आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनु-बंध:अफगाणी स्त्रियांची वेदना मांडणारी मौखिक कविता

भरत यादवएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासातील तमाम चढउतारांव्यतिरिक्त अफगाणी महिलावर्गात हजारो वर्षांपासून दोन ओळींच्या कवितांची मौखिक परंपरा चालत आली आहे. आपल्याकडील जात्यावरच्या ओव्यांसारखीच ही परंपरा म्हणता येईल. अफगाणी स्त्रियादेखील आपली सुखदुःखे-वेदना अशा काव्यओळींमधून मांडत आल्या आहेत.

इतिहासातील तमाम चढउतारांव्यतिरिक्त अफगाणी महिलावर्गात हजारो वर्षांपासून दोन ओळींच्या कवितांची मौखिक परंपरा चालत आली आहे. आपल्याकडील जात्यावरच्या ओव्यांसारखीच ही परंपरा म्हणता येईल. अफगाणी स्त्रियादेखील आपली सुखदुःखे-वेदना अशा काव्यओळींमधून मांडत आल्या आहेत.आपल्या आशाआकांक्षा,इच्छा आणि भावनांना त्या प्रखरपणे व्यक्त करत आल्या आहेत. यात पुरूषांच्या दृष्टीआड घराच्याबाहेर सखींच्या भेटीगाठीत त्या एकमेकींना एकमेकींचे ऐकवत व ऐकत आल्या आहेत.

अमेरिकेच्या पोएट्री फाऊंडेशनच्या प्रतिष्ठित पोएट्री नियतकालिकाने अफगाणी स्त्रियांच्या याच काव्यपरंपरेवर एक विशेष अंक प्रकाशित केला होता. अमेरिकन पत्रकार आणि कवयित्री एलिझा ग्रिसवोल्ड आणि छायाचित्रकार सीमस मर्फी यांनी या कविता-ओव्या संकलीत आणि अनुवादीत केल्या आहेत. त्यांनी २०१४ साली 'आय एम द बेगर आॅफ वर्ल्डःलेंदेज फ्राॅम कंटेपरेरी अफगाणिस्तान' हे पुस्तक प्रकाशित केले. या कामाकडे जगभरातून आदराने पाहिले जाते. त्याच पुस्तकातील या काही निवडक कविता...

तू मला एका म्हाताऱ्या माणसाला

विकलेस अब्बू

खुदा तुझे घर बरबाद करो

मी तर तुझी लेक होते

जेव्हा बहिणी बसतात एकत्र

थकत नाहीत भावांचं कौतुक करताना

भावांपाशी मात्र त्यांच्यासाठी एक

चांगला शब्दपण नाही

त्यांना फक्त बहिणी विकणं

ठाऊक आहे

मी आपल्या प्रियकराच्या

रक्तानं गोंदवून घेईन

आणि त्याच्या सौंदर्यापुढे

बागेतला प्रत्येक गुलाब

लज्जेनं झुकेल

तुझं नशीब फुटकं की

आला नाहीस काल रात्री

मी खाटेवरच्या चटईलाच

माणूस मानून घेतलं

तुझे डोळे डोळे नाहीत

मधमाशा आहेत

कुठले असे मलम नाही

जे करू शकेल इलाज

त्यांच्या डंखावर

चल चुंबून घेते तुला

डाळिंबाच्या बागेत

लोक समजतील की

एखादी बकरी झोंबली

असेल झाडीत

कधीपासून हाका मारतेय

आणि तू दगड होऊन पडलायंस

एक दिवस शोधत राहाशील मला

तोवर मी गेलेली असेन

लेकी,

अमेरिकेत नद्यांमध्ये तर

पाणीच नसते

पोरींना जग भरायचा असेल तर

इंटरनेटजवळ जातात त्या

खुदा तुला नदीकाठी

उगवलेलं फुल बनवो

जेव्हा जेव्हाही मी

पाणी भरायला जाईन

तुला हुंगत हुंगत राहीन

तहान लागेल तेव्हाही मी

पाण्याला तोंड कशी लावू

प्रियकराचं नाव जे लिहिलंय

हृदयावर,

धुवून न जावो पाण्याने कदाचित

स्वप्नात मी पाहिलं

मी देशाची राष्ट्रपती आहे

जेव्हा जागी झाले

समजलं की जगभरात

भीक मागत फिरते आहे

माझं शरीर मेंदीच्या पानांसारखं

ताजंतवानं आहे

बाहेरून हिरवंगार

आतून कच्चं धडधडतं मांस

या खुदा,

तू माझ्यावर

अन्याय केलायंस

बाकी सगळ्या पोरी

फुल होऊन फुलल्या आहेत

मी गाठोड्यासारखी बांधलेली

राहून गेलेयं कळी ती कळीच

तू मला शाळेला नाही पाठवत

मग मी डाॅक्टर कशी बनेन

पण विसरू नकोस

की कधीतरी तू पण

आजारी पडशील

हे खुदा

व्हाईट हाऊसला जमीनदोस्त

कर आणि त्या व्यक्तीला उचल

ज्याने क्रूझ मिसाईल डागलेत

आणि राखेत बदलवून टाकला

माझा देश

हे खुदा

तालिबानला नेस्तनाबूत कर

ज्यामुळे संपुष्टात येतील त्यांच्या लढाया

ज्याने अफगाणी बायकांना

बनवलं आहे एकतर विधवा

किंवा वेश्या.

----------------------

हिंदी अनुवाद (ज्येष्ठ हिंदी साहित्यिक यादवेंद्र पांडे)

मराठी अनुवाद (भरत यादव)

-----------------------

संपर्क - 9890140500

बातम्या आणखी आहेत...