आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:अबोल स्वप्नाचा अर्थ गहिरा..!

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशांत दप्तरे (लेखक, दिग्दर्शक)

आपण वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट, लघुपट पाहतो. पण, कोणत्याही फिल्मची निर्मिती एका विशिष्ट भाषेत झाली असेल, तर आशय पोहोचवण्याच्या बाबतीत त्यावर आपोआपच मर्यादा येतात.

हे लक्षात घेऊन आम्ही सायलेन्ट शॉर्टफिल्म अर्थात मूक - लघुपट करायचे ठरवले. त्यातूनच जन्माला आली, समाजाच्या दृष्टीने एका उपेक्षित, वंचित मुलाच्या अगदी साध्या स्वप्नाचा अबोल संघर्ष चितारणारी फिल्म... एमएम

शॉर्टफिल्म तयार करण्यासाठी कथेचा विचार डोक्यात घोळत होता. अशातच एक दिवस मी सिग्नलवर उभा होतो. तोच मला काही मुले उदरनिर्वाहासाठी फुले, फुगे, खेळणी विकताना दिसली. डोक्यात विचार सुरू झाले आणि तिथेच मला कथेचा विषय मिळाला. कथेच्या नायकाचे आयुष्य साधे-सोपे, सरळ होते. पण, त्याची स्वप्ने काय असू शकतात? आणि ती कशी पूर्ण होऊ शकतात? त्याला किती आणि काय संघर्ष करावा लागू शकतो? असे अनेक प्रश्न डोक्यात घर करू लागले. ही कथा कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका लहान मुलाभोवती फिरते. रोज सकाळी उठताच तो हातात गोणी घ्यायचा नि शहरभर फिरायचा. प्लास्टिकचा कचरा वेगळा, लोखंड, काच वेगळे करत भटकत राहायचा. या रोजच्या उपेक्षित, रटाळ आयुष्यात या मुलाला सिनेमाचे अक्षरशः वेड लागते. तो रोज चित्रपटगृहाच्या जवळून जायचा. या मोठ्या पडद्यावर आपण एकदा तरी सिनेमा पाहायचा, हे त्याचे स्वप्न. ते पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, त्या संघर्षाची कहाणी म्हणजे '७० एमएम'... या शॉर्टफिल्मसाठी निवडलेली कथा वेगळी, हटके करायची होती. त्यासाठी माझे पहिले प्राधान्य होते मूकपटाला. आपली फिल्म मूकपट असेल, तर ती कशी साकारायची, याविषयी मी टीमसोबत चर्चा करून योग्य ती खबरदारी घेतली. हा माझा पहिलाच लघुपट असल्याने मोठे दडपण होते. मात्र, मला माझ्या टीमने साथ दिली. आम्ही ही कामगिरी मोठ्या नेटाने पार पडण्याचा प्रयत्न केला. लघुपटासाठी हवे असलेले लोकेशन उपलब्ध करून देत अंकुश मोरे यांनी निर्मितीचा मोठा भार उचलला. निखिल भोले यांनी छायांकन, कुणाल देशमुख यांनी संगीत, हर्षल भुजबळ यांनी संपादन आणि ग्राफिक्सची बाजू पेलली. कैवल्य गायधनी आणि शुभम भगत यांनी सहाय्यकाची भूमिका पार पाडली. लघुपटातील मुख्य पात्राच्या निवडीची कहाणीही मोठी गंमतशीर आहे. यामध्ये मुख्य बालकलाकार वंदन वेलदे आहे. एक दिवस तो माझ्या घराच्या बाहेर उभा होता. माझी नजर त्याच्यावर पहिल्यांदा पडली, तेव्हा मला तो अगदी गरजू आणि असहाय वाटला. मला त्याची कीव आली. म्हणून मी त्याला काही पैसे देऊ केले, पण तो घेईना. आमचं असं बराच वेळ सुरू होतं. तो काही सांगेना, बोलेना अन् पैसेही घेईना. त्यामुळे मलाही नेमकं काय करावं, ते समजेना. हे दृश्य

पाहून आमच्याच घरात असलेले वंदनचे वडील बाहेर आले. खरे तर, ते काही कामानिमित्त माझ्या
भावाला भेटायला आले होते. त्यांच्यासोबतच वंदन आला होता. त्याकाळात तो एका नाटकाची
तालीम करत होता. आणि तालमीतील जुन्या कपड्यांवरच आल्याने घराबाहेर थांबला होता. त्याच्या
वडिलांकडून हा खुलासा झाला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तो खरोखरच एखादा गरजू मुलगा
आहे, असे वाटत होते. पण, तो एक बालकलाकार आहे, हे समजल्यावर मी थक्क झालो. आता
मला माझ्या लघुपटासाठी नायक मिळाला होता. उपेक्षित, वंचित मुलाच्या भावविश्वात डोकावणाऱ्या
माझ्या मनातल्या कथेला मौनाची भाषा देण्याचा प्रवास तिथूनच सुरू झाला...
अभिनयाची ‘अशीही’ पावती !
शॉर्टफिल्मचे शूटिंग सुरू होते. जुने कपडे आणि खांद्यावर असलेली गोणी बघून एका
हॉटेलचालकाने वंदनला वडापाव देऊ केला, तर दुसऱ्या एका दुकानदाराने त्याला हुसकावण्याचा प्रयत्न
केला. पण, शॉर्टफिल्मचे शूटिंग सुरू आहे, असे समजल्यावर त्यांची तारांबळ उडाली. हा प्रसंग बघून
आम्हाला त्यावेळी हसू आले. खरे तर, वंदन ही भूमिका हुबेहूब वठवत असल्याची ती पावतीच होती.
त्याने केलेले काम बघून त्याची निवड योग्य असल्याची खात्री पटली.

संपर्क: ९०२८९८६२५५

बातम्या आणखी आहेत...