आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं:उच्चारिला मौनी अवघाचि कल्लोळ ...

संतोष शेणईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तिशः राजू देसले हे माणूसप्रिय आहेत. अवघ्यात रमणारी ही व्यक्ती आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील कलावंताना स्वतःशी जोडून ठेवले आहे. ही 'बांधिलकी' त्यांच्यालेखी खूप महत्त्वाची आहे. तो त्यांच्या जगण्याचा पाया आहे. यातूनच महाराष्ट्रात सर्वदूर त्यांचा सतत संवाद सुरू असतो. ही कविता या संवादाची आहे. त्यामुळेच ही कविता राजू देसले या व्यक्तीविषयी बोलतानाच आसपासच्या साऱ्यांविषयी बोलू लागते.

राजू देसले यांच्या 'अवघेचि उच्चार' या संग्रहातील कविता प्रथम वाचनात अत्यंत आत्मनिष्ठ वाटत असते खरी, पण कविता वाचून पूर्ण होते तेव्हा तीमधील समष्टीनिष्ठेचा उच्चार झालेला असतो. ही एक सुंदर गंमत आहे. संग्रहाच्या शीर्षकातूनही हेच व्यक्त होते. 'अवघा' म्हणजे 'सगळे', तसेच 'प्रत्येकजण'. 'अवघाचि काळ जरी सजे । तरी अवघेचि होती राजे ।' ही 'दासबोधा'तील (१८.१०.४) खूण आठवा. म्हणजे एकाच वेळी आसपासच्या सर्वांचा एकत्र आणि त्याचबरोबर त्यातील प्रत्येकाचा स्वतंत्र विचार 'अवघा' या एका शब्दात केला जातो. ज्याच्या चिंतनात सतत माणूस आहे अशालाच अवघ्यांचा विचार करणे शक्य होते. व्यक्तिशः देसले हा माणूसप्रिय आहे. अवघ्यात रमणारी ही व्यक्ती आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील कलावंताना स्वतःशी जोडून ठेवले आहे. ही 'बांधिलकी' त्यांच्यालेखी खूप महत्त्वाची आहे. तो त्यांच्या जगण्याचा पाया आहे. यातूनच महाराष्ट्रात सर्वदूर त्यांचा सतत संवाद सुरू असतो. ही कविता या संवादाची आहे. त्यामुळेच ही कविता राजू देसले या व्यक्तीविषयी बोलतानाच आसपासच्या साऱ्यांविषयी बोलू लागते. किंबहुना, आसपासचा सारा कल्लोळ गोळा करून ती मौनाचा उच्चार करू लागते. एकाचवेळी दोन विपरित स्तरांवर वावरण्याचे या कवितेचे कौशल्य तिला सुंदरता प्राप्त करून देते.

राजू देसले हे कलासक्त व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य, चित्रकला, छायाचित्रणकला, नाटक, चित्रपट, संगीत अशा विविध कलाक्षेत्रात विहरणारे हे अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. त्याचे पडसाद या कवितेत उमटलेले दिसतात. भवतालातील अनुभवांची अर्थवलये त्यांच्या या कवितेतून विस्तारताना दिसतात. त्यात कधी संगीताचे नाद, तर बहुतेकदा चित्रकलेतील रंग सामावले जातात. हे नाद-रंग कवितेला ओझे होत नाहीत, तर अनुभव अधिक गहिरेपणाने सामोरे आणण्यास त्यांची मदत होते. कवीवरील वारकऱ्यांचा संस्कारही सुंदर होऊन समोर येतो. 'नामसंकीर्तनाचा अवखळ नाद पायावर गोंदला' जातो, तर कधी 'काळीजकापऱ्या दिवसांची वीणा' होते. नाद-रंग-शब्दांचा हा सहज संबंध लोभस वाटतो. हे संवेदनशील मनाचे कलाभान कवितेत अधिकचे होत व्यक्त होते. यामुळेच असेल, पण ही कविता संयत स्वर कधी हरवत नाही.

या साऱ्याला 'आतला भयग्रस्त सन्नाटा' वेढून आहे. या भवतालाचे भय का वाटावे, येथे 'भयाची पेरणी' केली जात असल्याचा अनुभव का येतो, याचे उत्तरही एका कवितेत आहे. 'गुड न्यूज' म्हणताच आपल्या मनात सर्जनाचे संकेत जागे होतात. पण कवीला 'दहशतीची मुळं सर्वदूर पसरलेली' असल्याची जाणीव आहे. साधे वृत्तपत्रही रोजच्या रोज ही दहशत वाढवत नेते. वृत्तपत्राच्या आठ स्तंभातील दहशत इतकी असते की त्यातून 'गुड न्यूज' सापडत नाही, यातूनच 'पडझड'चा अनुभव अवघ्यांच्या वाट्याला आलेला असतो. या परिस्थितीत अवघ्यांचा कल्लोळ मौनात गेलेला आहे. त्यांच्या अनुच्चारित कल्लोळाचा उच्चार ही कविता करीत आहे. मौनातील कल्ळोळ मांडायला शब्दांची दुर्बलता जाणवू लागते तेथे स्वरलिपी व रंगलिपीचा सुरेख वापर करीत अवघ्यांची दुःखलिपी या कवितेने मांडली आहे. कवीला याची जाणीव आहे. 'रंगातून ठिबकणाऱ्या घडामोडी'नी तो अस्वस्थ होतो. 'आतल्या धगीची चैतन्य सळसळ' व्यक्त करण्यासाठी 'मौनाची चित्रलिपी हलकीच उलगडत जाते' असे तोच सांगतोही.

'निःशब्द कल्लोळ', 'फुलांचं वाळवंट', 'यातनांचा उजेड' अशा विरोधाभासी प्रतिमांची योजना सहज होते. त्यातून व्यस्त विसंगती ठळक होत जाते. मुळात अनेकविध द्वंद्वे ही कविता जपते. मूर्त-अमूर्त, वास्तव-कल्पित, संघटन-विघटन, नकार-न्याय ही द्वंद्वे ती सहज पेलते, कारण त्या सगळ्याचा पाया कवीच्या चिंतनातील अस्तित्व आणि साक्षित्व या द्वंद्वात आहे. हा अनुभव पेलण्यासाठी आवश्यक तो संयम, सहानुभाव, चिंतन आणि काळाचे समग्र भान कवीपाशी आहे. या कवितेने शब्दजोडही छान पकडले आहेत. 'ठिसूळ स्वप्ने', 'घ़ड़ामोडींचे पडघम', 'उजेडाचा गोतावळा' अशा शब्दजोडीतून प्रतिमा घडवली जाते. आपल्याला 'निळे काळे वळ' माहीत असतात, पण जेव्हा 'निळ्या काळोखाचे वळ' असा शब्दसमूह समोर येतो, तेव्हा काळोखाचा काळेपणा तर दिसतोच, पण उजेड लोपवणारा काळोख आपल्या मनावर खोल वळ उठवतो.

कवी भाषा व संस्कृतीचे वहन करतो असे म्हणतात. ही कविता कवीच्या चिंतनाला पूरक भाषा वापरते. किंबहुना समाज अस्तित्त्वाच्या लय-अलयाबाबतच्या चिंतनाच्या लयीचा उच्चार म्हणजे ही कविता आहे. या व्यवस्थेने मानवी अस्तित्वाचे पेच निर्माण केले आहेत, धार्मिक-सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक दहशतीने सामान्य जनांना चिरडले आहे. भयाचे पीक काढले जात असताना जगण्यातील निवांतसुख हरवून गेले आहे. अस्वस्थ वर्तमानाच्या संदर्भात या कवितेचा अनुनाद एकीक़डे व्यक्तिगत दुःखाचे अंतर्गत व्हायोलीन छेडत असतो, त्याचवेळी सामाजिक करुणेची लयही त्याला लगटून येते.

चिंतनानुभव सांगतानाही त्याच्या मनातळीचा ओलावा त्याच्या कवितेत उतरतो. 'आभाळ वस्तीला' येते. 'ओथंबलेले', 'पाणी', 'पाऊस', 'समुद्र', 'ओल' या शब्दातून पाणी भरून वाहते. काही वेळा शब्द अर्थाच्या शक्यतांची वलये पुरेशी उमटवण्यात कमी पडत असल्याचा अनुभवही कवीला येत असावा. मग परिचित शब्दयोजनेला बगल देत वेगळी रचना साधण्याचा यत्न कवी करतो. उदाहरणार्थ, 'नक्षत्रांचे झुंबर' हा काव्यात्म शब्दप्रयोग आपल्याला माहित असतो. त्य़ा ऐवजी अनपेक्षितपणे 'नक्षत्रांची झुंबड' आपल्यासमोर येते. येथे केवळ एक अक्षर बदलले नाही, तर 'झुंबर' या शब्दबरोबर व्यक्त होणारी नाजुकता, कलात्मकता, सौंदर्य, लय, शिस्त ही वलये एका अक्षराच्या बदलाने, 'झुंबर'मधील 'र'ची जागा 'ड'ने घेतल्याबरोबर, लय पावली आणि 'झुंबड' या शब्दासरशी धसमुसळेपण, आक्रमकता, रेटारेटी, गर्दी, बेशिस्त, असौंदर्य आदी वलये आकारली. जे कवीला व्यक्त करायचे आहे, ते नेहमीच्या शब्दयोजनेने शक्य होत नसल्याने भाषेचे वहन वेगळ्या पद्धतीने करणे कवीला गरजेचे वाटते.

कलेच्या पातळीवर कवी स्वतःचे अस्तित्त्व महत्त्वाचे मानत आला आहे. त्याचे हे असणे यष्टीकडून समष्टीकडे नेणारे आहे. अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करणारे आहे. त्याची ही सकारात्मकता असल्यानेच त्याच्या आसपासचा अंधार समजदार असतो. त्याला 'वेदनेतून उजेडाचे गाणे' ऐकू येते. 'यातनांचा उजेड' पडतो. गुरूनाथ धुरी यांनी 'ग्लोरिया' या संग्रहात एक चित्र देऊन त्याच्याखाली 'यातनांची फुलपाखरे होताना... ' अशी ओळ दिली आहे. तर, चित्रकलेची ओढ असलेला हा कवीही एके ठिकाणी 'वेदनेची भिरभिरती फुलपाखरे' अशी ओळ लिहून जातो, तेव्हा तो निर्मिती प्रक्रियेचा वेध घेत असल्याचे लक्षात येते. या निर्मितीप्रक्रियेच्या शोधात आई महत्त्वाची ठरते. त्यामुळेच 'आई' आणि 'झाड' यांचा साहचर्यानुभव देणाऱ्या चार कविता या संग्रहात भेटतात. या चार कवितांचा स्वतंत्र, एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.

अवघेचि उच्चार : राजू देसले

मुखपृष्ठ : अन्वर हुसेन

प्रकाशक : कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा. लि.

पाने : ७२, किंमत : १९९ रुपये.

santshenai@gmail.com

बातम्या आणखी आहेत...