आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील स्वप्न...

बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वप्नांची विचित्र रूपं असतात. स्वप्नं विविध रंगाची, ढंगाची असतात. स्वप्नं खरी असतात. स्वप्न खोटीही असतात. स्वप्न अर्थपूर्ण असतात. तशी निरर्थकही असतात. गझलकारही स्वप्नं पाहातातच. पण त्यात ते फार गुंतून नाही पडत. रंगलेली स्वप्नं... भंगलेली स्वप्न... यावर ते शेरांमधून अलिप्तपणे भाष्य नोंदवतात. कफल्लकांची स्वप्नं विराट असतात. अशा उत्तुंग स्वप्नांच्या शोधात गझलकार असतात.

स्वप्नांची विचित्र रूपं असतात. स्वप्नं विविध रंगाची, ढंगाची असतात. स्वप्नं खरी असतात. स्वप्न खोटीही असतात. स्वप्न अर्थपूर्ण असतात. तशी निरर्थकही असतात. स्वप्नात संगती असते, स्वप्नात विसंगतीही असते. एकुणात स्वप्नात गंमतीजमती असतात. स्वप्न न सांगता न बोलता रात्रीचा पडदा फाडून झोपेच्या शालीत शिरतात. स्वप्नं कधी सहेतूक तर कधी अहेतूक असतात. स्वप्नांचे अनेक प्रकार अन् आकार असतात. स्वप्नांना तर्क-वितर्क नसतो. दिवसाच्या उजेडातही आपण काही स्वप्नं पाहातच असतो. परंतु स्वप्नांचं वैशिष्ट्य असं की, स्वप्न रात्रीच अधिक उमलतात, फुलतात सकाळी मावळून जातात. स्वप्नात बरीच धुसरता असते. म्हणून स्वप्नं विसरली जातात. स्वप्न सलग लिहून काढता नाही येत. स्वप्नांचा संग्रही नाही करता येत. स्वप्नांची अनुभूती व्यक्तीसापेक्ष असते. काहींना भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल स्वप्नात लागते. तर काहींना भूतकाळातील गोष्टी स्वप्नात आठवतात. काहींना गतजन्माचंही पुष्कळ काही स्वप्नात दिसत असतं. जगात स्वप्नाळू लोकांची संख्या कमी नाही.

गझलकारही स्वप्नं पाहातातच. पण त्यात ते फार गुंतून नाही पडत. रंगलेली स्वप्नं... भंगलेली स्वप्न... यावर ते शेरांमधून अलिप्तपणे भाष्य नोंदवतात. कफल्लकांची स्वप्नं विराट असतात. अशा उत्तुंग स्वप्नांच्या शोधात गझलकार असतात. नि:स्वार्थी जगण्यातली फकिरी स्वप्नांना मनापासून आवडते. स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी धडपड करणं ही गोष्ट आयुष्य सुंदर करत असते. हे खरंच. परंतु ही गोष्ट इतकी साधीसुधी नसते. त्यासाठी जंगजंग पछाडावं लागतं. महत्त्वाचं म्हणजे वर्तमानाचं भान ठेऊन त्याचा अन्वयही लावता यायला हवा. स्वप्नं पाहिल्यामुळंच सफलता प्राप्त होते. अशी एक समजूत असते. परंतु स्वप्नांवर कोणाचाही मालकी हक्क नसतो. स्वप्नांचीही दुर्दशा होत असते. स्वप्नावरही परिस्थितीची आपत्ती कोसळू शकते. स्वप्नाच्या राजकुमारीवरही घरोघरी भांडी घासण्याची वेळ येते. राजपुत्रालाही पोटासाठी वणवण करावी लागते. म्हणून स्वप्नांच्या फार आहारी जाऊन नाही चालत. हेच वास्तव सुरेश भट यांनी त्यांच्या शेरातून सांगितलंय्.

घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी

वणवण तो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला!

स्वप्नात दिसणारं... स्वप्नात घडणारं... स्वप्नात भेटणारं... सगळंच सत्याला बांधलेलं असतं असं नाही. स्वप्नं कधीच ओंजळीत घेऊन वावरता नाही येत. स्वप्नं माणसाला गुंगारा देणारी असतात. स्वप्नं मृगजळासारखी असतात. स्वप्नचा तळ नाही गवसत. मग स्वप्नात पाहिलेली स्वप्नं तर कधीच विरून जातात. स्वप्नं माणसात विश्वास नाही रुजवत. नुसती स्वप्नांवर मदार ठेऊन जीवनाची वाटचाल करणं अंतिमतः वेडेपणा ठरतो. स्वप्नापेक्षा जगण्यातला विश्वास हा विश्वासदर्शक असतो. ज्यामुळं कर्तव्य पार पाडता येतात. डोळ्यात चौकसपणा भिनला की स्वप्नांचा मार्ग आपोआप बंद होतो. स्वप्नात पाहिलेल्या स्वप्नाची काय अवस्था होते हे विंदा करंदीकर यांनी त्यांच्या शेरातून मांडलंय.

मागू नको सख्या जे माझे न राहिलेले

ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले

सतत स्वप्नात गुरफटून जाणं, क्षणोक्षणी स्वप्नील होत जाणं हे भाग्यालाही नाही आवडत. माणसाची कर्तबगारी भाग्याला जवळची वाटत आलीय. ऊठसूट स्वप्नं पाहणारी माणसं भाग्यवान नाही ठरत. स्वप्नं कधीच कुणाची होत नाहीत. म्हणून स्वप्नांना सर्वस्व बहाल करून नाही भागत. स्वप्नांची पडझड होत राहिली तरी अडथळ्यांना पार करत दृढ निश्चयानं जो पुन्हा उभं राहण्याची क्षमता अर्जित करतो त्यालाच भाग्याची साथ लाभते. त्याची स्वप्नपूर्ती होते. नाहीतर स्वप्न भंग पावते. हे डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या शेरावरून सुस्पष्ट होत जाते.

कोण जाणे भाग्य माझे का अवेळी शिंकले

पूर्ण होइल वाटणारे स्वप्न माझे भंगले

स्वप्नांच जग हेच मुळी आभासाचं जग आहे. जगण्याचा अन् स्वप्नाचा घनिष्ठ संबंध आहे, अशातला भाग नाही. स्वप्न पाहाण्यावर निर्बंध नसल्यामुळं माणूस वाटेल ते स्वप्न पाहू शकतो. रात्रीच कशाला तो दिवसाही स्वप्न पाहू शकतो. तो जमिनीवर राहून स्वर्गातली स्वप्नंही पाहू शकतो. स्वप्नं कितीही मोठी पाहाता येतात. परंतु वास्तव निराळे असते. स्वप्न पाहिल्यामुळं इथला वनवास नाही चुकत. भोग नाही सरत. वनवास टाळायचा असेल तर परिश्रमाशी घट्ट नातं जोडावं लागतं. परिश्रमाशी नातं जुळलं की जगण्याचा कंटाळा नाही येत. खांद्यावर घेतलेलं स्वप्नांचं ओझं झुगारता आलं पाहिजे. अन्यथा स्वप्नाचं ओझं वाहण्यातच जिंदगी संपून जाते. राजीव कदम म्हणतात.

पाहिली स्वर्गातली स्वप्ने जरी ही

येथला वनवास का चुकणार आहे?

स्वप्नं अन् राजकीय नेत्यांची आश्वासनं यात मोठं साधर्म्य असतं. या दोन्हींची पूर्तता होईलच असं नसतं. ना स्वप्नं कधी माणसाला कवेत घेतात ना नेते कधी आपल्या गालावरून ओघळणारे अश्रू पुसतात. आपली अपेक्षाही जेमतेम माफकच असते. स्वप्नाची अन् आश्वासनाची परिपूर्ती होईल म्हणून आपण मध्यमवर्गीय स्वप्नांना पुन्: पुन्हा खंगाळत बसतो परंतु सरतेशेवटी पदरी उपेक्षाच येते. तेव्हा स्वप्नं पाहण्याच्या फंदात न पडणं अन् आश्वासन ऐकून घेण्याच्या भानगडीत न पडणं हाच श्रेयस्कर मार्ग असतो. बापू दासरी यांचा शेर यावर नेमकेपणाने बोट ठेवतो.

पुसतिल नेते अश्रू अपुल्या गालावरूनी ओघळणारे

मध्यमवर्गी स्वप्नांना या पुन्: पुन्हा खंगाळत बसतो!

ज्या सुरावटीत दम असतो. गायनात ज्याला प्रभुत्व प्राप्त झालेलं असतं. त्याचं गाणं रसिक विलक्षण तन्मयतेनं ऐकत असतात. ही स्वरांची सरगम जशी माणसांना मंत्रमुग्ध करते तशी ती आकाशालाही भारून टाकते. इतकं सामर्थ्य त्या गायकीत असतं. अशा प्रतिभासंपन्न गायकाला स्वप्नातल्या स्वरांच्या किमयेची निकड नाही भासत. ज्याच्या आपल्या गायकीवर ठाम विश्वास असतो, स्वरांच्या सुरेख संस्कारावर मनोभावे श्रद्धा असते तिथं गाणं गायकाची अन् गायक गाण्याची समरसून साथ-संगत करत असतात. अशा स्वयंभू गायकाला स्वप्नातल्या स्वरांची आवश्यकता वाटण्याचं कारण नाही उरत. यावरून स्वप्नांना किती महत्त्व द्यायचं, त्याच्यावर किती निर्भर राहायचं हे दिवाकर दुनाखे यांच्या शेरावरून लक्षात घेणं अपरिहार्य ठरतं.

आकाश भारले मी माझ्याच गायनाने

स्वप्नातल्या स्वरांची किमया मला कशाला?

हृदयात स्वप्नांचे पेटते निखारे असले की धुमसत धुमसत जगणं वाट्याला येतं. जिथं धूमसणं असतं तिथं मनाप्रमाणं फुलता नाही येत. ही स्वप्नांचीच शोकांतिका असते. जे स्वतःला स्वप्नांच्या शिकंज्यात अडकावून घेतात त्यांना स्वतःशी कुरबुर करत एकाकी जगावं लागतं अशा एकाकीपणाच्या जगण्यात भावनेचा ओलावा नसतो. तिथं मोहरणं, फुलणं नसतं. वियोगाचं, विलगतेचं दुःख मनाला व्यापून टाकतं. स्वप्नात गुंतलेल्यांचा असाच आंतरिक कोंडमारा होत असतो. ज्या स्वप्नांच्या मागं आपण धावत-पळत सुटतो. ती आपल्याला पाठमोरीच असतात. हृदयातले स्वप्नांचे पेटते निखारे अवघ्या अस्तित्वावर अंगाराचं छत धरून असतात. याचा प्रत्यय प्रा. सतीश देवपूरकर यांच्या शेरातून येतो.

हृदयात जरी स्वप्नांचे पेटते निखारे होते

मी धुमसत धुमसत जगलो दिलखुलास फुललो नाही

स्वप्नांची प्रसन्नता अभावानंच प्राप्त होणारी गोष्ट असते. स्वप्नाच्या भरवशावर जगणं सोडून देणाऱ्यांची स्वप्न प्रत्यक्षात साकारतात असं नाही होतं. स्वप्नांची हुलकावणी क्लेशकारक असते. कुणाला दाखवावं असं आपल्यापाशी काही नाही उरत. ही स्वप्नांची पडझड असतं. इथं अनेक गझलकारांनी भंगलेल्या स्वप्नांची विदारकता स्पष्ट केलीय.

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...