आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी आवाहन:आज आम्हाला शब्द द्या!

3 महिन्यांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

संजय आवटे, राज्य संपादक
आज घटस्थापना. खूप दिवसांपासून मळभ असलेले रस्ते आता फुलू लागलेत. उमेद पुन्हा घरात मुक्कामाला आली आहे. भलेबुरे विसरून लोक चैतन्याचे गाणे गाऊ लागले आहेत. ‘कोरोना’ला हरवत जग पुढे धावू लागले आहे. आनंदघट घरोघरी दिसू लागले आहेत.

नवरात्र हा सृजनाचा, स्त्रीशक्तीचा सोहळा. ‘ती’ आहेच अव्वल. सक्षम आणि सृजनशील. पण, नवरात्रात स्त्रीशक्तीचे गोडवे गाणारा आपला समाज किती दांभिक आहे, असे भयंकर पुरावेही मिळत असतात.

आजच्या अंकात नकारात्मक बातम्या देऊ नयेत, असे आम्ही ठरवले होते. पण, जे भयावह घडते आहे, ते लपवून चालणार नाही. आजार नाकारून उपचार करता येत नाही.

आपल्याला माणूसपणाच्या वाटेवर आणखी खूप पुढे जायचे आहे. स्त्रीला देव्हाऱ्यात बसवायचे आणि तिचे माणूसपणाचे हक्कही नाकारायचे, असा ढोंगी समाज, मग नराधम जन्माला घालतो. त्यामुळे बाई ना गर्भात सुरक्षित असते, ना घरात; ना रस्त्यावर, ना देवालयात. रात्रीच्या घनघोर अंधारावर मात करणाऱ्या रातरागिणींना आता दुर्गेचा अवतार धारण करत, या विषमतेचे निर्दालन करावे लागेल. येत्या नऊ दिवसांत आम्ही स्त्रीशक्तीचे असेच दर्शन घडवणार आहोत. बदलाच्या दिशेने एक पाऊल टाकणार आहोत.

स्त्रीशक्तीचा नुसता नऊ दिवसांचा जयघोष नको, स्त्रीला माणूसपणाचे हक्क हवेत, यासाठी आता आक्रमक व्हावे लागेल. व्यवस्थेला जाब विचारावा लागेल.

सुरुवात तर घरापासून करावी लागेल. नवरात्र उत्सव सुरू होत असताना, प्रत्येक पुरुषाने आणि स्त्रीनेही हाच संकल्प करायला हवा. घटस्थापना आणखी वेगळी काय असते?

आज भल्या सकाळी तुमच्या आनंदी घरात येताना, आम्ही हे वचन मागत आहोत. “मुली-महिलांसाठी माझं घर खुलं- मोकळं, भेदाभेदांच्या पलीकडं असणार आहे,” असा शब्द आज आम्हाला हवा आहे. द्याल?

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser