आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शरीर दिव्यांग असले तरी मन निरोगी आणि खंबीर असले की जीवनात आनंदाचे सूर धरता येतात. त्यात ‘मनोबल’ सारख्या संस्थेकडून बळ मिळाले की ‘पंगुं लंघयते गिरिम्’ हे संस्कृत वचन शब्दश: खरे होते, याचा प्रत्यय जळगावमध्ये येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ममता शर्माने आणून दिला आहे. ममता पूर्णपणे अंध असून ३० नोव्हेंबरलाच ती विवाहबद्ध झाली आहे.
जन्मांध असलेली ममता झारखंडची. तिची मोठी बहीणही गतिमंद आहे. वडिलांनी व्यसनामुळे घरादारासह स्वत:चा जीवही गमावलेला. तेव्हा कुटुंबाची जबाबदारी ममताने आपल्या खांद्यावर घेतली. जन्मजात अंधत्व देतानाच निसर्गाने तिला गोड असा सुरेल गळाही दिला आहे. त्याच गळ्याचा उपयोग करून ती ऑर्केस्ट्रात गाणे गायला लागली. त्यामुळे तिला जगण्याचाही सूर गवसला. त्याच वेळी तिच्या अंध डोळ्यांना अधिकारी होण्याचे स्वप्न पडू लागले. त्या अनुषंगाने माहिती घेताना तिला झारखंडच्याच वंदना शर्मांच्या माध्यमातून जळगावमधील दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ उपक्रमाची माहिती मिळाली आणि ती थेट जळगावात येऊन धडकली. तिच्या राहण्याची आणि प्रशिक्षणाची सोय ‘मनोबल’च्या यजुर्वेंद्र महाजन यांनी केली. पुढच्या आठवड्यात तिची रेल्वेची परीक्षा आहे. ‘मनोबल’ मध्ये आपल्याला मानसिक बळ आणि मार्गदर्शनही मिळाले. त्यामुळे येणारी परीक्षा आपण उत्तीर्ण करू आणि आपणही रेल्वेत नोकरीला लागू, असा मोठा विश्वास तिने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
सोमवारीच झाला विवाह
‘दिव्य मराठी’शी बोलताना ममता आनंदात होती. ती म्हणाली की, कालच ३० नोव्हेंबरला माझा विवाह झाला. माझे पतीही अंध आहेत आणि म्हणून ते मला आणि मी त्यांना नीट सांभाळून घेऊ. ते स्वत: रेल्वेची परीक्षा देऊन सेवेत रुजू झाले आहेत. मलाही ते प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे मीही लवकरच रेल्वेत नोकरी सुरू करू शकेन. ‘मनोबल’ संस्थेमुळेच आज मी या पातळीवर येऊन पोहोचले आहे, असेही ती म्हणाली.
आम्हीही प्रेरित झालो आहोत
प्रचंड संकट असतानाही कसं आनंदाने जगावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ममता आहे. मनोबलमध्ये देशभरातून असे विद्यार्थी येतात व त्यांचे भविष्य उज्ज्वल करतात. त्यातून खरे तर आम्हीसुद्धा प्रेरणा व जीवनाचे धडे घेतो. यजुर्वेंद्र महाजन, संचालक, दीपस्तंभ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.