आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Divya Marathi Ground Report From Pargaon Jogeshwari Village, Where Leopard Attacked On People : The Whole Village Is Inside The House At 7 Pm, The Terror Of Leopards For 24 Hours In Village

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:अख्खं गाव सातच्या आत घरात, २४ तास बिबट्याची दहशत...; आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरीत कोरोनाची धास्ती नव्हती तितकी आता भीती

गणेश दळवी | पारगाव जोगेश्वरी (आष्टी)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकाच रेषेवरील गावात बिबट्याने केले हल्ले; सुर्डी गावातील वाघदरा भागात घेतला पहिला बळी

रात्री ७.४५ वाजेची वेळ. गावात स्मशानशांतता. एरव्ही ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर राजकीय गप्पांचा फडच रंगायचा. पण आता वन विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांशिवाय एकही ग्रामस्थ दिसेना, हे चित्र आहे नरभक्षक बिबट्याने हल्ला करून दहशत पसरवलेल्या पारगाव जोगेश्वरीतील. काेराेनाच्या कचाळातही कधी गाव इतके भयभीत नव्हते ते आता जाणवत आहे. अख्खं गाव सातच्या आत घरात अन् सकाळी नऊ वाजता समूहाने लोक फिरत आहेत.

आष्टी तालुक्यातील पारगाव (जोगेश्वरी) १२०० लाेकसंख्या असलेले हे गाव बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर सर्वत्र चर्चेत आले. एकाच दिवशी दाेन वेगवेगळे हल्ले करून एका महिलेचा जीव बिबट्याने घेतला असून दुसरीला जखमी केले. भयावह परिस्थितीचा हा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी “दिव्य मराठी’ प्रतिनिधीने गावात एक रात्र काढली तेव्हा बिबट्याची दहशत गावाच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आली.

गावात सध्या ८० वन अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहेत. बिबट्याच्या शोधासाठी अधिकारी शेतात गेले की, गावात फक्त वन विभागाचे दत्तात्रय चव्हाण, वनरक्षक बाळासाहेब मोहळकर, वनपाल अरिहंत सोनकांबळे, वनरक्षक बिभीषण टापरे, वाहनचालक हे असतात. पारगाव जोगेश्वरीसह सुर्डी, किन्ही, पाटसरा, मैंदा, मोरोळा ही गावे डोंगरी तर किन्ही, बावी, बेलगाव, बीडसांगवी, मंगरूळ, चिखली, हनुमंतगाव, रुटी, इमनगाव वाळुंज, टाकळसिंग या गावांत बिबट्याची दहशत आहे.

नगरमधून आला बिबट्या

नगर, मढी, पैठण या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. उसाच्या फडातच बिबट्याची मादी पिलांना जन्म देते. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उसाच्या पिकात पाणी साचून राहिले. त्यामुळे बिबट्याला उसात राहता आले नाही. त्यामुळे नगर-पैठण भागातून हा बिबट्या आष्टी तालुक्यात आल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.

माणसाच्या रक्तात क्षार

आष्टी तालुक्यातील बिबट्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली आहे. कारण तृणभक्षी असलेल्या हरिण, ससे या प्राण्यांच्या रक्तात क्षारांचे प्रमाण कमी असते. केवळ माणसाच्या रक्तात क्षारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे रक्त खारट असते. याची चटक सध्या बिबट्याला लागली असल्याचे वन विभागाचे अधिकारी सांगतात.

शिवारात हरणाचे शिकार केल्याचा वन विभागाचा अंदाज

एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर बिबट्या ७२ तासांनी पुन्हा शिकार करतो, असा दावा वन विभाग करत आहे. तो पुन्हा हल्ला करेल तेव्हा त्याला पकडण्याच्या तयारीत अधिकारी-कर्मचारी आहेत. पारगाव जोगेश्वरी परिसरातच आम्हाला एका हरणाचे काही केस दिसून आले आहेत. यावरून त्याने हरणाची शिकार केली असावी, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम सिरसाठ यांनी व्यक्त केला.

दोन घटनांमुळे वाढली भीती

गावातील शालन भोसले (६५) यांच्यावर २९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता बिबट्याने हल्ला केला. पुतण्याने त्याला हुसकावून लावल्याने त्या वाचल्या. पण सायंकाळी ६ वाजता रेखा नीळकंठ बळे (५५) यांना मात्र ठार केले. त्यांचा मृृृतदेह तुरीच्या शेतात एक तासाने आढळून आला होता. या दोन घटनांनंतर गावात प्रचंड भीती पसरली आहे. दरम्यान, बिबट्या जेरबंद होईपर्यंत लोकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सरपंच वैशाली कदम यांनी म्हटले.

एक्सपर्ट व्ह्यू : बेशुद्ध करण्यासाठी आडोशाची जागा हवी : नवाब शफाअत अली खान

बीडमधील आष्टी, पाटोदासारख्या भौगोलिक परिसरात या बिबट्यांना त्यांचे नियमित भक्ष्य सहजपणे मिळत नाही आणि भुकेने व्याकूळ झाल्यास बिबट्या माणसांवर हल्ले करण्यास प्रवृत्त होतो. दुसऱ्या प्राण्याच्या शिकारीच्या तुलनेत माणसावर हल्ला करणे नरभक्षक झालेल्या बिबट्याला सोपे वाटते. परिणामी या हल्ल्यांच्या घटनांत वाढ होत राहते, अशी माहिती शार्प शूटर नवाब शफाअत अली खान यांनी दिली.

ते म्हणाले, बीड जिल्ह्यातील या भागात बिबट्याला खाण्यासाठी सहज उपलब्ध होईल, असे भक्ष्य नाही. किमान एक शिकार रोज करण्याची सवय असलेला आणि भटकून अडचणीच्या ठिकाणी आलेला बिबट्या जेव्हा भुकेने व्याकूळ होतो तेव्हा नाइलाजाने तो माणसावर हल्ले करू लागतो.

बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी आडोशाची जागा हवी. जो पिंजरा आहे तोही सुस्थितीत असायला हवा. शिवाय १५ ते २० किमी अंतरात ४० कॅमेरे, १० पिंजरे लावणे आवश्यक आहे. पकडण्याचे सर्व पर्याय आजमावूनही कामी आले नाही तर वन विभागाच्या परवानगीने त्याला मारण्याचा निर्णय घ्यावा लागतो. मोकळ्या जागेत बिबट्याला पकडणे आव्हानात्मक आहे.

आता बिबट्यामुळे वाटोळे

बिबट्यामुळे गाव त्रस्त आहे. काही करून त्याला जेरबंद करा. आमच्या हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक आमच्या हातात येईल, नसता कोरोनामुळे आमचे वाटोळे झाले, आता बिबट्यामुळे होईल. नकुल गुरव, पूजारी, मंदिर, पारगाव.

मारण्यासाठी परवानगी द्या

बिबट्या सध्या कोणत्याच प्राण्याची शिकार करत नसून तो फक्त माणसांवरच हल्ले करत आहे. त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली आहे. त्यामुळे सरकारने त्याला मारण्याची परवानगी द्यावी. सुरेश धस, आमदार, आष्टी

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser