आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटची पंचविशी:डिजिटल भारत हे कॉँग्रेसच्या धोरणाचे फलित...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कुमार केतकर

माहिती-माध्यम क्रांतीच्या लाटेवर आरुढ झाल्याशिवाय भारत खऱ्या अर्थाने विज्ञान युगात येणार नाही असे निवेदन करुन राजीव गांधीनी टेक्नॉलॉजी मिशन्स स्थापन केले होती. परंतु जवळपास सगळ्याच डाव्या-उजव्या पक्षांनी आणि स्वयंघोषित विद्वानांनी राजीव गांधी, सॅम पित्रोदा अशा अनेक प्रभृतींची कॉम्प्युटर बॉइज म्हणून खिल्ली उडवली होती. ‘ही श्रीमंत विदेशी खेळणी भारतीय संस्कृतीच्या काय कामाची’ या प्रश्नापासून ते ‘हा अमेरिकेचा सॉफ्टवेअर साम्राज्यवाद आहे’ असे निरुपण करण्यापर्यंत उजव्या-डाव्यांची मजल गेली होती. याच तत्रंज्ञानातील इंटरनेटच्या पंचवीस वर्षाच्या प्रवासात मागे वळून पाहताना इतकेच वाटते की, तंत्रज्ञान वापण्याची सुसभ्यता आणि सुसंस्कृतपणा समाजात निर्माण होणे हे आजच्या घडीला महत्वाचे आहे.

१९९५ साली मी महाराष्ट्र टाइम्समध्ये मुख्य संपादक होतो. त्यादरम्यान जरी भारतात संगणक, इंटरनेट आले असले तरी तंत्रज्ञानाची पातळी एकदम निकृष्ट दर्जाची होती. उदाहरण सांगायचे तर टाइम्स सारख्या ग्रुपमध्ये पहिल्या पानावर रंगीत फोटो छापणे शक्य नव्हते. परदेशात घडलेल्या एखाद्या घटनेचा फोटो जरी इंटरनेटवर उपलब्ध असला तरी तो डाउनलोड करणे शक्य नव्हते. जरी तो डाउनलोड झाला तरी तो पेज मेकिंगमध्ये घेता येत नव्हता. १९९७ ची गोष्ट सांगायची तर प्रिन्सेस डायनाचा अपघात जेव्हा झाला होता त्यावेळी रंगीत फोटो आम्हाला इंटरनेटवर मिळाला. त्यानंतर तो फोटो आम्ही डाऊनलोड करुन प्रिंट काढली आणि गाडीने तो कांदिवली प्रेसमध्ये पाठवली त्यानंतर तो प्रिंट करता आला. त्यावेळी कोणतीही गोष्ट आपल्याला शेअर करता येत नव्हती.

इंटरनेट किंवा तत्रंज्ञानाची अशी अवस्था ही फक्त भारतातच होती असे नाही तर हीच अवस्था जगभर होती. याचेच एक उदाहरण सांगायचे तर १९९६ मध्ये जेव्हा मी अमेरिकेची निवडणूक कव्हर करायला गेलो होतो त्यावेळचे सांगता येऊ शकेल... तिथेही तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेतच होते.

वॉशिंग्टनला टाइप केलेली बातमी वेस्टर्न युनियनच्या टेलिग्राफच्या ऑफिसमध्ये जाऊन द्यावी लागत होती. आमच्याकडे त्याकाळी प्रत्येक कंपनीने टेलिग्राफचे कार्ड दिले होते. ते कार्ड बघून ते आपली बातमी टेलिग्राफने टाइप करुन आपल्याला पावती द्यायचे. मग टेलिग्राफीच्या पद्धतीने ही बातमी भारतात पाठवली जायची. खूपच वेळ घेणारी ही पद्धत होती. अमेरिकेतूनही मेलवरुन बातमी पाठवणे शक्य नव्हते. म्हणजे यावरुन मला इतकेच सांगायचे आहे की, जरी भारतापेक्षा आधी अमेरिकेत संगणक आणि इंटरनेट आले असले तरीही ते भारताइतक्याच प्राथमिक अवस्थेत होते.

त्यामुळे १९९५ साली भारतात इंटरनेट आले असले तरी त्याचा खरा प्रसार किंवा वापर २००० नंतरच सुरु झाला. त्याकाळी फॅक्स मशीनसुद्धा सगळीकडे उपलब्ध नसायची. त्यामुळे फोनवरुन बातम्या सांगितल्या जायच्या. अमेरिकेतूनही फॅक्स करावा लागत होता आणि ही प्रक्रिया खूप महागडी होती. पुढे २००० साली देखील मी अमेरिकेत वार्तांकनासाठी गेलो होतो. त्यावेळीही बातम्या फॅक्सनी पाठवल्या जायच्या. तिथले फॅक्सही इतके बॅकवर्ड होते की रात्री अमेरिकेतून फॅक्स केला तर पहाटे तो फॅक्स भारतात पोहोचायचा. आता आपण इंटरनेट किंवा मोबाइल फोनशिवाय काम करणे इमॅजिन करु शकत नाही तसा काही प्रश्नचं नव्हता.

भारतात मात्र हे तंत्रज्ञान सर्वव्यापी करण्यासाठी कॉँग्रेसची भूमिका महत्वाची होती. भारतीय जनता पक्षाचा या संगणक, इंटरनेट तंत्रज्ञानाला प्रचंड विरोध होता. इतकेच नाहीतर मोबाइल फोनलाही सुरुवातीला त्यांनी प्रचंड विरोध केला होता. तंत्रज्ञान भारतात येऊ नये म्हणून सबंध देशभरात भारतीय जनता पक्षाने मोहिमा राबवल्या होत्या.

वेगवेगळ्या वास्तवातून प्रतिरुप वास्तवाकडे आणि त्यातून आपले वास्तव बदलण्याच्या विलक्षण सामर्थ्यांकडे माहिती-माध्यम क्रांतीने आपल्याला आणले आहे. या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे महत्व हे भारतातील बुद्धीवादी वर्गालाही उशिरा आले. संगणकाचे तत्रज्ञान, संगणक, इंटिग्रेटेड सर्किटस् आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक साहित्य आयात करणे सुलभ व्हावे म्हणून १९८५-८६ साली राजीव गांधीनी अनेक सवलती जाहिर केल्या होत्या. माहिती-माध्यम क्रांतीच्या लाटेवर आरुढ झाल्याशिवाय भारत खऱ्या अर्थाने विज्ञान युगात येणार नाही असे निवेदन करुन राजीव गांधीनी टेक्नॉलॉजी मिशन्स स्थापन केले होते. परंतु जवळजवळ सगळयाच डाव्या-उजव्या पक्षांनी आणि स्वयंघोषित विद्वानांनी राजीव गांधी, सॅम पित्रोदा प्रभृतींची ‘कॉम्प्युटर बॉइज’ म्हणून कुचेष्टा केली होती. ही ‘श्रीमंत विदेशी खेळणी’ भारतीय संस्कृतीच्या काय कामाची...? या प्रश्नापासून ते हा ‘अमेरिकेचा सॉफ्टवेअर साम्राज्यवाद’ आहे असे निरुपण करण्यापर्यंत उजव्या-डाव्यांची मजल गेली होती. आयबीएम कॉम्प्युटर कंपनीला हाकलून लावणे हे क्रांतिकारी लक्षण तेव्हा मानले जात होते.

सॅम पित्रोदाच्या शिफारसीनुसार, भारतातील पोस्ट अँड टेलिग्राफ खाते हे टेलिकॉम खात्यापासून विभक्त करुन आधुनिकीकरणाची व खाजगीकरणाची प्रक्रिया राजीव गांधीच्या कारकिर्दीत सुरु झाली नसती, तर भारत आज इंटरनेटच्या सायबरस्पेसवर अवतरलाच नसता. मनमोहन सिंह आणि नरसिंहराव यांच्या पुढाकाराने मोबाइल भारतात आला. या सर्व तंत्रज्ञानाच्या विरोधात देशभर असंख्य संप आणि चळवळी झाल्या होत्या. १९९८ मध्ये संगणक, इंटरनेटच्याविरोधात बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठे संप केले होते. अगदी १९९८-९९ मध्ये वर्तमानपत्राच्या अनेक कर्मचारी, पत्रकार यांनी संगणकाच्या, इंटरनेटच्या विरोधात संप केले होते. त्यामुळे १९९५-२००० या काळात तंत्रज्ञान हे भारतात खूपच प्राथमिक अवस्थेत होते. पण जेव्हा १९९८ मध्ये भारतीय जनता पक्षांचे सरकार स्थापन झाले त्यावेळी त्यांना तत्रंज्ञानाची गरज किती आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी त्यांची चूक सुधारली. प्रमोद महाजनांनी तंत्रज्ञान नाकारणे ही आमची चूक होती असे जाहीर भाषणात कबूल केले आणि त्यानंतर भाजपनेही याचे स्वागत केले. १९९५ ते २००४ पर्यंत संगणक आणि इंटरनेट हे लोकांमध्ये रुजलेले नव्हते पण २००४ मध्ये जेव्हा कॉंग्रेसचे सरकार आले त्यावेळी या तंत्रज्ञानाचा अगदीच वेगाने विकास झाला.आज जो काही तंत्रज्ञानाचा विकास झालेला दिसतोय ते सर्व २००४ ते २०१४ या कालावधीतील कॉँग्रेसच्या धोरणांचे फलित आहे. मोदी सरकार ज्यावेळी सत्तेत आले त्यावेळी मोठ्या प्रमाणात इंटरनेट आणि संगणकाचा प्रसार झाला होता. पण सध्याच्या मोदी सरकारला वाटते की इंटरनेट, संगणक आणि मोबाईलचा शोध हा भारतीय जनता पक्षाने लावला आहे. त्यांनीच तंत्रज्ञानाचा विकास केलाय असा त्यांचा समज झाला आहे.

माहिती-तंत्रज्ञान क्रांतीच्या प्रसारामुळे नोकऱ्या कमी होतील, ही भिती संगणकाच्या आणि इंटरनेटच्या आगमनामुळे निर्माण झाली होती. ही भिती किती व्यर्थ होती, हे आता सिद्धच झाले आहे. माहिती तंत्रज्ञान आता फक्त एका वर्गासाठी मर्यादित राहिले नाही. समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये माहिती तंत्रज्ञान आता पोहोचले आहे. एका काळात टेलिफोन, रंगीत टीव्ही, केबल चॅनेल्स, संगणक, मोबाइल फोन आपल्याकडे चैन-चंगळवादाच्या गोष्टी मानल्या जात होत्या. त्यांच्यामुळे आपले जीवन आज अधिक संपन्न व कार्यक्षम झाले आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जग एकत्र यायला मदत झाली. तंत्रज्ञान कधीच वाईट नसते तर पण सत्तेच्या हाती तंत्रज्ञान गेल्यानंतर त्याचा वापर कसा केला जातो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण आज या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन जो उन्माद पसवला जातोय ते पाहून इतकेच वाटते की तंत्रज्ञान वापण्याची सुसभ्यता आणि सुसंस्कृतपणा समाजात निर्माण होणे हे आजच्या घडीला महत्वाचे आहे.

ketkarkumar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...