आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नोटाबंदीनंतर रोख व्यवहार कमी होऊन डिजिटल व्यवहार वाढतील, त्यातून आपोआपच रोख व्यवहार कमी करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात नोटाबंदीनंतरच्या प्रत्येक वर्षात नोटा वाढतच आहेत. बँकांऐवजी बाजारातच पैसा फिरतोय. डिजिटल व्यवहारांचाही फज्जा उडाला. कोरोनाकाळात तर गेल्या चार वर्षापेक्षा सर्वाधिक नोटा चलनात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी जाहीर केली. तेव्हापासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. यानंतर डिजिटल व्यवहारांसाठी सरकार आग्रही होते. आॅनलाइन पेमेंट सोपे करणारे अनेक मार्ग सुरू झाले. मार्च २०२० पर्यंत यात वाढही सुरू होती. मात्र, एप्रिल २०२० पासून यात मोेठी घट सुरू झाली. रोख व्यवहारांकडे ओढा वाढल्याचे रिझर्व्ह बँकेच्या “रिझर्व्ह मनी कंपोनंट अँड सोर्स’ या जानेवारीच्या अहवालातून समोर आले आहे.
कोरोनात रोख व्यवहार :
कोरोनाकाळात बाजारपेठा बंद होत्या. मोठ्या प्रमाणात ई-पोर्टलवर खरेदी झाली. नोटांना स्पर्श टाळण्यासाठी अधिकाधिक ऑनलाइन व्यवहार झाल्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. २३ मार्च २०२० ला लॉकडाऊन जाहीर झाला त्या वेळी २४.३९ लाख कोटी चलन बाजारात होते. यापैकी २३.४१ लाख कोटी (९६%) नागरिकांच्या हातात (करन्सी विथ पब्लिक) तर उर्वरित ९७.५ हजार कोटी बँकांत जमा (करन्सी विथ बँक्स) होते. १८ डिसेंबर २०२० रोजी नागरिकांच्या हातात २६.८२ म्हणजे एकूण चलनाच्या ९६.५८% नोटा होत्या. मार्चनंतर चलनी नोटा तर वाढल्याच, शिवाय बँकेऐवजी घरातच पैसा साचवण्याची प्रवृत्ती आली.
डिजिटल व्यवहार घटले :
अहवालानुसार ३१ डिसेंबर २०२० रोजी बाजारात २७.७ लाख कोटी मूल्यांच्या नोटा चलनात होत्या. डिसेंबर २०१९ मध्ये ही संख्या २२.७ लाख कोटींच्या नोटांएवढी होती. वर्षभरात ५ लाख कोटी म्हणजेच २२ टक्क्यांनी चलनात नाेटा वाढल्या. नोटाबंदीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात चलनी नोटा बाजारात आल्या. मार्च २०२० पासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये नगदी व्यवहार वाढल्याचे हे द्योतक आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.