आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Madhurima Special Article | Nita Kulkarni Special Article Divya Marathi | Marathi News | Why Does This Happen?

मधुरिमा स्पेशल:असे का घडते?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनातील सहनशीलता, सकारात्मकता, नकाराचा स्वीकार अशी मूल्ये तरुणांमध्ये रुजवण्यात कोण कुठे कमी पडले? आईवडील, शिक्षक की समाज?

नातेवाइकांच्या मदतीने प्रियकराला जाळून मारण्याच्या घटना अलीकडे घडल्या. इतके दिवस पीडितेच्या भूमिकेत असणारा स्त्री वर्ग क्रौर्याची सीमा कशी काय गाठू शकतो? इर्ष्या, द्वेष यांचं शेवटचं टोक गाठायला प्रवृत्त करणारं ‘प्रेम’ असू शकतं? की आजकालच्या पिढीमध्ये संयम, त्याग याचा लवलेश शिल्लक नसल्याचे हे लक्षण आहे? संबंधित घटनांची विविधांगी चर्चा करणारा लेख...

आ पले षड्रिपू आपल्या ताब्यात असावे असे अनेक मोठ्या लोकांनी आपल्याला सांगून ठेवले आहे. या वाक्यात खूप अर्थ दडलेला आहे. षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर व लोभ हे होय. त्यातील क्रोध हा रिपू, म्हणजेच शत्रू. याकडे जर आपण पाहिले तर जेव्हा तो अनावर होतो आणि पराकोटीला जातो तेव्हा हातून काहीतरी वाईट घडण्याची शक्यता दाट असते. हा राग आपल्याला रसातळाला नेऊ शकतो हे दर्शवणारी अनेक उदाहरणे समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत किंवा घडत आहेत की, या रागामुळे आणि मनातील द्वेषभावनेमुळे समोरच्या व्यक्तीचा जीवच घेतला जातो. त्या वेळी त्या व्यक्तीचे विचार विवेकहीन असतात. आणि ते कृत्य घडते. हा पराकोटीचा राग, तिरस्कारच याला कारणीभूत असतो. अगदी क्षुल्लक कारणावरून किंवा अपमानाचा बदला म्हणून हे कृत्य घडते. ऑनर किलिंग हा एक असाच प्रकार आहे. वयात आलेला मुलगा-मुलगी स्वेच्छेने लग्न करतात, तर नातेवाईक हे लग्न त्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवतात. ‘सैराट’ हा सिनेमा या विषयावरच आधारित आहे. पालकांना सांगावेसे वाटते, तुमच्या मुला-मुलींची आपापसात लग्न करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला पटत नसेल तरी ऑनर किलिंगच्या नावाखाली एकाला किंवा दोघांना मारणे हा पर्याय अतिशय वाईट आहे. ‘मियां बीबी राजी तो क्या करेगा काजी’ या म्हणीनुसार इतर नातेवाइकांनी हस्तक्षेप करणे सोडून दिले पाहिजे. त्यापेक्षा सत्य स्वीकारून आनंदाने त्यांचे लग्न लावून दिले पाहिजे. खोटी प्रतिष्ठा जपल्यामुळे केवळ आणि केवळ दुःखच वाट्याला येते हे लक्षात असावे.

अशा घटना वृत्तपत्रातून आपण असंख्य वेळा वाचतो. एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात मुलीवर तिच्या प्रियकराने चाकूने वार केले, तिच्या तोंडावर अॅसिड फेकले, तिच्यावर बलात्कार करून तिला मारले अशी घृणास्पद कृत्ये वाचताना आपल्या अंगावर शहारे येतात. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मुलींनी आपल्या नातेवाइकांच्या मदतीने आपल्या प्रियकराला जाळल्याच्या घटना घडल्या. आता ही घटना वरील घटनांपेक्षा परस्परविरोधी घटना आहे. इतके दिवस मुली, स्त्रिया पीडित गटात मोडत होत्या. मात्र आता हा उलटा प्रकार सुरू झाला आहे. हा इतका क्रोध का? यात नेमकी चूक कोणाची? जरी चूक असली तरी कायदा हातात घ्यायचा का? असे असंख्य प्रश्न या घटनांच्या अनुषंगाने मनात येतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमाला ‘ब्रेक’ लागतो. साहजिकच आईवडील मुलीचं लग्न दुसरीकडे ठरवतात. ते पाहून मुलाचा इगो आड येतो. लग्नामध्ये व्यत्यय आणून मुलगा ते लग्न मोडतो. कदाचित तो तिला ब्लॅकमेल करीत असावा. या गोष्टीचा राग, आपले लग्न मोडले याचा राग मनामध्ये खदखदत असल्याने नातेवाइकांच्या पाठिंब्याने मुलाला मारण्याचा प्रयत्न मुलीकडून केला जातो.

यातून एक गोष्ट मात्र लक्षात येते की, आजच्या तरुणांमध्ये नकार पचवण्याची क्षमताच नाही. अनेक कुटुंबांत आपण बघतो की, बालपणापासून मुलांना हव्या त्या गोष्टी दिल्या जातात. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत नाही. त्यांना एखाद्या गोष्टीवर नाही म्हटले तर ते मुळीच चालत नाही. अशा वर्तनाचे बीज बालपणीच पेरलेले असते की काय, अशी शंका येते. विशेषतः प्रेमाच्या बाबतीत समोरच्या व्यक्तीचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचा अघोरी विचार येतो म्हणजे काय? कायदा हातात का घ्यावा लागतो? आता बरेच कायदे स्त्रियांच्या बाजूने असलेले दिसतात. कायदा आपल्या पाठीशी आहे म्हणजे आपण काही करू शकतो असा समज काही स्त्रियांचा होऊ शकतो. आपल्या जीवनातील मूल्ये उदाहरणार्थ - सहनशीलता, सकारात्मकता, एखाद्याने दिलेला नकार सहज मान्य करणे. अशा प्रकारची मूल्ये तरुणांमध्ये रुजवण्यात कोण कुठे कमी पडले? आईवडील, शिक्षक की समाज? पालक आणि शिक्षक यांच्या ताब्यात मुले असतात. अशा वेळी त्यांना घडवताना दूरदृष्टीने काही गोष्टी शिकवायला हव्यात. मनाचा संयम खूप महत्त्वाचा आहे. अशा महत्त्वाच्या जीवनमूल्यांचा वस्तुपाठ मुलांसमोर ठेवणे हे पालक-शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य आहे. नागरिकशास्त्रामध्ये जसे नागरिकांची कर्तव्ये, हक्क आणि असंख्य गोष्टींची माहिती असते.

त्यामध्ये गुन्हा व त्यावरील कायदे याबद्दलदेखील माहिती त्यांच्या अभ्यासक्रमात असावी. इतर विषय तर ते शिकत असतात, पण त्याचबरोबरीने अध्यात्म हादेखील एक विषय असायलाच हवा. मन शांत राहण्यासाठी त्याची गरज आहे. कायदा हातात घेऊन मारून टाकण्याच्या घटना घडण्यामागे कायदा हेच कारण आहे का? की कायद्यावरील अविश्वास? कारण अशा घटना घडल्यानंतर गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा होण्याचा जो कालावधी आहे तो खूप मोठा असतो. तोपर्यंत घटनेची तीव्रता कमी झालेली असते. खटल्याचा निकाल लागण्यास होणारी दिरंगाई हेच तर त्याचे कारण नाही? असाही प्रश्न पडतो. कायदा स्वतःच्या हातात घेऊन ‘एक घाव दोन तुकडे’ करण्याकडे कल वाढतो आहे. त्या क्षणाला व्यक्ती अविवेकी असते. तिला परिणामांचे भान नसते. कुटुंबाचा विचार नसतो. भविष्याचा विचार नसतो. त्यामुळे केवळ अशा घटना घडल्यानंतर फक्त हळहळण्यापेक्षा असे का घडते याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. नेमकी चूक कुठे होते याचा शोध घ्यायला हवा. तरच याला आळा बसेल. हे कुठेतरी थांबेल.

प्रेम हे अत्यंत नाजूक असते, परंतु त्याचबरोबर त्यागासारखी महत्त्वाची गोष्टदेखील स्वभावात असायला हवी. अशा प्रकरणांमध्ये काही वेळेस एकतर्फी प्रेम असते. अशा वेळी सत्याची जाणीव झाल्यानंतर अत्यंत मोठ्या मनाने बाजूला व्हायचे असते. आपल्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीला सुरूवात करायची असते. एकाच गोष्टीत अडकून राहिल्यामुळे हा पझेसिव्हनेस येतो. एकतर्फी प्रेमात आपले प्रेम समोरच्यावर लादू नये. अशा प्रकारे बळजबरी करून प्रेम मिळवायचे नसते. त्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचा नकार असला तर सहजपणे बाजूला व्हायचे असते. जे प्रेम क्रूरतेकडे नेते ते प्रेम नसतेच मुळी. जीवनामध्ये याहीपेक्षा खूप आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत हे तरुणांना कळायला हवे. अशा गोष्टींमध्ये गुंतून राहून आपण आपले जीवनच व्यर्थ घालवतो आहे याची जाणीव व्हायला हवी. असले कृत्य करून आपण स्वतःसकट अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहोत याची जाणीव व्हायला हवी. एखाद्याचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?त्यामुळे सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे क्रोध आणि ईर्षा त्यातून घडणारे क्रौर्य यावर विजय मिळवायलाच हवा. त्यामुळे गमतीने पण महत्त्वाचे असे म्हणावेसे वाटते की, अरे छोडो, ये प्यार नहीं मिला तो क्या, और सही! असे खिलाडूवृत्तीने स्वीकारून पुढे गेलात तर जीवनाचे नक्कीच सोने होईल...

नीता कुलकर्णी संपर्क : ९४२२७४९८७२

बातम्या आणखी आहेत...