली नाही. मग वाचनालयाच्या बाई म्हणाल्या, ‘प्राजक्ताचा नंबर देऊ का? खूप वाचत असते. तुमच्यासारख्या वाचकाची ओळख पाहिजे. तिला मार्गदर्शन होईल..’ जयेश हैराण झाला. पण एक तर त्याच्याबद्दल वाचनालयात सगळ्यांचं मत चांगलं होतं. आणि प्राजक्ता नावाची ती तरुणी वाचनालयातल्या बाईंच्या शेजारी राहणारी होती. चांगली ओळखीची होती. तिनं जयेशसमोरच प्राजक्ताला फोन करून सांगितलं, की मी एका खूप चांगल्या व्यक्तीला तुझा नंबर दिलाय. त्यांना नक्की भेट. तुला मदत होईल काय वाचायचं ते समजून घ्यायला. जयेश प्राजक्ताशी बोलला. आधी जयेशला काय बोलावं कळत नव्हतं. पण तो बोलू लागला. भेटायचं ठरलं. रविवारी.

रविवार अजून दोन दिवस लांब होता. पण, ते दोन दिवस जयेशसाठी खूप वेगळे होते. त्या दोन दिवसांत जयेश पहिल्यांदा आरशासमोर खूप वेळ उभा राहिला. खूप वेळा उभा राहिला. पहिल्यांदा त्यानं दाढी ट्रीम केली. आरतीने वाढदिवसाला दिलेला पण एकदाच घातलेला स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट प्रेस करून घेतला. आरती हे सगळं बघत होती. आपल्या नवऱ्यात अचानक एवढा बदल कसा घडला, हे तिला कळत नव्हतं. पण जे काही घडत होतं ते तिला सुखावणारं होतं. रविवारी पहिल्यांदा जयेश सकाळी लवकर उठला. पुन्हा दाढी ट्रीम केली. स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट घालून निघाला. खरं तर तिला वाटलं, जयेश आपल्यासोबत बाहेर जायचा प्लॅन करतोय. पण, जयेश एकटाच निघाला होता. आरती निराश झाली. पण काही क्षण. बाहेर पडताना जयेशला ‘तू भारी दिसतोयस..’ हे सांगायला विसरली नाही. जयेशला आणखी बरं वाटलं. तो ठरलेल्या कॉफी शॉपमध्ये गेला. प्राजक्ता बसलेली होती. प्रसन्न आणि अतिशय सुंदर दिसणारी तरुणी. जयेश मनोमन सुखावला. त्यानं विषय काढला. पेन्सिलने केलेल्या खुणा. पण, प्राजक्तानं सांगितलं की तिनं ते पुस्तक वाचलंच नाही. वाचायला नेलं, पण वेळच मिळाला नाही. मग तसंच परत केलं. जयेश निराश झाला. पुढं फार बोलायलाच उरलं नाही. जयेश बिल देऊन निघून गेला...

आरती घरी गाणं ऐकत बसलेली. जयेश एक तर लवकर आलाय आणि निराश दिसतोय म्हणून तिनं हेडफोनवर चालू असलेलं गाणं बंद केलं. त्याला विचारलं. जयेश निराश सुरात म्हणाला, या पुस्तकावर कुणी खुणा केल्यात कळत नाही. आरती अपराधी चेहऱ्यानं म्हणाली, ‘चार-पाच दिवसांपूर्वी कंटाळा आला म्हणून ते पुस्तक वाचायला घेतलं.. खूपच आवडलं.. मग ते सगळं दोन दिवसांत आपल्या डायरीत लिहून ठेवायचं ठरवलं. आणि खुणा करत सुटले. जे जे आवडलं ते..’ आरती खरं तर रडायच्या बेतात होती. तिला माहीत होतं जयेशला ते आवडलेलं नसणार. पण, घडत वेगळंच होतं. जयेश एकटक तिच्याकडं बघत होता. त्याच्या लक्षात आलं, की आपण फक्त पानं उलटत राहिलो. मन लावून वाचलंच नाही... आताही आरतीचे भावुक डोळे तो बघतोय. त्याच्या लक्षात आलं, आपण जिब्रान, मार्क्वेझपेक्षाही काहीतरी भारी समोर असून वाचलंच नाही... जयेश आता लोकांना पुस्तकं सुचवतो, पण आवर्जून एक प्रश्न विचारतो.. ‘आपल्या माणसांच्या डोळ्यात पण खूप भारी पुस्तक असतं. ते वाचलं का? वाचायला हवं!’

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com

बातम्या आणखी आहेत...