आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज महात्मा गांधीजींची जयंती:‘मुन्नाभाई’सोबत ‘बापू’ही शिकले करुणा! महात्मा गांधींची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा आतला आवाज...

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिलीप प्रभावळकर
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात महात्मा गांधीजींची भूमिका साकारली होती दिलीप प्रभावळकर यांनी. या चित्रपटानंतर देशभरात गांधीगिरीची लाट उसळली. गांधीजींची भूमिका साकारताना काय आव्हानं आली, गांधीजींची तत्त्वं प्रभावळकरांनी प्रत्यक्ष आयुष्यातही कशी जगली आणि आजही ते त्याचा कसा अनुभव घेतायत, हे त्यांच्याच शब्दांत...

तो नट उत्तम, जो कोणतीही भूमिका साकारताना योग्य ती अलिप्तता राखू शकतो आणि तटस्थता पाळू शकतो, असे अनेक ज्येष्ठ अभिनेते म्हणतात. मला ते मान्य आहेच. त्यामुळे ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात महात्मा गांधी ही व्यक्तिरेखा साकारताना, अशी अलिप्तता, तटस्थता मी जरूर राखली. मात्र, या व्यक्तिरेखेची तयारी करताना, जो अभ्यास केला, त्यातून आणि प्रत्यक्ष त्या चित्रपटातूनही मला करुणा, सहानुभूती, बंधुभाव आणि सहसंवेदना यांचे अर्थ अधिक तीव्रतेने उमगले. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता चौदा वर्षे लोटली, तरीही गांधीजी साकारताना जो अभ्यास झाला, त्यातून उमगलेल्या या मूल्यांचा प्रत्यय मला सातत्याने येतोचंय.

इतक्या वर्षांनंतरही या भूमिकेविषयी मला सतत विचारणा होते, त्या व्यक्तिरेखेविषयी बोलले जाते. मला वाटते, की गांधीजींनी जी मूल्ये आपल्या समाजजीवनाला सांगितली, त्या करुणा, बंधुभाव, सहानुभूती आणि सहसंवेदना या मूल्यांचाच हा प्रभाव आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना, मी गांधीजींच्या विषयी जे वाचन केले, जे ऐकले, पाहिले त्यातून या मूल्यांचे भान जागे राहिले.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू म्हणत, की नटाने कुठलीही भूमिका करताना अलिप्तपणा राखला पाहिजे. पुरेशी तटस्थता बाळगली पाहिजे. मला हे पटते आणि मी आजवर ज्या ज्या भूमिका केल्या, त्या वेळी मी हे भान जागे ठेवूनच, त्या केल्या. तरीही कधी कधी एखादी भूमिका तुम्हाला सगळ्यापलीकडे जात स्पर्श करून जाते. हा केवळ त्या व्यक्तिरेखेचा प्रभाव नसतो तर त्यासाठी नट जी तयारी करतो, त्या प्रक्रियेचेही धागे त्या स्पर्शात असतात.

“मुन्नाभाई’मधील गांधीजींप्रमाणेच मला ‘चौकट राजा’, ‘नातीगोती’ नाटकातला मतिमंद मुलाचा बाप, ‘रात्र आरंभ’ मधील दुभंग व्यक्तिमत्त्व, ‘हसवाफसवी’ मधील शेवटचा म्हातारा... अशा मोजक्या व्यक्तिरेखांनी स्पर्श केला आहे. मुन्नाभाईतील गांधीजी साकारताना मी बरेच वाचन केले. गांधीजींची भाषणे वाचली. त्यांचे जुने चित्रीकरण अभ्यासले. त्यानंतर भूमिका साकारली.

या साऱ्या एकत्रित परिणामांतून मुन्नाभाईला दिसणारे गांधीजी मी पडद्यावर साकारले. सुरुवातीला मला या भूमिकेचे टेन्शन आले होते, कारण राष्ट्रपित्याची अशी भूमिका मी प्रथमच करत होतो. सगळ्या जगासमोर असणारी नजीकच्या इतिहासातील ती जगन्मान्य महान व्यक्ती होती. मी साकारत असलेले गांधीजी कन्व्हिन्सिंग वाटले पाहिजेत, अशी अट मी स्वतःलाच घातली होती. हेच मोठे आव्हान माझ्यासाठी होते. सुदैवाने ही भूमिका कन्व्हिन्सिंग झाली. मला राष्ट्रीय सन्मान देणारी ठरली. इतकेच नाही, तर या चित्रपटाने गांधीगिरीची सर्वव्यापक लाट निर्माण केली.

ग्रेटनेस नव्याने कळला
नट जेव्हा कुठलीही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर, कॅमेऱ्यासमोर साकारत असतो, तेव्हा तीन पद्धतींनी ती भूमिका पाहिली जात असते. पहिले म्हणजे तो नट स्वतः, ती भूमिका पाहत असतो. दुसरे म्हणजे जी भूमिका साकारली जात असते, ती व्यक्तिरेखा आणि तिसरे म्हणजे समोरून किंवा कॅमेऱ्यातून पाहणारी नजर (ती प्रेक्षकांची किंवा कॅमेरामन, दिग्दर्शकाची) हे लक्षात घेतले, तर मी असे म्हणेन, की गांधीजी साकारताना मी कौशल्याने तो आभास निर्माण केला. या प्रक्रियेने मला त्यांचा ग्रेटनेस नव्याने कळला. मला सत्य, अहिंसा, शांतता, प्रेम, करुणा, मिष्किलपणा..यांचे महत्त्व उमगत गेले.
शब्दांकन : जयश्री बोकील

बातम्या आणखी आहेत...