आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:''फ्रायडे फ्लेम''चा उजेड जेव्हा पसरत गेला!

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजा कांदळकर

४ जून २०२१ रोजी राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेला 80 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने राष्ट्र सेवा दलाने गेल्या महिन्याभरापासून जैविक आणि वैचारिक करोनाच्या विरोधात ''फ्रायडेफ्लेम''ऑनलाइन अभियान सुरू केले होते. देशभरातील विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या अभियानाचा समारोप नुकताच झाला. त्या निमित्ताने...

कोरोनामुळे नव्हे तर केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे बळी गेले. हे विधान जरी धक्कादायक असले तरी देशभरातील अनेक मान्यवरांनी या विधानाबाबत सहमती दर्शवली आहे. केंद्र सरकार नाकर्ते असल्यामुळे माणसं मारताहेत, याविरुद्ध संयुक्तपणे लढण्याचा निर्धार देशातील कलावंत, विधिज्ञ, लेखक, मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्ते यांनी राष्ट्र सेवा दलाच्या ''फ्रायडेफ्लेम'' या कार्यक्रमात केला. ४ जून २०२१ रोजी राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेला 80 वर्षे पूर्ण झाली.

त्या निमित्ताने राष्ट्र सेवा दलाने गेल्या महिन्याभरापासून जैविक आणि वैचारिक करोनाच्या विरोधात फ्रायडेफ्लेम ऑनलाइन अभियान सुरू केले होते. देशभरातील विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या अभियानाचा समारोप नुकताच झाला.

आधीच आर्थिक संकट, त्यात जैविक आणि वैचारिक करोनाचे संकट. त्याचा सामना कसा करायचा या विषयावर नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन यांनी `फ्रायडेफ्लेम ऑनलाइन अभियानाचा समारोप करताना केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर प्रखर हल्ला चढवला. कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागले आणि देशातील सामान्य माणसांचे त्यामुळे अधिक हाल झाले याकडे सेन यांनी लक्ष वेधले. ते भाषणात म्हणाले, कोरोना काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार आरोग्याच्या प्राथमिक सोयी नागरिकांना उपलबध करून देऊ शकले नाही. पंतप्रधानांनी लोकांना लोकडाऊनच्या काळात घरात बसायला सांगितलं पण लोकांना नोकऱ्या नाहीत, उत्पन्नाची साधने नाहीत याकडे दुर्लक्ष केलं.

स्थलांतरित मजुरांचे खूप हाल झाले. अगोदरच नोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. काळा पैसा येईल म्हणून हा उपद्व्याप केला होता. पण काळा पैसा आला नाही. उलट उद्योग धंदे बुडाले, शेती उद्धवस्त झाली. लाखो रोजगार गेले. बेरोजगारी वाढली. त्यांनंतर कोरोनाने कहर केला. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात भारताची खूप पिछेहाट झालीय. सध्या भारतात समान लस धोरण नाही, ही खेदाची बाब आहे. दुसऱ्या बाजूला भारतात विद्वत्तेच्या पडझडीचे संकट आहे. सध्याचे सरकार भारताचा खरा स्वभाव ओळखू शकले नाही म्हणून या समस्या तयार झाल्या आहेत.

भारताने अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी चीन आणि दक्षिण कोरिया पासून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. महात्मा गांधी यांनी दिलेला सेक्युलॅरिझमचा विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला जातिनिर्मूलनाचा धडा भारतीयांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरेल याचीही शेवटी सेन यांनी आठवण करून दिली. राष्ट्र सेवा दलाच्या महिनाभर सुरू असलेल्या फ्रायडे फ्लेम कार्यक्रमात डॉ. गणेश देवी,मल्लिका साराभाई, नंदिता दास, डॉ. बाबा आढाव,कन्हैयाकुमार, एअर मार्शल मतेश्वरन, इंदिरा जयसिंग, जयती घोष, अंतरा देव सेन, कविता लंकेश, डॉ. झहीर काझी, निखिल वागळे, जयंती नटराजन, महात्मा गांधी यांचे नातू प्रा. राजमोहन गांधी,, विधीज्ञ आनंद ग्रोव्हर, प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रवीण कुमार, महाराष्ट्र टाइम्सचे श्रीकांत बोजेवार, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर, जेष्ठ पत्रकार आत्मजित सिंग, माजी आयएएस अधिकारी, नागरिक हक्क चळवळीचे नेतेहर्ष मंदेर, मॅगसेसे पुरस्कार विजेते, शेतकरी हक्क चळवळीतले नेते संदीप पांडे, धार्मिक सद्भावनासाठी लढणारे कार्यकर्ते फैसल खान, अर्थतज्ज्ञ हेमंत शहा, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सदगोपाल, हिंदी भाषेतील जागतिक कीर्तीचे समकालीन साहित्यिक, कवी अशोक वाजपेेयी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, अभिनेते किशोर कदम, अभिनेत्री चिन्मयी सुमित असे विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

ख्यातनाम नृत्यांगना मल्लिका साराभाई यावेळी म्हणाल्या, हिंदू राष्ट्राच्या नावाखाली वैचारिक हिंसा वाढतेय. द्वेष वाढतोय, हे संकट कोरोनापेक्षा भयावह आहे. गेली सात वर्षे आपण पाहतोय हा देश वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होतोय. तो प्रयत्न रोखण्यासाठी , देश वाचवण्यासाठी नागरिक चळवळीची गरज आहे. डॉ. कन्हैया कुमार म्हणाले, कोरोनाने अराजकाची परिस्तिती निर्माणझालीय. केंद्र सरकारने आरोग्य व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष्य केल्याने हे संकट आलेलं आहे.

देशात प्रत्येक घरात असुरक्षितता आहे. गरीब तर या संकटात परेशान आहेतच, पण स्वतःची विमान असणारे, हॉस्पिटल्स असणारे श्रीमंतही सुरक्षित नाहीत. देशाची शिक्षण व्यवस्था मोडून टाकण्यात येत आहे. वैचारिक,आर्थिक विषाणू जास्त घातक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याविरुद्धलढाईचा संकल्प करूयात. आपण एकत्र आलो तर या अंधारातही आशेचा किरण नक्की दिसेल.

विधीज्ञ आनंद ग्रोव्हर यांनी केंद्र सरकार संविधानातील मूल्ये पायदळी तुडवतेय, नागरिकांचे आरोग्याचे हक्क नाकारतेय त्यामुळे ही वेळ आल्याचे सांगितले. देशात सर्वाना मोफत लस मिळावी, छोट्या राज्यांना लस पुरवण्याच्या बाबतीत वाऱ्यावर सोडू नये यासाठी जनरेटा तयार करावा असे आवाहन केले. एअर मार्शल मतेश्वरन यांनी देशात कोरोनाच्या आडून बहुसंख्याकांचा फॅसिझम वाढतोय हे सांगून मनुस्मृतीवर आधारलेली व्यवस्था आणण्याचे केंद्र सरकारचे मनसुबे असल्याचा धोका मांडला. अभिनेत्री नंदिता दास यावेळी म्हणाल्या, कोरोनाकाळानंतर आपलं जीवन बदललेलं असेल. आपण सच्चाईच्या सोबत राहुयात. कोरोनाने गरिबांची हालत गंभीर आहे, त्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यांना मदत करूयात, त्यांच्यासाठी लढूयात, या लढाईत मी आपल्या सोबत असेन. कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले की, आपण कोरोनावर नक्की मात करू मात्र देशात सुरू असणाऱ्या घाणेरड्या राजकारणाकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे. आता गांधी, आंबेडकर यांच्यासारखे नेते तयार होण्याची वाट पाहत बसू नये. सर्वांनी एक होण्याची गरज आहे.

त्यादृष्टीने मला सेवा दलाने घेतलेला देशव्यापी पुढाकार महत्वाचा वाटतो. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी यावेळी केंद्र सरकार आणि देशाचे पंतप्रधान नाकर्ते आहेत, असा गंभीर आरोप केला. ते

पुढे म्हणाले, देशातल्या नागरिकांचा आरोग्याचा हक्क डावलला गेलाय. त्यातून लोकांचे हकनाक बळी गेले. देशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कोविड सेंटर उभारून, इतर मदत करून अनेक नागरिकांना वाचवले. त्यांना सलाम! कोरोना संपेल पण वैचारिक कोरोनाशी दोन हात करावेच लागतील, गांधी, आंबेडकरांच्या विचाराने आपण ही वैचारिक लढाई लढू. लोकांमध्ये जावे लागेल, बोलावे लागेल, लोकांची मनं बदलूया. राजमोहन गांधी यांनी 1946- 47 साली देशात जे सामाजिक वातावरण होतं तसं विद्वेषाच वातावरण आज आहे, याबद्दल चिंता व्यक्त केली. या वातावरणातून देश वाचवायचा तर हा देश सर्वांचा आहे, हिंसेचे तांडव माजवून कोणताही धर्म वाचणार नाही हा विचार उराशी बाळगून जगणारांची संख्या वाढवली पाहिजे.

"फ्रायडे फ्लेम'मागची भूमिका राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी स्पष्ट केली. कोरोना महामारी म्हणजे भारताच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात उद्ध्वस्तकारक आपत्ती आहे. आजपर्यंत या विषाणू संसर्गाने जवळजवळ दोन कोटी नागरिकांना बाधित केले आहे. तर दरदिवशी सुमारे चार लाख नवे संसर्गित रुग्ण आढळत आहेत. सध्या कोरोना साथीची दुसरी लाट सुरू आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भविष्यात भारतात या साथीची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता आहे. आपण या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचारही केलेला नाही. आधुनिक भारताच्या इतिहासात आजपर्यंत आलेल्या अन्य कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत बळी पडलेल्या नागरिकांच्या संख्येपेक्षा या साथीत बळी पडलेल्या नागरिकांची संख्या खूप अधिक आहे. प्रश्न आहे आपण एक समाज म्हणून या राक्षसी संकटाला कसे तोंड देणार आहोत? याचा एक मार्ग म्हणजे देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करणे आणि त्याला मानवी संसाधनांची जोड देणे. कोरोना लस उत्पादन आणि ऑक्सिजन उत्पादनाला गती देणे. कोरोना संसर्गाच्या फटक्याने आजपर्यंत देशातील कोट्यावधी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या कुटुंबानी आपली जवळच्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत,आपली उपजिविकेची साधने गमावली आहेत, जगण्याची उमेदच गमावली आहे. कोरोना हे एक व्यक्तिगत संकट नाही. ते एक अभूतपूर्व सार्वत्रिक असे जागतिक संकट आहे. या संकट समयी आपण साथीत विविध प्रकारे बळी ठरलेल्या नागरिकांचे स्मरण करुन त्यांना आपली आदरांजली अर्पण करू. पण त्याच बरोबर द्वेष, आणि अन्याय सहन करत विविध संघर्ष करताना बलिदान करणाऱ्या सर्व धैर्यवान भारतीयांना केलेला तो मानाचा मुजरा असावा, असे डॉ. गणेश देवी यांनी आपल्या प्रास्ताविकात भूमिका मांडली. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. फ्रायडे फ्लेम हा केवळ श्रध्दांजलीचा कार्यक्रम नाही तर वैचारिक कोरोनाविरुद्ध लढायचं बळ यातून मिळेल, असे ते म्हणाले.

सध्या गाजणारे, कोविड महामारीत केंद्र सरकारचं अपयश वेशीवर टांगणारे, गुजराती कवियित्री पारुल कक्कर यांचं 'शववाहिनी गंगाे' हे असंतोषाचं गाणं यावेळी सादर झाले. 'हम देखेंगे' हे फैज अहमद फैज यांचे गीत, लोकशाहीर संभाजी भगत यांचे संघर्ष गीत यावेळी ऐकायला मिळाले. नागरिकत्व हक्काचे काय? याविषयी या कर्यक्रमात हर्ष मंदेर यांनी चर्चा केली. शेतीवरच्या संकटांविषयी संदीप पांडे बोलले. सामाजिक सलोख्याचे पदर फैसल खान यांनी उलगडून दाखवले. केंद्र सरकारची फसलेली आर्थिक धोरणे याची चिकित्सा हेमंत शाह यांनी यावेळी केली.तर शिक्षण व्यवस्थेच्या संकटाबद्दल अनिल सद्गोपाल यांनी विवेचन केलं.

संपर्क - ९९८७१२१३००

बातम्या आणखी आहेत...