आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:“बोलत राहणं गरजेचं आहे.”

नसीरुद्दीन शाहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर भारतातील काही मुस्लिम गटांनी त्याचं समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ्य अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. त्यांत त्यांनी भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हटलं की, “तालिबानची सत्ता आल्यानंतर ज्यांनी आनंद व्यक्त केला त्यांनी यावर विचार करायला हवा की त्यांना आपल्या धर्मात सुधारणा हव्या आहेत की त्यांतील दहशतवादीपणा हवाय?” या विधानासाठी हिंदूत्त्ववादी समर्थकांनी त्यांचं अभिनंदन केलं तर मुस्लिमांनी टीकेची झोड उठवली. याच व्हिडीओसंबंधी ‘द वायर’च्या सिनियर एडिटर, आरफा खानम शेरवानी यांच्याशी बोलतांना शहा यांनी व्यक्त केलेले विचार.

अफगाणिस्तानात सध्या जे वातावरण आहे ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हे सारं बोलणं गरजेचं आहे. मी काही चूकीचे शब्द वापरले असतील. ‘आनंद साजरा केला’ असं मी म्हणायला नको होतं. मला असं म्हणायला हवं होतं की जे लोक तालिबानच्या येण्याचं समर्थन करत आहेत, भारतात कोठेही त्यांच्या येण्याचा आनंद साजरा करण्यात आला नाही. मला वाटतं की माझी हीच गोष्ट अनेकांना समजली नाही. विशेषतः भारतीय मुस्लिमांना. त्यांना असं वाटलं की मी सर्वंच मुस्लिमांवर आरोप करतोय. भाजप समर्थकांनी हीच गोष्ट वेगळी करून तिला मोठं केलं आणि मला शाबासकी दिली. मला त्यांच्या शाबासकीची गरज नाही आणि त्यांच्याकडून मला प्रमाणपत्रही नको आहे. त्यांचं आनंदीत होणं तितकंच चूकीचं आहे जितकं मुस्लिमांचं माझ्यावर नाराज होणं. मला असं वाटतं की धर्माकडे संकुचित दृष्टीनं बघण्याची वृत्ती आता देशांत वाढत चालली आहे.

मी म्हटलं की, भारतीय इस्लाम हा जगभरातील अन्य इस्लामपेक्षा वेगळा आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला की हे चूकीचं आहे, इस्लाम सगळीकडे एकच आहे, मग मी असं कसं म्हटलं? मला त्यावर वाद घालायचा नाही. मी ‘सुधारणा’ या शब्दाचा वापर केला होता ज्यावर मी अजूनही कायम आहे. गेल्या काही वर्षांत मी पाहिलंय की अनेक मुसलमान तरुण दाढी वाढवून, टोप्या घालून, आखूड पायजामे घालून फिरत आहेत. मला त्याविषयीही काही अडचण नाही. पण मला हिजाबमुळे त्रास होतो. बुरखा हा शब्द कुराण शरीफमध्ये कोठेही नाही. हिजाब शब्द आहे पण त्याचा संबंध कपड्यांशी नाही. त्याचा संबंध नजरेच्या हिजाबशी आहे. परदा हा नजरेचा असतो. मला असं वाटतं की आपलं मन अनावश्यक गोष्टींकडेच जास्त जातं. विशेषकरून कपडे आणि बुरख्याविषयी. ही काही नवीन गोष्ट नाही की धर्माच्या ठेकेदारांनी धर्मग्रंथातील गोष्टी आपल्या स्वार्थासाठी हव्या तशा वाकवल्या आहेत. हे फक्त इस्लाममध्येच झालेलं नाहीये. मला असं वाटतं की आपलं लक्ष मुस्लिम तरुणांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या जगण्याकडे जास्त जायला हवं. मदरशांमधील तालमीला माझा विरोध नाही पण त्यांना आधुनिक शिक्षणही मिळायला हवं. ज्यामुळे त्यांना या जगात त्यांचं स्थान मिळेल. आपल्याला या गोष्टीचा त्रास व्हायला हवा की मुस्लिम तरुणांना अनेक क्षेत्रांमध्ये संधी मिळत नाही, योग्य शिक्षण मिळत नाहीये आणि यावर आवाज उठवण्याऐवजी आपण फालतू गोष्टींवरच वाद घालतो. सुधारणा या शब्दाचा वापर मी या संदर्भात केला होता. आपण तिहेरी तलाक रद्द केला आहे ही सुधारणा आहे जी मला अपेक्षित आहे. मी कुराण शरीफ बदलण्याची नाही तर ते मोकळ्या मनाने समजून घेण्याची गोष्ट करतोय. आम्ही (भारतीय मुस्लिमांनी) स्वतःला इतकं पात्र बनवायला हवं की कोणी आम्हाला नाकारूच शकणार नाही. कुराण शरीफचे संदर्भ देऊन आम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. तिथे आम्हाला आधुनिक शिक्षणच मदतीला येईल. तर ते आम्ही का घेत नाही हा माझा प्रश्न आहे.

दहशतवाद हा शब्द मी जेव्हा वापरतो तेव्हा तो संपूर्ण मानवी इतिहासाच्या संदर्भात वापरतो. मुस्लिमांमध्ये महमुद गझनी, नादीरशाह ही अशी माणसं आहेत ज्यांचा आदर्श घेण्याची आम्हाला गरज नाही. आम्हाला भारतीय उदार मुस्लिम धर्माचा आदर्श बाळगायला हवा जो या देशात जन्मला आणि ज्याची जोपासना आजवर झाली. हिंदुस्थानी इस्लाम हा असा धर्म आहे जो अमर होता, आहे आणि राहिल. ज्याने संगीत, शायरी, कलाकारी, चित्रकला, तसेच गंगा-जमुनी तहजीबची देणगी आपल्याला दिली आहे. इथे बायकांना गोषात गुंडाळलं जात नाही, कोणावर बंदी घातली जात नाही, कोणाचे हात-पाय किंवा डोकं कापलं जात नाही. हा माझ्या दृष्टीने खरा हिंदुस्थानी इस्लाम आहे. आपल्यासमोर अडचणी आहेतच. पण आपल्याला त्याच्यावरती उठायला हवं. त्यासाठी शिक्षणाचा आधार घ्यावा लागेल. कट्टर वहाबी विचारांची नाही तर सुफी विचारांची उदार परंपरा आपल्याला जवळ करावी लागेल. कुराण शरीफविषयी मला अडचण नाही. पण त्याचा आपण काय अर्थ लावतो हे महत्त्वाचं आहे. ते शब्दशः पाळणं चुकीचं आहे. कारण आजच्या काळात त्यांतील सारेच संदर्भ लागू होत नाहीत. माझ्या दृष्टीने उदार मुस्लिम तो आहे जो आपलं आयुष्य केवळ धर्माच्या आधारे जगत नाही. धर्म गरजेचा आहेच पण योग्य शिक्षण, चांगले संस्कार आणि आपल्या आजूबाजूचं जग समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता आली असली तरी त्यांचा मार्ग चूकीचा आहे, असं मला वाटतं. कारण यांत महिलांना कोणतंच स्थान नाही. तिथे जी पुरुषसत्ताक संस्कृती येत आहे ती नष्ट व्हायला पाहिजे. आज जो आपण लव्ह जिहादचा तमाशा बघतोय हे देखील पुरुषसत्ताक वृत्तीचंच उदाहरण आहे. त्यांतून अप्रत्यक्षपणे असंच सुचवलं जातं की बायकांना अक्कल नसते, त्यांना समज नसते आणि त्यांना कधीही फसवता येऊ शकतं.

मला आज हे सारं बोलावं लागतंय कारण आजची आपली सामाजिक राजकीय परिस्थिती तशी आहे. पूर्वी असं काही बोलण्याची गरजच नव्हती. मुसलमान असणं माझ्यासाठी अडचणीचं आहे असं मला कधीच वाटलं नाही. पण मागील दहा वर्षांत वातावरण इतकं बदललंय की हा आपला तोच देश आहे का हे ओळखता येत नाहीये. पूर्वी आम्ही एकमेकांच्या धर्मावरून चिडवायचो, विनोद करायचो पण त्यांत तिरस्कार नसायचा. आता अशा गोष्टी आपण सहजपणे नाही बोलू शकत. विनोदावरही बंदी लावण्यात आली आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आजच्या सत्तेची हीच इच्छा आहे की मुसलमानांनी घाबरतच जगावं आणि आम्ही घाबरलो तर ती सर्वांत मोठी चूक ठरेल. हे वातावरण आधी नव्हतं. मला या सर्वांची चीड येते, आणि चिंताही वाटते. पण मी हेच म्हणेन की आमच्या मनातून ही भिती आम्हाला काढायलाच हवी. हा आमचा देश आहे, आमचं घर आहे आणि इथून आम्हाला कोणीही बाहेर हाकलू शकत नाही. आमची जागा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण आम्हाला त्यासाठी स्वतःला पात्र बनवावं लागेल तेव्हाच आमची जागा आम्हाला देण्यात येईल. ती देण्यासाठी कोणी मनाई करणार नाही. पण आम्ही जुन्या काळातच जगत राहिलो तर मात्र हे कधी होणार नाही.

मुसलमान असल्यामुळे मला हिंदी चित्रपट सृष्टीत कोणताही त्रास झाला नाही. माझ्या आईवडीलांनी मला आधुनिक शिक्षण दिलं, धर्माचा एक उदार दृष्टीकोन त्यांनी आमच्यासमोर मांडला ज्यामुळे माझ्या मनांत धर्मांधतेचं विष कधीच रुजलं नाही. त्यामुळेच माझ्या मुसलमान असण्याचा मी डांगोरा पिटला नाही की त्याची लाजही बाळगली नाही. पण फाळणीच्या काळातलं उरलंसुरलं विष आता लोकांच्या अंगात भिनत आहे. वेगळं असण्याची जी भावना आहे, तिचा गर्व वाटण्याचा हा काळ आहे. त्याची मला खंत वाटते कारण याचा चांगला परिणाम होणं शक्यच नाही. २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर मी काही निराश झालो नव्हतो. उलट मला आशा होती की नवं सरकार विकासाचा, उदारमतवादाचा रस्ता चालेल, आपले प्रधानमंत्री त्यादृष्टीनं काम करतील. पण तसं झालं नाही. त्याऐवजी आम्हाला दाबण्यात येतंय, वेगळं करण्यात येतंय ज्याचा विरोध करायलाच हवा, त्याविरोधात लढायलाच हवं आणि बोलायलाच हवं. आपल्या घरासाठी, देशासाठी, हक्कांसाठी आम्हाला हे करावंच लागेल. कारण सत्ताधारी पक्षदेखील धर्मांधांपेक्षा वेगळा विचार करत नाहीये. आमचे प्रधानमंत्री स्वतः विज्ञान परिषदांमध्ये जुन्या काल्पनिक गोष्टींविषयी बोलत राहतात आणि सारे शास्त्रज्ञ निमुटपणे त्यांचं बोलणं ऐकत राहतात. आमच्या प्रधानमंत्र्यांची एका प्रेषितासारखी प्रतिमा तयार करण्यात येत आहे. पण ते प्रेषितच होतात की आणखी काही हे बघावं लागेल. हिंदूराष्ट्राकडे आपली वाटचाल होत असेल तर ती अत्यंत अनैतिक गोष्ट आहे. त्यावर उपाय काय असू शकतो ते मला माहिती नाही पण त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देणं आणि बोलत राहणं गरजेचं आहे.

अनुवादः प्रतिक पुरी

divyamarathirasik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...