आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी आवाहन:‘फटाक्यांना या दिवाळीत दूर सारू, कोरोना रोखण्याची प्रतिज्ञा करू!’

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोपातील अनेक देशांना पुन्हा कोरोनाचा विळखा, कोरोना रोखण्यासाठी करा फटाकेमुक्त दिवाळी

युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियमसारख्या देशांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून भारतातही ही भीती आहे. ही लाट रोखायची असेल तर प्रत्येकानेच प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करत कोरोनासंबंधीची नियमावली काटेकोरपणे पाळावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. याचे मुख्य कारण प्रदूषण असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्राचा विचार करता सध्या कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९१.७१% आहे. राज्यात आज १७,१९,८५८ जणांना कोरोना बाधा होऊन गेली. यातील १५,७७,३२२ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. मृत्युदरही २.६३ % वर आला आहे. ही समाधानाची बाब असली तरी आगामी काळात कोरोनाचा नव्याने प्रसार रोखण्याची जबाबदारीही जनतेवरच असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

दिव्य मराठी आवाहन

दिवाळी हा दिव्यांचा सण. आनंदाचा उत्सव. आपल्या साऱ्यांच्या प्रयासातून आपण कोरोनावर मात करतोय. कोरोनाला हरवतोय. आता गरज आहे या कोरोनाच्या समूळ उच्चाटनाची. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आपल्याला आपल्याकडे येणारी ही लाट रोखायची आहे. आपल्याला पुन्हा एकदा एकता दाखवायची आहे. दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांतून प्रदूषणाचा स्तर वाढून पुन्हा एकदा कोरोना आपल्या घरात प्रवेश करू शकतो. त्याला गावाच्या वेशीवरच रोखा. चला तर मग यंदाची दिवाळी आपण प्रदूषणमुक्त दिवाळी म्हणून साजरी करूयात. ‘दिव्य मराठी’ वाचकांना आवाहन करत आहे. आमच्या अभियानात सहभागी व्हा. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखूयात. कोरोनाला हरवूयात...

वाऱ्याचा वेग मंदावल्याने विषाणूला मिळू शकते बळ

हिवाळ्यात वाऱ्याचा वेग मंदावलेला असतो. दिवाळीत फटाके उडवल्यानंतर झालेल्या प्रदूषणामुळे हवेतील विषाणूसाठी पोषक वातावरण तयार होऊन कोरोनाचा वेगाने प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे दिवाळीत प्रदूषण रोखण्यावर साऱ्यांचा भर असावा, असे तज्ज्ञ सांगतात. प्रदूषणामुळे फुप्फुसाचे विकारही बळावू शकतात, त्यामुळे काळजी घ्यावी.

एक्स्पर्ट व्ह्यू : प्रदूषण जितके कमी, तितकी जोखीम कमी (डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी)

उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने वर्तवलाच आहे. या कालावधीत विषाणूसाठी पोषक असे वातावरण असते. यातच दिवाळी सणात फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलेच तर कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने होण्याची भीती नाकारता येत नाही. यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी करून आपण कोरोनाचा प्रसार किंवा येणारी दुसरी लाट रोखू शकतो. प्रत्येकाने कोरोनासंबंधीचे नियम पाळावे व काळजी घेणे गरजेचे.

बातम्या आणखी आहेत...