आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:उथळ तवंग आणि दुषित सामाजिक चर्चा विश्व

नेहा राणे / हर्षाली घुलेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे तुलनेचे एक वेगळे नरेटिव्ह आहे जे वारंवार रेटले जातंय. अफगाणिस्तान आणि भारत यांची तुलनाही अशीच एकांगी राष्ट्रवादी जाणिवा कुरवळणारी, अहंगंड सुखावणारी आणि भीतीचे वापर राजकारणासाठी करणारी तुलना होती. सकारात्मक तुलना करताना स्थान कुठे टिकत नसेल तर नकारात्मक तुलना केल्या जातात.

१५ ऑगस्टला अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यांनतर भारतात देखील विविध माध्यमातून चर्चा सुरु झाल्या. यातील काही चर्चा या भारत व अफगाणीस्तान यांची तुलना करणाऱ्या होत्या. विशेषतः लोकशाही व स्त्रिया यांविषयी या चर्चां एक विचित्र स्वरुपात पुढे आल्या. त्यातही भारत व खासकरून भारतातील स्त्रिया किती नशीबवान आहेत,त्या कशा मुक्त आहेत,शिक्षण घेऊ शकतात आणि भारतात कसे अमुक एक व्यक्तीमुळे भारत आणि इथली लोकशाही कशी सुरक्षित आहे या चर्चेला उधाण आले. या चर्चेचा पुढचा टप्पा म्हणजे देशातील लोकशाही व स्त्रियांच अस्तित्व कसे एकाच व्यक्तीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे हे समाजमनावर बिंबवण्याचा जाणीवपूर्वक सातत्याने प्रयत्न झाला. अलीकडे तुलनेचे हे एक वेगळे नरेटिव्ह आहे जे वारंवार रेटले जातंय. जशी अफगाणिस्तान आणि भारत यांची तुलनाही अशीच एकांगी राष्ट्रवादी जाणिवा कुरवळणारी, अहंगंड सुखावणारी आणि भीतीचे वापर राजकारणासाठी करणारी तुलना होती.

आपण एखाद्या प्रदेशाची तुलना दुसऱ्या प्रदेशाशी करताना काही निकष लावतो. साम्य आणि तफावत या दोन आधारांवर याचा निष्कर्ष निघतो. दोन भिन्न इतिहास, संस्कृती आणि प्रवास राहिलेल्या देशाची तुलना करताना काही मूलभूत साम्य नसावे का? अर्थशास्त्रीय निर्देशांकांची तुलना करताना सुद्धा मूलभूत घटक हे गुणात्मक आणि संख्यात्मक असतात. त्यातही सकल राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, चलनवाढ, आयात-निर्यात यासह हॅपिनेस, मानवविकास निर्देशांक यांसारखे सामाजिक दृष्ट्या महत्वाचे घटक विचारात घेतो. आणि त्यातही जगात उत्कृष्ट असणाऱ्या देशासोबत आपण नागरिक म्हणून आपल्या देशाचे स्थान पडताळून बघतो. म्हणजे सामाजिक धोरणासाठी कधी स्वीडन, नॉर्वेशी तर हॅपिनेससाठी भूतानची तुलना करतो. अगदी ऑलिम्पिक किंवा क्रीडा क्षेत्रासाठी अमेरिका, चीनशी तुलना करतो. तर मग एकदम अफगाणिस्तानशी तुलना आपल्या सभोवताली का घडू लागल्या??? कारण नकारात्मक तुलना या सोयीस्कर असतात.

लोकशाहीच्या वारश्याचा विचार केला तर अफगाणिस्तानशी आपली तुलना हा निव्वळ मूर्खपणा असू शकतो. पण सोयीस्कर तुलनेच्या या चर्चेत आर्थिक तुलना चीन,जपान, बांगलादेश किंवा ब्राझीलशी करायला हवी तर त्याऐवजी पाकिस्तान कसा कर्जबाजारी आहे हे दाखवले जाते. कोविडच्या काळात सुद्धा अमेरिका आणि इटली यांतील मृत्यू माध्यमांनी दाखवले पण या देशातील वेगवान लसीकरणाची तुलना मात्र होत नाही. ही उदाहरणे म्हणजे गुंड्याने अभ्यासच केला नाही म्हणून त्याला परीक्षेत कमी गुण मिळाले, घरी आल्यावर त्याने आईला सांगितले की, 'तो चिनू आहे ना तो तर नापासच झालाय.' इतकी बालिश आणि उथळ आहे. पण अशा उथळ चर्चा गंभीर प्रश्नांत डोकवू न देता तवंग आणण्यासाठी असतात. असा तवंग सध्या आपल्या सामाजिक चर्चेवर आलेला आहे.

अस्थिरता आणि अराजकाच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून जनतेला भय दाखवून स्वतःचे सामाजिक तसेच राजकीय महत्त्व अधोरेखित करून, जनतेच्या तारणहाराची प्रतिमा निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यातही विशेषतः अतिउजव्या राष्ट्रवादी विचारधारा सत्तेवर असतील तर त्या राष्ट्रवादी अहंकार हेतूपुरस्सर कुरवाळत स्वतःचे राजकीय हित साध्य करतात. वाईट घटना, स्थळ, परिस्थिती यांच्याशी आपल्या परिस्थीतीची तुलना करून प्रभाव पाडतात. अलीकडे हा ट्रेंड होत असल्याचे दिसते. म्हणजेच सकारात्मक तुलना करताना स्थान कुठे टिकत नसेल तर नकारात्मक तुलना केल्या जातात. आजवर ज्या इंधन दरवाढीचा तुलना आधीच्या सरकारशी केली जात होती ते अशक्य झाल्यावर अगदी क्षुल्लक मुद्द्यांवर तुलना केली जाते.

दुसरे म्हणजे प्रतिमाहनन केले जाते. सुरुवातीपासून नेहरू, गांधी यांची प्रतिमा छोटी/हनन करण्याचे भरपूर प्रयत्न झाले. त्यासोबत खोट्या प्रतिमानिर्मितीचे प्रयत्न सातत्याने चालू होते. मग मोठे व भव्य दिव्य फोटो पेट्रोल पंप, सार्वजनिक जागा, मोक्याची ठिकाणे, मोठे सत्कार समारंभ, कागदपत्र यावर आणले गेले. याद्वारे करिष्माई व्यक्तिमत्व म्हणून व्यक्तीला मान्यता मिळवून घेण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण तितकेच मुलभूत प्रश्न चर्चेच्या परीघावर गेले.

२०१४ नंतर साधारण सामाजिक चर्चाविश्वात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना अवांतर प्रतिप्रश्न विचारुन चर्चा भरकटवण्याची प्रथा रुढ व्हायला सुरुवात होऊ लागली ज्याला साधारणपणे whataboutery म्हणून ओळखले जाते. मात्र ७ वर्षांनंतर ह्या चर्चेचा अवकाश अनावश्यक मुद्यांनी इतका व्यापून टाकलाय की महत्त्वाच्या मुद्द्यांपर्यंत सामाजिक चर्चाविश्वाची मजल पोहोचतच नाही. परिणामतः महिन्याभरापूर्वी त्वेषाने एखाद्या विषयावर भांडण्यात वेळ खर्ची घालणाऱ्यांना त्याचा निकाल काय लागला ह्याबद्दल माहिती किंवा उत्सुकता काहीही उरलेले नसते. मात्र जगण्याशी निगडित मुद्यांशी तितक्याच अभावितपणे आपण जोडले जाऊन त्यावर चर्चा घडताना फार क्वचितच दिसते. याचसोबत मूलभूत प्रश्नांच्या चर्चेला आवश्यक सरकारी आकडेवारी दाबली जाते. गेल्या काही वर्षांत प्रकाशित न झालेली आकडेवारी बघता हा मुद्दा प्रकर्षाने लक्षात येतो. उदाहरण म्हणून बघायचे झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निश्चलनीकरणाचे असंघटित क्षेत्रावरील परीणाम, PM care fund मध्ये जमा झालेला निधी व त्याचा विनियोग यासारखी वेगवेगळी आकडेवारी लोकांसाठी उपलब्ध करून दिली गेली नाही. अलीकडचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास कोविड दरम्यान ऑक्सिजनअभावी जीव गमावलेल्यांची आकडेवारी उपलब्ध नसल्याची सरकारने संसदेत दिलेली कबुली असो वा लसीकरणाची आकडेवारी देखील एकूण उपलब्ध झालेल्या लसींसोबत खासगी व सरकारी यंत्रणेद्वारे झालेले लसीकरण नेमके किती हे सांगितले जात नाही.

उथळ चर्चाविश्वात आयुष्याशी निगडित मूलभूत प्रश्न तसेच देशाच्या विकासाच्या बाबतीतील मुद्दे दुर्लक्षिले जातात. पण सामाजिक स्मृतींतील इतिहासातील विशिष्ट घटना पुसट केल्या जातात तर काही घटनांना उजाळा दिला जातो. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे पंतप्रधानांनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा केली. हा सुद्धा सामाजिक स्मृती रचण्याचा आणि इतिहासाच्या सोयीस्कर पुनर्लेखनाचा भाग आहे. पंजाबमध्ये १७ ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृतिदिन म्हणून २०१७ पासून पाळण्यात येतो. मात्र राष्ट्रीय पातळीवर फाळणीच्या जखमा नव्याने कुरवाळताना Partition Horror Remeberence Day म्हणून उचलला गेला आहे. यातील हॉरर हा शब्द एका ऐतिहासिक घटनेला उजळणी देताना जाणीवपूर्वक वापरणे तितकेच ‘भयंकर’ आहे.

देशाच्या संदर्भांतल्या चर्चेचा स्तर इतका खालावला यात केवळ सत्ताधारी नाही तर अनेक सामाजिक आणि राजकीय घटक सुद्धा जबाबदार आहे. विशेषतः विरोधी पक्ष आणि माध्यमे त्यात आहेत. या चर्चा समावेशक करण्यात ते सपशेल अपयशी ठरताय.सामाजिक विचारवंत, बुद्धिजीवी, राजकीय अभिजन त्यामुळे देखील निष्क्रिय दिसतात. त्यामुळे समाजाला होलसेल मध्ये मूर्खांत काढणं शक्य होतंय आणि फायदा मिळवण्यासाठी सत्ताधारी मात्र त्यांच्या सोयीने, हवं ते, उपयुक्त रेटण्यात यशस्वी झालेले दिसतात.

या चर्चेमधून काहीही रचनात्मक साध्य होत नाही. सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक व प्रवाही, पारदर्शक चर्चाविश्व हे अहंकार, अहंमिका, द्वेष, भीती, कटुता यांनी कलुषित झाले आहे. त्यामुळे एकंदरीत समाज म्हणून आपला स्वभाव हा प्रतिक्रियात्मक झालाय. हे टाळायचे असेल तर अधिक सखोल, मुद्देसूद ,व्यापक आणि मुक्त चर्चाना प्रोत्साहन द्यायला हवं. हे अर्थातच सामाजिक पातळीवर घडायला हवं. त्याची सुरुवात ही समाजातल्या जाणकार बुद्धिजीवी व्यक्तिमार्फत सुयोग्य माहितीवर आधारित संवादाने करायला हवी. कारण त्यांच्याकडे सामाजिक स्थानासोबत तसे विशेष अधिकार आणि उत्तरदायित्व सुद्धा आहे. त्याला इतर जागृत,विवेकी समाजघटकाकडून पाठिंबा मिळाला तरच ते तळागाळातील नागरिकांपर्यंत झिरपू शकते. आणि आपल्याला एक पारदर्शक चर्चा विश्व समाज म्हणून लाभण्याची प्रक्रिया उभी राहू शकते.

nrane1507@gmail.com

ghuleharshali@gmail.com

बातम्या आणखी आहेत...