आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:एक बंदपाकिट.. प्रतिकूलतेच्या जाणिवेचं मोल सांगणारं ..!

संदीप जाधव (दिग्दर्शक)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी स्वभाव- प्रवृत्तीचा कानोसा घेताना लक्षात येतं की, माणूस आनंद खूप जल्लोषात साजरा करतो. पण, एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत मात्र तो दोन पावलं मागे सरकतो. हीच दोन पावलं तो पुढे सरकला, तर त्याच्या हातून काहीतरी वेगळं, विधायक घडू शकतं. याचाच प्रत्यय आमच्या या लघुपटाचं ‘बंदपाकिट’ उघडल्यावर येईल. आम्हीही या निमित्ताने एक पाऊल पुढं टाकल्यानं सामाजिक संदेश देणारी दर्जेदार कलाकृती निर्माण करु शकलो.

एका आगामी लघुपटाची तयारी करीत होतो. वेगवेगळ्या विषयावर या क्षेत्रातल्या अनेक मित्रांशी चर्चा सुरू होती. याच दरम्यान माझे स्नेही अभिजित अधटराव यांचा फोन आला. त्यांच्या डोक्यात एक संकल्पना होती. त्यांनी ती फोनवरूनच सांगितली. विचार केला, की हा विषय आजतागायत संदेश स्वरूपात फिरला आहेच, पण याचं लघुपटाच्या रूपात कोणी अद्याप सादरीकरण केलं नव्हतं. मग सुरू झाला कथाविस्तार. अभिजित यांनी त्यांच्या पद्धतीने कथा मांडली. कथेच्या संकल्पनेत एक अत्यंत सुंदर संदेश असल्यानं, ती थोडी विस्तारित करून तिचा आवाका वाढवायचा, असं ठरवलं. मी याठिकाणी मुद्दामच कथेबाबतचा आशय मांडत नाही. कथांश समजल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष लघुपट पाहताना मजा वाटणार नाही. रुग्ण आणि त्याला भेटायला येणाऱ्या लोकांभोवती फिरणाऱ्या आशयावरुन या ‘बंदपाकिटा’चा काही अंदाज बांधता येऊ शकतो.

अगदी कमीत कमी पात्रांत उत्तम काम करून, ती कथा दृश्य स्वरूपात सादर करायची, असे आम्ही ठरवले होते. कथेवर काही सिनेसंस्कार केले. शॉर्टफिल्मच्या अनुषंगाने पटकथेत काही बदल करत ती अंतिम टप्प्यात आणली. मग सुरू झाली पात्रांसाठी शोध मोहीम. फोनवरच्या संभाषणात मीच दिग्दर्शन करावं, या हट्टापोटी हे आव्हान मी स्वीकारले होते. त्यातच अभिजित यांनी मीच प्रमुख भूमिका करावी, असा आग्रह केला. पण, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारताना गोंधळ होऊ शकतो, याची मला जाणीव होती. मग म्हणून आम्ही अगदी नाटकाच्या तालमीप्रमाणे सराव सुरू केला. बऱ्याच पात्रांची योजना अभिजित यांनीच केली असल्याने माझे बरेच काम हलके झाले होते. अतुल पेठे सरांनी लिहिलेल्या आणि मी दिग्दर्शित केलेल्या ‘शीतयुद्ध सदानंद’ या नाटकाचा मागच्याच काही महिन्यांत प्रयोग झाला होता. त्यातीलच बरीचशी पात्रे मिळाल्याने भट्टी चांगली जमून आली. पात्रयोजना उत्तम झाल्याने आणि सर्व जण परिचित असल्याने तालीम जोमात सुरू होती.

कथास्थळे हा यातील महत्त्वाचा आणि जरासा कठीण असा भाग होता. परंतु, हा प्रश्न आमचे स्नेही छायाचित्रणकार संजीवकुमार हिळ्ळी यांनी चुटकीसरशी सोडवला. त्यांच्या परिचयाचे डॉ. विशाल गोरे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. डॉक्टरांना आम्ही कथा सारांश सांगितला. त्यांनाही तो आवडला. कथास्थळासोबत एका पात्राच्याही निवडीचा प्रश्न तिथेच सुटला. त्यांना ‘बंदपाकिट’मधील डॉक्टर करण्याची विनंती केली. डॉ. गोरे हे मुळातच कलावंत. त्यांनी लगेच होकार दिला. तालमीसाठीही त्यांनी हॉस्पिटलमधील जागा उपलब्ध करून दिल्याने प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी आम्हाला तशी अडचण आली नाही.

या लघुपटाच्या चित्रीकरणावेळी आम्हाला मुख्य अडचण होती, ती म्हणजे कोरोना संसर्ग. कारण यातील एक कथास्थळ होतं सराफ बाजार. कोरोनाने जोर धरला असल्याने चित्रीकरणावेळी आम्हाला नक्कीच गर्दीच्या ठिकाणी अडचण येणार, याची जाणीव होती. त्यामुळे रीतसर परवानग्या घेऊनच काम करण्याचे ठरवले. सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमनी यांनीही आम्हाला परवानगी दिली.

यापूर्वी दिग्दर्शक म्हणून बऱ्याचशा लघुपटाचे काम केले असल्याने तशी मोठी अडचण आली नाही. लघुपट अथवा चित्रपट करताना तो प्रथम कागदावर उतरणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने केल्या होत्या. निर्मितीपूर्व, प्रत्यक्ष निर्मिती आणि निर्मितीनंतरच्या प्रक्रिया यात अभिजित यांचीही मोलाची साथ होती.

या लघुपटात अनेक कलाकारांनी भूमिका केल्या. त्यात माझ्यासह वैशाली बनसोडे, अभिजित अधटराव, मंजुळा अधटराव, डॉ. विशाल गोरे, तेजस पुजारी, भक्ती अधटराव यांनी प्रमुख भूमिका वठवल्या आहेत. कथेतील एक पात्र खरोखरच खूपच महत्त्वाचं होतं, ते म्हणजे एक ८-१० वर्षांचा मुलगा. जो संपूर्ण चित्रीकरणावेळी तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून बेडवर झोपणार होता. तेही कोणतीही हालचाल न करता. त्यामुळे ते पात्र साकारणारा आमचा बालकलावंत तेजस पुजारी याचे विशेष कौतुक वाटते. यातील बरेच कलाकार पहिल्यांदाच काम करत होते, मात्र सर्वांनी आपापल्या भूमिका व्यवस्थित निभावल्या.

लघुपटाचे चित्रीकरण पुण्यात स्थायिक असणारे, पण मूळचे अक्कलकोटचे असणारे संजीवकुमार हिळ्ळी यांनी अत्यंत उत्तमपणे केले आहे. नैसर्गिक प्रकाश योजनेत त्यांनी हे चित्रीकरण केले. संकलन ‘रेडू’ सिनेमाचे दिग्दर्शक सागर वंजारी यांच्या पुण्यातील ब्लिंक मोशन पिक्चर्स येथे केले. संकलक शोएब शेख यांनी ‘बंदपाकिट’साठी उत्कृष्ट संकलकाचा पुरस्कारही पटकावला. या शॉर्टफिल्मचे ध्वनिमुद्रण पुण्यातील संगीतकार तेजस चव्हाण आणि ‘शाळा’ सिनेमाचे संकलक महांतेश भोसागे यांच्या भागीदारीतील रिझोनान्स स्टुडिओत केले आहे. एखादी कलाकृती उत्तम होण्यासाठी उत्तम लोकांची तीव्र गरज असते. ती साकारण्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करीत असतात. त्याप्रमाणे या लघुपटालाही अनेकांचे सहाय्य लाभले. अशा सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो.

प्रामाणिक प्रयत्नांना मिळते साथ

आमच्या या ‘बंदपाकिट’ लघुपटाला आजतागायत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पण तरीही, प्रत्येक नवी कलाकृती तयार करताना मी पुन्हा शून्यातून सुरूवात करतो. त्यामुळे कायम जमिनीवर राहायची सवय लागली आहे. आपल्या प्रामाणिक प्रयत्नाने अनेक उत्तम माणसे आपोआप आपल्याला जोडली जातात. इथे एक गोष्ट अगदी मनापासून सांगावी वाटते, की चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. तो ज्याच्या सोबत असतो, त्याची किंमत नेहमीच जास्त असते. आजवर प्रत्येक वेळी मला याचा अनुभव आला आहे.

संपर्क : ९८६०२०५१३०

बातम्या आणखी आहेत...