आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवक क्रांती दलाचे अध्यक्ष आणि सामाजिक चळवळीस वाहिलेल्या ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यात आजवर राज्या-देशातल्या अनेक स्थित्यंतरांचे चढ-उतार जवळून अनुभवले. या प्रवासातील एकवीस राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची अंतर्बाह्य अर्कचित्रे डाॅ. सप्तर्षी यांनी काॅन्टिनेंटल प्रकाशनच्या ‘व्यक्तिरंग’ ग्रंथामध्ये रेखाटलेली आहेत.
युवक क्रांती दलाचे अध्यक्ष आणि सामाजिक चळवळीस वाहिलेल्या ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यात आजवर राज्या-देशातल्या अनेक स्थित्यंतरांचे चढ-उतार जवळून अनुभवले. त्यातूनच सदैव सामाजिक संघर्षाच्या प्रश्नांवरून हेलकावे खाण्याची आणि देण्याची त्यांची वैचारिक बैठक शालेय जीवनापासून पक्की होत गेली. या प्रवासातील एकवीस राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची अंतर्बाह्य अर्कचित्रे डाॅ. सप्तर्षी यांनी काॅन्टिनेंटल प्रकाशनच्या ‘व्यक्तिरंग’ ग्रंथामध्ये रेखाटलेली आहेत. डाॅ. सप्तर्षी हे मुळात हाडाचे पत्रकार असल्यामुळे कुणाचे फाजिल कौतुक किंवा कुणावरही अवास्तव प्रहार त्यांच्या लेखणीतून झालेला नाही. म्हणूनच हा ग्रंंथ विश्लेषणात्मक अंगाने समृध्द झाला आहे. त्यामुळे सर्वांसाठी तो सामाजिक - राजकीय प्रवाहाची योग्य दिशा दाखवेल.
सन १९६७च्या सुमारास पुण्याच्या बी. जे. मेडिकल काॅलेजमधून एमबीबीएस झालेले डाॅ. सप्तर्षी जर वैद्यकीय व्यवसायात असते तर आज प्रचंड गडगंज श्रीमंत डाॅक्टरांच्या मांदियाळीत अग्रस्थानी दिसले असते. पण शालेय जीवनापासूनच साथी एस. एम. जोशी, लोकनायक जयप्रकाश नारायण, ग. प्र. प्रधान मास्तर, जाॅर्ज फर्नांडिस, माजी पंतप्रधान चंद्रशेखर, बाळासाहेब भारदे, आचार्य प्र. के. अत्रे आणि दादासाहेब गायकवाड यासारख्या समाजधुरिणांचा कृतिशील प्रभाव डाॅक्टरांच्या एकुणात जडणघडणीवर पडला. याचा व्यक्तिरंग ग्रंथ वाचनांती प्रत्यय येईल. चळवळीच्या वाटेला लागताच डाॅ. राम मनोहर लोहियांनी सप्तर्षींना ‘ब्राह्मण्या’बाहेर आणण्याचे मोठे कार्य केले आहे, असे प्रदीर्घ प्रस्तावनेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणतात.
डाॅ. कुमार सप्तर्षी ज्यांना आदर्श मानतात त्यांच्याबद्दल आदर बाळगतात. पण त्यांचे ते भक्त कधीच होत नाहीत. जे पटत नाही ते प्रभावीपणे प्रकट करण्याचे धाडस त्यांच्यात आहे. हे पुस्तकांतील विविध व्यक्तिरेखा वाचताना जागोजागी जाणवते. मग त्यात शरद पवार असोत की लोकनायक जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, डाॅ. राम मनोहर लोहिया असोत की वसंतदादा पाटील, जांबुवंतराव धोटे. जाॅर्ज फर्नांडिस, बाळासाहेब भारदे, शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते ग. प्र. प्रधान मास्तर आणि भाई एस.एम जोशी यांच्याविषयी लिहितानाही डाॅ. सप्तर्षी यांचा साक्षी भाव दृष्टिकोन ढळत नाही.
बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची सामान्यांबद्दल असणारी तळमळ आणि वंचित घटकातील मालकशाहीचा बळी ठरलेला सुखदेव प्रसाद यादव याच्या सामाजिक स्थितीविषयी वाचून सप्तर्षींच्या लेखनाचे समाजवादी ठासीव पैलू अधोरेखित होतात. आनंदवनचे संस्थापक बाबा आमटे आणि नागपूरच्या सुप्रसिध्द समाजसेविका पद्मश्री कमलाताई होस्पेट यांच्या कार्याचे वेधक चित्रण डाॅक्टरांनी रेखाटले आहे. याशिवाय संवेदनशील व कृतिशील कलाकार निळू फुले, पत्रकार मित्र गोपाळ मिरीकर, आचार्य दादा धर्माधिकारी, इंदोरवासी भय्यू महाराज, चोपड्याचे सच्चे गांधीवादी मगनभाऊ गुजराथी, साथी विनायकराव कुलकर्णी व वडील गणेश सप्तर्षी या सगळ्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तळमळ तटस्थ शैलीतून डाॅ. सप्तर्षी यांनी व्यक्तिरंग ग्रंथातून उलगडून दाखवली आहे. या लेखनातून खुळचट जातद्वेषी धर्मसंकल्पनांतून समाजाने बाहेर पडून समतेकडे वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त होते.
डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी डावीकडे झुकलेल्या राजकीय व्यक्तींबाबत लिहणे स्वाभाविक आहे. १७ नोव्हेंबर १९६७ मध्ये त्यांनी ‘युवक क्रांती दल’ ही कृतिशील तरुणांची संघटना स्थापली. त्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक प्रश्नांवर लढे उभारले. यशस्वी केले. भारत सरकारकडून दलित विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर युक्रांदचा अधिक कटाक्ष होता. ऐंशीच्या दशकात युवक क्रांती दलाचे कार्य अधिक व्यापक झाले. समाजवाद आणि गांधीवादाचा पगडा असणाऱ्या डाॅ. कुमार सप्तर्षी यांना आणीबाणीमध्ये अटक झाली. त्यांंना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळची स्थिती चित्रण करणारे ‘येरवाडा विद्यापीठातील दिवस’ हे आत्मकथन खूप गाजले आहे. आणीबाणीनंतर अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. ९ ऑगस्ट २००१ रोजी युक्रांदची पुनर्स्थापना झाली. विद्यार्थी, शेतकऱ्यांसह विविध सामाजिक प्रश्नांवरील आंदोलने डाॅ. सप्तर्षी यांनी यशस्वी केली. १९७३मध्ये पुण्यात पुरीच्या शंकराचार्य यांच्याविरूध्द झालेल्या यशस्वी जाहिर वादविवादानंतर भारतभर पडसाद उमटले होते. विविध आंदोलनांमध्ये डाॅ. सप्तर्षी यांना ६२ वेळा अटक झाली आहे. यावरूनच त्यांच्या चळवळीची व्याप्ती आणि यश अधोरेखित होते.
समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, भारतीय राज्यघटनेतील पायाभूत तत्त्वे इत्यादी मूल्यांचे दर्शन या ग्रंथात जाणवते. भारतीय समाज जीवनातील जात आणि धर्मासंबंधीच्या खुळचट कल्पना आणि त्यातून होणाऱ्या लोकशाहीच्या पायमल्लीवर डाॅ. सप्तर्षी यांनी थेट बोट ठेवले आहे. त्यांच्या या ग्रंथातून १००-१५० वर्षांचा सामाजिक आणि राजकीय इतिहास वाचकांच्या हाती लागेल, असे डाॅ. कोत्तापल्ले म्हणतात.
ग्रंथाचे नाव : व्यक्तिरंग - मी पाहिलेले
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
लेखक : डॉ. कुमार सप्तर्षी
पृष्ठे : ३८८
किंमत : ३५० रूपये
------------
yashwant.pople@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.