आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र आणि गुजरातच्या आदिवासीबहुल भागाचा आधार असलेला डांगी गोवंश अलीकडे दुर्मिळ होत चालला आहे. त्यावर उपाय म्हणून कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील डांगी पालकांनी लोकपंचायतच्या मदतीने ‘डांगी गोवंश पैदासकार आणि संवर्धक संघ’ स्थापन केला आहे. डांगीसोबतच्या जैव-सांस्कृतिक नात्याला शाश्वत अर्थकारणाची जोड मिळाल्यास त्यावर आधारित व्यवस्था टिकून राहील, अधिक उत्क्रांत होईल. उद्या साजरा होणाऱ्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर डांगी गोवंश आणि त्याच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांचा हा वेध...
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची आदिवासीबहुल प्रदेश म्हणून ओळख आहे. याला ‘चाळीसगाव डांगाणी’ प्रदेश म्हटले जाते. ‘डांग’ या शब्दाचा अर्थच मुळी डोंगराळ प्रदेश. अभ्यासकांच्या मते, डांगाणी म्हणजे सह्याद्रीच्या रांगेत असलेला जंगली, डोंगराळ आणि चढणीचा प्रदेश. नैसर्गिक जैवविविधतेबरोबरच येथील आद्य शेतकरी आणि पशुपालक समाजाने पिकांसोबतच पाळीव प्राण्यांच्या नानाविध जातींचे संगोपन केले. गावरान वाण म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक आहे ‘डांगी’ नावाचा देशी गोवंश. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ते कळसूबाई, त्र्यंबकेश्वर ते अगदी जव्हारपर्यंत हा देशी गोवंश शेकडो वर्षे पाळला जात आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील किमान सहा जिल्ह्यांच्या चौदापेक्षा अधिक तालुक्यात डांगी गोवंश हा कृषिवलांच्या जीवनाचा आधार बनला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण डांगी गोवंश :
उत्तर सह्याद्रीतील महादेव कोळी आणि ठाकर या आदिवासी जमाती तसेच इतर शेतकरी डांगी पालन करतात. डोंगर उतारावरील अनगड ठिकाणी शेतीची मशागत करण्यासाठी डांगी बैलाचाच उपयोग होतो. लहान चणीची, मजबूत खुरांची ही डांगी जनावरे तेलकट त्वचेमुळे अतिपावसाच्या डोंगराळ प्रदेशात टिकू शकतात. ते भर पावसात भात खाचरातील खोल गाळात मातीची चिखलणी करतात, त्यावेळी या जातीची ताकद कळते. डोंगराच्या तीव्र उतारावर, अगदी कड्याच्या टोकावर त्यांना चरताना पाहिले की, त्यांच्या खुरांची क्षमता लक्षात येते. इतर गावरान जातीची जनावरे पाळण्याचे प्रयोग झाले, पण डांगीला सक्षम पर्याय अद्याप निर्माण झालेला नाही.
डांगीचे सर्वांगीण महत्त्व :
स्थानिकांच्या दृष्टीने डांगीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपजीविका, आर्थिक प्राप्ती आणि जैव-सांस्कृतिक अंगाने डांगीचा सांभाळ या भागातील लोक करतात. डोंगराळ प्रदेशात चरत असल्यामुळे डांगी गायीचे दूध आणि मूत्र अत्यंत औषधी मानले जाते. दीर्घकाळ राहणाऱ्या खोकल्याला डांगी खोकला म्हणतात. अशा रुग्णाला डांगी गायीचे मूत्र औषध म्हणून देतात. दूध आणि त्यापासून तयार होणारे दही, तूप, खवा यांसारखे पदार्थ स्थानिक आदिवासींच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्याच्या विक्रीतून घर खर्चासाठी महिलांना चार पैसे मिळतात. डांगी गोऱ्हे आणि बैल पाळण्याचे कौशल्य व छंद तिथल्या आदिवासींना आहे. राजूर, घोटी, म्हसा येथील बाजार आणि यात्रेतील प्रदर्शनात त्यांची विक्री करून चांगली कमाई होते. आजही डांगी गायीच्या दुधापासून बनलेल्या खव्यामुळे ‘राजूरचा पेढा’ प्रसिद्ध आहे. एकूणच पारंपारिक डांगी पालकांच्या दृष्टीने गोवंशाधारित उपजीविका आणि त्यात दडलेले अर्थकारण महत्त्वाचे आहे.
लोकपंचायतचा पुढाकार :
मागील दोन दशकांपासून डांगी जनावरांचे नष्टचर्य सुरू झाले. गेल्या दहा वर्षांत तर निम्म्याहून अधिक डांगी गोवंश नष्ट झाला. कळसूबाई-हरिश्चंद्रगड पट्ट्यात याची तीव्रता अधिक होती. एकूणच डांगीच्या रुपाने घरची ‘लक्ष्मी’ अशी अस्तंगत झाल्यामुळे या भागातील पशुपालकांनी अगतिक होऊन अखेर या गुरांचे पालन थांबवले. स्थानिक गाव समाजाच्या आग्रहाने दहा वर्षापूर्वी लोकपंचायत संस्थेने डांगी जतन आणि संवर्धंनासाठी लोककेंद्री उपक्रम हाती घेतले. डांगी गोवंशाच्या समस्या लक्षात घेतल्या. कृषी जैवविविधतेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून डांगी संवर्धनाचे काम हाती घेतले. दरम्यान ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनखाली ‘महाराष्ट्र जनुक कोश’ या नावाने महाराष्ट्रात जैवविविधता संवर्धन कार्यक्रम सुरू झाला. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने निवडक गावात डांगी गोवंशाच्या समस्यांचा अभ्यास केला आणि त्याआधारे दीर्घकालीन डांगी गोवंश संवर्धनाचे काम लोकपंचायत करत आहे.
शास्रीय अभ्यास, कृती संशोधन, जाणीव- जागृती, शासकीय विभाग आणि यंत्रणांच्या मदतीने स्थानिक डांगी गोवंश आधारित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सर्वंकष कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पंधरा गावे आणि चाळीसहून अधिक वाड्या-वस्त्यांवर डांगी संवर्धन प्रक्रिया सुरू आहे. दुर्गम भागात पशुवैद्यकीय उपचार सुविधा, लसीकरण शिबिरे, प्रशिक्षण कार्यशाळा, डांगी मित्राद्वारे संवर्धनासाठी आश्वासक वातावरणनिर्मिती केली जात आहे. भविष्यात हा कार्यक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील सहा जिल्हे आणि चौदा तालुक्यांत पोहचवण्याचा संस्थेचा मानस आहे.
डांगी संवर्धनावर काम करताना, मानव आणि निसर्गातील जैव-सांस्कृतिक अशा शाश्वत नात्याची नव्याने उकल झाली. रानटी चाऱ्याच्या अभ्यास करताना राखणरानासारखी लोककेंद्री शाश्वत चारा व्यवस्थापन पद्धत प्रकाशात आली. नव्या पिढीतील डांगी पालकांना या प्रश्नावर संवेदनशील बनवले, त्याचाही एक चांगला परिणाम दिसतो आहे. गायी आजारी पडल्या, तर डांगी मित्र व पशुवैद्यकांना बोलावणे येते. गाभण गाईंची विशेष काळजी घेण्यास पालक मंडळी सरसावली आहेत. अशा या विविध प्रयत्नांतून एक उत्साहाचे वातावरण कार्यक्षेत्रात दिसत आहे.
कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील डांगी पालकांनी लोकपंचायतच्या मदतीने ‘डांगी गोवंश पैदासकार आणि संवर्धक संघ’ (ब्रिडर्स असोसिएशन) स्थापला आहे. त्या माध्यमातून डांगीकेंद्रित उपजीविका सक्षम होण्यास मदत होईल. डांगीशी असलेल्या जैव-सांस्कृतिक नात्याला शाश्वत अर्थकारणाची जोड मिळाल्यास नवी पिढीही डांगी पालनाची परंपरा सुरू ठेवेल. भविष्यात लोकपंचायतचे काम थांबले तरी, डांगी या देशी गोवंशासंबधी एक व्यवस्था टिकून राहील आणि अधिक उत्क्रांत होईल, अशी आशा आहे.
डांगी संवर्धनासाठी काय करता येईल?
‘लोकपंचायत’ने अकोले तालुक्यातील निवडक पंधरा गावांत पारंपरिक डांगी पालकांसोबत गेल्या सहा वर्षांत विविध उपक्रम राबवले. डांगी संवर्धनाचे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी स्थानिक गावकरी, ब्रिडर्स असोसिएशन, सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था ते गोवंशाचे अभ्यासक या सर्वांचाच सहभाग व पाठबळ लागणार आहे. त्या सर्व घटकांसाठी अनुभवाच्या आधारे काही शिफारशी कराव्या वाटतात. त्या अशा...
डांगी हा सह्याद्रीतील (पश्चिम घाटातील) कृषी जैवविविधतेचा एक घटक म्हणून विशेष ओळख देणे.
शुद्ध डांगी गोवंश निर्मितीसाठी सुलक्षणी गायी व जातिवंत वळू यांच्या निर्मितीसाठी सातत्यपूर्ण लोकशिक्षण प्रक्रिया राबवणे.
उपजीविकेच्या दृष्टीने पारंपरिक डांगी व्यवस्था सक्षमीकरण व जतन- संवर्धन कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करणे.
विविध आजारांच्या निदान, उपचारांसाठी पारंपरिक लोकज्ञान आणि आधुनिक पशुवैद्यकीय ज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणे. त्यात गावपातळीवर डांगी-मित्र संकल्पना राबवणे.
रानटी आणि शेतातील चाऱ्यावर प्रक्रिया / मूल्यवर्धन प्रक्रियेस चालना देणे. राखणरान या लोककेंद्री प्रक्रियेला मान्यता देणे.
vijaysambare@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.