आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:शोकात्म वातावरणात दडलेला दांभिकतेचा दर्प...

शशिकांत लावणीस (लेखक, दिग्दर्शक)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या सभेचे मन विषण्ण करणारे रूप दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या शॉर्टफिल्ममधून केला आहे. ही ‘सभा’ जशी मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवते, तशी ती एखाद्याच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये उमटणाऱ्या खऱ्या-खोट्या भावनांचे वास्तववादी दर्शनही घडवते. दु:खद प्रसंगात, शोकात्म वातावरणात दडलेला दांभिकतेचा, आत्मकेंद्री वृत्तीचा दर्प या कथेतून कळत-नकळत आपल्याला जाणवत राहतो.. काहीसा अस्वस्थ, अंतर्मुख करत जातो...

सन्मित्र विजय पाडळकर यांची अगदी छोटीशी, एक- दीड पानाची गोष्ट एक दिवशी हाती पडली. खरं तर चित्रपट, नाटक यांचं मला आकर्षण असलं, तरी नाटकात या गोष्टीतील काही दृश्यं दाखवणं अडचणीचं होतं. चित्रपटात मात्र अधिक चांगल्या आकृतिबंधाच्या सहाय्याने, परिणामकारकपणे दाखवता येतील म्हणून मी त्यावर ‘सभा' हा लघुपट करायचं ठरवलं. रंगभूमी, कथा, कविता, साहित्य या आवडत्या क्षेत्रांत गेली सुमारे साठ वर्षे मी रमलो आहे. फिल्म सोसायटीचा अगदी पहिल्यापासून सदस्य आहे. नाटक वाचत असतानाच त्यातील एखादा प्रसंग रंगमंचावर कसा दिसेल, याची मनात जुळवाजुळव होते. शब्दांमधले विराम, आरोह-अवरोह, वाक्यांमागच्या भावना मला दिसतात!

पाडळकर महाराष्ट्र बँकेत आणि मी स्टेट बँकेत होतो. सोलापूरचे त्र्यं. वि. सरदेशमुख सर आमचे गुरू. सरांमुळे पाडळकरांचा परिचय झाला. लघुकथा लिहिणं हे अवघड काम आहे. पाडळकर हे लघुकथा, इंग्रजी साहित्य, इंग्रजी चित्रपट यांचे दर्दी. ‘कथांच्या पायवाटा’, ‘पाखराची वाट’ आणि ‘छोट्या छोट्या गोष्टी’ ही त्यांची काही पुस्तकं. ‘सभा' या त्यांच्या कथेवरच्या लघुटात मी अनेक प्रसंग दाखवले, जे प्रत्यक्ष पाडळकरांच्या कथेत नाहीत. पण, त्या प्रसंगांमुळे कथेचा आशय प्रेक्षकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचण्यास मदत होते. फिल्मच्या सुरूवातीला आणि शेवटी मी निवेदन केले आहे. बऱ्याच वेळा नेत्यांच्या भाषणाला, साहित्यविषयक उपक्रमांना गर्दी जमवावी लागते. मोर्चा, घोषणा यासाठी तर वेगळे मोल दिले जाते. माणसाची जिवंत असताना थोडीफार तरी किंमत असते, पण मृत्यूनंतर ती शून्य होते. कोणी कोणाचे नसते, हे अगदी खरे आहे. अशाच एका मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या सभेचे मन विषण्ण करणारे रूप दाखवण्याचा प्रयत्न या शॉर्टफिल्ममधून केला आहे. श्रद्धांजली सभेतही भाजी निवडत, स्वेटर विणत बसलेल्या बायका, त्यांच्या गप्पा, सुनांवरचा राग आणि उणेदुणे, राजकारणी लोकांच्या चर्चा, तिकीट न मिळाल्यामुळे स्त्रीच्या शीलाविषयी होणारे भाष्य, स्वतःचा बडेजाव मिरवत हातात गुच्छ घेऊन अशा सभेला उशिरा येणारी स्त्री, प्रियकराच्या भेटीसाठी आलेली तरुणी अशा प्रसंगांची गुंफण यात केली आहे.

साहित्य आणि नाट्यविषयक उपक्रमांत पुढे पुढे करणारे साहित्य वा नाटकाशी संबंधित असतातच असे नाही. आपल्या कविता दुसऱ्याच्या माथी मारणे, प्रकाशकामागे लग्गे लावणे आणि यावर कडी म्हणजे पुरस्कार मिळालेले पुस्तक छापलेलेही नसणे.. अशा नेहमी अनुभवाला येणाऱ्या गोष्टी मी या फिल्ममध्ये घेतल्या आहेत. घरात वेळ जात नाही, मग अशा सभांना, गाण्याच्या कार्यक्रमाला गेलं की पंख्याखाली निवांत बसायला मिळतं, म्हणून आलेला एक सामान्य माणूसही मी दाखवला आहे. एकूणच, आम्ही सादर केलेली ही ‘सभा’ जशी मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवते, तशी ती एखाद्याच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये उमटणाऱ्या खऱ्या-खोट्या भावनांचे वास्तववादी दर्शनही घडवते. दु:खद प्रसंगात, शोकात्म वातावरणात दडलेला दांभिकतेचा, आत्मकेंद्री वृत्तीचा दर्प या कथेतून कळत-नकळत आपल्याला जाणवत राहतो.. काहीसा अस्वस्थ, अंतर्मुख करत जातो...

जाने हम कहां होंगे...trong>...

‘सभा’ हा लघुपट करताना अनेकांचे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ एवढ्या कमी वेळात याचे शूटिंग झाले. मित्र एजाज याने ते पूर्ण केले आणि सचिन जगतापने एडिटिंग केले. शरणप्पा बिराजदार, वनिता म्हैसकर, बाहुबली दोशी यांचे विशेष सहाय्य मिळाले. यातील सर्वच कलाकार रंगमंचावर बरीच वर्षे काम करणारे आणि साहित्याची आवड असणारे आहेत. सर्वांचा उल्लेख शक्य नसला, तरी त्यांचे आभार व्यक्त करणे आवश्यक आहे. श्रीरंग सराफ याने कौशल्याने संगीताची निवड केली. ‘हमारे बाद अब मेहफिलमें अफसाने बयां होंगे, बहारे हमको ढूंढेंगी न जाने हम कहां होंगे..’ हे गाणे शेवटी घेतले. या गाण्यामुळे भा. रा. तांबे यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय' या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आरती प्रभू, रमेश कोटस्थाने आणि चंद्रशेखर गोखले यांचा मात्र ऋणनिर्देश केलाच पाहिजे.

संपर्क : ९४२१०२६२७९

बातम्या आणखी आहेत...