आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोव्याचे ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामदोर मावजो यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. मावजो हे लघू कथाकार व कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ्यांनी अत्यंत निर्भीडपणे भारतभर उसळलेल्या मुलतत्ववादालाच आपल्या वैचरिक लिखाणामधून हात घातला. कोकणीला राज्यभाषेचा दर्जा मिळण्याचे आंदोलन असो की, गोव्याला राज्याचा, मावजो १९६७ पासून गोव्याच्या सांस्कृतिक राजकारणातले एक कार्यकर्ते आहेत. पुरस्कार वापसी आणि डॉ. गणेश देवी यांचे ‘दक्षिणायन’, यांतही ते प्रत्यक्ष सामील झाले आणि आपली बांधिलकी लख्ख केली.
भाषेवरचे प्रेम माणसाला काय काय करायला लावते..... स्वातंत्र्य लढा, स्वतंत्र्य राज्याची मागणी, राजभाषेचा दर्जा आणि त्या भाषेतच लेखन! गोव्याच्या असंख्य लोकांनी कोकणी बोलतच या साऱ्या गोष्टी पार पाडल्या. त्यांना त्या मिळाल्या. त्यात एक नवी भर पडली. दामोदर मावजो यांना भारताला सर्वात प्रतिष्ठित असा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीबद्दल मिळाला. १९६१ साली गोवा स्वतंत्र भुभाग झाला. केंद्र प्रशासित प्रदेशाकडून स्वतंत्र राज्य म्हणून गोव्याचे परिवर्तन झाले. पोर्तुगिजांच्या जुलमी व धर्मांध राजवटीने कोंकणीची मुस्कटदाबी केलेली. त्यामुळे गेल्या ६० वर्षांत ही भाषा रुजली रुळली आणि रुंदावली. इतकी की २००६ आणि २०२१ अशा १५ वर्षांत तिने दोनदा ज्ञानपीठ जिंकले. तसा हा पुरस्कार टाईम्स ऑफ इंडिया छापणाऱ्या बेनेर कोलमन अँड कंपनीच्या मालकीचा. तो सरकारी नाही. मात्र, त्याचा मान भला दांडगा. थाटमाट, बडदास्त अन् भपका खूप. मध्यमवर्गीय लेखकांना भुरळ पाडणारा. गांधीजींना ‘नोबेल’ मिळाले नाही म्हणून त्यांची थोरवी जशी कमी झाली नाही. तशी ज्ञानपीठ लाभले नाही म्हणून कित्येक लेखकांची कीर्ति ओसरली नाही. कधी कधी हाही पुरस्कार भलत्याच साहित्यिकांना मिळाला. कधी चांगल्या लेखकांचीही वर्णी लागली. त्यातले मावजो एक. दोन वर्षांपूर्वी त्यांचे एक इंग्रजी पुस्तक ‘इंक ऑफ डिसेंट’ प्रकाशित झाले. त्याचे परीक्षण कुठेतरी वाचल्यावर ते मागवले. मुखपृष्ठावरच्या छायाचित्रात अतिशय प्रेमळ, नम्र आणि शांत वाटणारा हा लेखक स्वत:ची मते व भुमिका यावर फार ठाम असल्याचे दिसले. माजोर्डा या गावी एक किराणा दुकान चालवणारा हा माणूस तटस्थ, दूरस्थ अन् स्वस्थ बसणारा नाही हेही जाणवले. त्यांची ‘कार्मेलीन’ कादंबरी माहित होती. पण हे त्यांचे ‘टाईम्स ऑफ इंडिया’मधले लेख, काही भाषणे आणि निबंध यांचे पुस्तक लेखकाची सामाजिक व राजकीय बांधिलकी कशी असते ते सांगणारे ठरले. पोर्तुगीजांच्या कब्जातून गोवा मुक्त करण्याचे आंदोलन समाजवाद्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यामुळे गोव्यात लोहियावादी कार्यकर्ते भरपूर. रविंद्र केळेकर हे पहिले ज्ञानपीठ विजेते लेखकही त्याच वैचरिक प्रभावाखालचे. मावजो यांना तोच वारसा घ्यावासा वाटला. त्यांनी अत्यंत निर्भीडपणे भारतभर उसळलेल्या मुलतत्ववादालाच आपल्या वैचरिक लिखाणामधून हात घातला.
या ‘इंक ऑफ डिसेंट’चे मनोगत ते ‘म्यूजिंग्ज ऑफ अॅन अॅक्टिव्हिस्ट’ म्हणजे एका कार्यकर्त्याची विचारमग्नता या शीर्षकातून सांगतात. ते म्हणतात की, मी एक लेखक आहे. तरीही मी नैमित्तिक लेखन करीत असतो. माझे काही विचार ठाम आहेत. ते माझे तत्वज्ञान समजा. माझ्यासारख्या लेखकांप्रमाणे मी विद्यमान सामाजिक-सांस्कृतिक चौकटीत वावरतो. पण एक लेखक म्हणून मला अन्य विषयांचा अभ्यास करणेही आवडते. राजकारण त्यापैकी एक. नैतिक पोलिसगिरीच्या नावाखाली आपला छुपा कार्यक्रम रेटणाऱ्या प्रतिगामी उजव्या मूलतत्ववादी संघटनांचा मी तिरस्कार करतो. एक साहित्यिक म्हणून मी जर अशा कारवायांकडे कानाडोळा केला तर त्यांना बळच मिळेल. त्यांच्याशी भिडायला मला आवडते. मात्र, राजकारणात जाऊन वा निवडणूका लढवून नव्हे तर भाषणे व लेखन यांद्वारे. रविंद्र केळेकर या आमच्या ज्येष्ठ लेखकाने याची प्रेरणा मला दिली. ते म्हणत की, रायटरने फायटर असलेच पाहिजे.
दामोदर यांना सबंध गोवा भाई मावजो म्हणते. भाई हे खास समाजवादी, साम्यवादी संबोधन. आपल्या कथांमध्ये आपले तत्वज्ञान प्रकटत असते असे मावजो म्हणतात. त्या प्रमाणे त्यांच्या लेखनात गोव्यापुढील असंख्य प्रश्न येत-जात राहतात. म्हाका कित्याक पोडलं? ही त्यांची कथा झुंडीने एखाद्या व्यक्तीला ठार मारण्याचा घटनेवर आहे. गरीब, उपेक्षित, काठावरचे लोक मावजो यांच्या कथांमध्ये असतात. मोनषांच्या गावात, बर्गर या कथाही अशाच. त्यामुळे झाले असे की, मावजो यांना धमक्या मिळू लागल्या. त्यांना पोलिस संरक्षणात राहावे लागले. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनांत आणि भाषणात डॉ. दाभोलकर, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनांचा वारंवार उल्लेख करुन उजव्या अतिरेकी संघटनांवर टीका केली. गोव्यातले सनातन संस्थेचे केंद्र आणि बॉम्बस्फोट यांकडे त्यांनी बोट दाखवायला सुरुवात केली. हिंदुत्व असो की, ख्रिश्चनिटी वा इस्लाम अथवा कोणताही धर्म, गोव्याची बदनामी करणारी कृत्ये निषेधार्ह आहेत. मी तेच निषेधाचे काम करतो. असे ते लिहतात. मडगाव येथला बॉम्बस्फोट व्यवस्थित तपासला गेला असता तर पुढचे सारे मृत्यू झाले नसते असा त्यांचा दावा आहे. ‘उदारमतवादी मुल्यांना धोका’ या शीर्षकांच्या लेखात भाई म्हणतात की, काय खावे, लेवावे व काय बोलावे याचे स्वातंत्र्य मानणारा मी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही पुरस्कर्ता आहे. माझ्या भारताची कल्पना भारतीय राज्य घटनेच्या मूल्यांवर उभी आहे. धर्म, जात, उच्चनीचता यांवरचे भेदाभेद मी साफ धुडकावतो. आजचे नेतृत्व भारताच्या बहुविधतेला धोक्याचे असल्याचे मी नेहमी सांगत असतो. आपल्या जीवाला अशा प्रकारचा धोका असला तरी आपण खूपदा वाचलो असे सांगताना मावजो म्हणत्यात की, १९९१ साली त्यांना ह्रदयविकाराचा पहिला झटका आला. त्यातून ते वाचले. सहा वर्षांनी दुसरा अनपेक्षितपणे आला. मग मुंबईला जाऊन बायपास करावी लागली. त्यानंतर २००७ साली कर्करोग मागे लागला. त्यातूनही बाहेर पडलो. तर आता भलतेच संकट अंगावर आले. आधी डॉक्टर व परिचारिका यांच्या गराड्यात असायचो, आता सुरक्षा रक्षकांच्या. मला तर बुवा त्यांच्यातही इस्पितळात असल्यासारखे वाटते. सारे काही ठीकठाक झाले तर त्यातूनही तरुन जाईन, असे ते लिहतात. कोकणीला राज्यभाषेचा दर्जा मिळण्याचे आंदोलन असो की, गोव्याला राज्याचा, मावजो १९६७ पासून गोव्याच्या सांस्कृतिक राजकारणातले एक कार्यकर्ते आहेत. पुरस्कार वापसी आणि डॉ. गणेश देवी यांचे ‘दक्षिणायन’, यांतही ते प्रत्यक्ष सामील झाले आणि आपली बांधिलकी लख्ख केली. भाई कॅथलिक नाहीत. मात्र त्यांच्या कथा व कादंबऱ्या कॅथलिक पात्रांनी भरगच्च असतात. ग्रामीण व शहरी गोवे त्यांच्या लेखनातून प्रकट राहते.
मावजोंसह आसमचे कवी नीलमणी फुकन हेही ज्ञानपीठ विजेते (साल-२०२०) म्हणून जाहीर झाले. ‘इंक ऑफ डिसेंट’ पुस्तकात मावजो यांनी ‘ए गोवन इन असम’ हा एक लेख लिहिला आहे. २०१३ सालच्या आसम वाङ्मय पुरस्कारावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केलेले ते एक भाषण आहे. भाषा व संस्कृती यांची गळचेपी दोन्ही राज्यांनी सारखीच भोगली. असा त्यांचा मुद्दा होता. आणखी एक स्थलांतरीत नागरिकांचा प्रश्नही गोवा व आसम यांचा सारखा आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
मात्र गोवेकरांनी या बाहेरच्यांना स्वीकारले आणि पुढची वाट धरली, हे सांगायला भाई विसरले नाहीच. नवी दिल्ली येथे झालेल्या एका चर्चासत्रात गोव्यावर तुटून पडणाऱ्या पर्यटकांमुळे गोवेकरांना होणारा त्रास, पडीक जागांचा शहरीकरणासाठी होत जाणारा वापर, पाण्याचा स्त्रोतांचा अतिवापर, पर्यावरणाची हानी, मादक पदार्थांचा वाढता व्यापार, वेश्या व्यवसाय, खंडणीखोरी अशा प्रश्नांचाही त्यांनी उल्लेख केला.
एका छोट्या राज्याच्या हा सर्जनशील प्रतिनिधी वयाच्या ७७ व्या वर्षी हा पुरस्कार मिळाल्यावर कोकणी भाषेतच गोव्याच्या वृत्तमाध्यमांशी बोलताना दिसला. या भाषेनंच आपल्याला भरभरुन दिले. अशी कृतज्ञता भाईंच्या चेहऱ्यावर उजळलेली दिसली.
jaidevdole@yahoo.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.