आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:आधी बहिष्कार, नंतर बाशिंग; अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय भाऊबंदकी विकोपाला

राजू मुलाणी | अकलूज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, नगरपरिषदेचा मुद्दा ऐरणीवर, मूलभूत प्रश्नांची चर्चा

अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने येथील पंचवार्षिक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय झाला होता. पण ऐनवेळी येथे निवडणूक लागली. भाऊबंदकीचा हा राजकीय संघर्ष विकोपाला गेला असून ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून सत्तेत असलेल्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांच्या पॅनलच्या विरोधात त्यांचे दिवंगत बंधू माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाने पॅनल उभा आहे.

सहकार, ग्रामविकास, सांस्कृतिक क्षेत्रात देशभरात नावलौकिक असणारे अकलूज राज्याच्या राजकारणात नेहमी महत्त्वाच्या भूमिकेत राहिले आहे. गांधीवादी व काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांनी अनौपचारिकरित्या व त्यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह मोहिते यांनी औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर येथील राजकारण ढवळून निघाले आहे. मोहिते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या विरोधकांना बारामतीच्या पवारांनी आपसूकपणे जवळ केले. विजयसिंह मोहिते यांचे धाकटे बंधू स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील हयात असतानापासून या दोन्ही भावंडांमध्ये राजकीय संघर्षाला सुरुवात झाली होती. तो संघर्ष प्रतापसिंह यांचे चिरंजीव डॉ. धवलसिंह मोहिते यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीतही कायम ठेवला आहे. विजयसिंह मोहिते यांचे चुलतबंधू फत्तेसिंह माने, माजी आमदार चांगोजीराव देशमुख यांचे चिरंजीव पांडुरंगराव देशमुख यांनी डॉ. धवलसिंह यांना सोबत घेऊन विजयसिंह मोहिते यांच्या पॅनलच्या विरोधात त्यांचे दिवंगत बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाने पॅनल उभा केला आहे.

प्रचारपत्रिकेवर कर्मवीर, महर्षी आणि धर्मवीर

कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, धर्मवीर सदाशिवराव माने-पाटील, विजयसिंह मोहिते, जयसिंह मोहिते अशा रथी-महारथींनी सरपंचपद भूषविलेली अकलूज ग्रामपंचायत संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरते. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील विकास पॅनलच्या विरोधात लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील परिवर्तन आघाडी असा सामना अकलूजात रंगला आहे. कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व धर्मवीर सदाशिवराव माने-पाटील या तिघा सख्ख्या भावांच्या बंधूप्रेमाचे किस्से आजही चर्चेत आहेत. यामागे बाह्य शक्तींची रसद असल्याची चर्चाही रंगत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पॅनलच्या प्रचारपत्रिकांवर कर्मवीर, सहकारमहर्षी आणि धर्मवीर या तिघा बंधूंचे फोटो आहेत.

मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

अकलूज गावात मूलभूत सुविधा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यात सत्ताधाऱ्यांनी आजवर दुर्लक्ष केले आहे. कोणताही घटक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. अकलूजमध्ये पाणी, गटारी, रेशनकार्ड, रस्ते व अन्नधान्य पुरवठा या महत्त्वाच्या समस्या आहेत. या सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एकत्रित येऊन हा पॅनल उभा केला आहे. - डॉ. धवलसिंह मोहिते, पॅनलप्रमुख, लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील परिवर्तन आघाडी

विकासाला नव्याने चालना

अकलूज नगरपरिषद झाल्यानंतर येथील विकासाला आणखी नव्याने चालना मिळणार आहे. परंतु आमचे विरोधक सुडाचे राजकारण करून अकलूजच्या विकासाला खीळ घालत आहेत. नगर परिषद होण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरले होते# विरोधकांनी ही निवडणूक लावून संपूर्ण गावाचा अपमान केला . - धैर्यशील मोहिते, पॅनलप्रमुख, सहकारमहर्षी व विजयसिंह मोहिते-पाटील विकास पॅनल

यामुळे होतेय निवडणूक

अकलूजचे नगरपरिषदेत रूपांतर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येथील निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात असे पत्र राज्य शासनाने निवडणूक आयोगाला दिले होते. नगरपरिषद झाल्यानंतर पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे जावे लागेल या धास्तीने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शेवटच्या घटकेला ८९ उमेदवारी अर्ज आल्याने येथे निवडणूक लागली.

बातम्या आणखी आहेत...