आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीर रिएक्सप्लोअर्ड:मुक्तिगामी तत्त्वज्ञानाचा कळस...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी भगत
येत्या गुरुवारी म्हणजे २४ जूनला कबीराची जयंती... त्यांच्या ना जन्माचा पत्ता ना मृत्यूचा,
ना धर्माचा जातीचा, ना कुळाचा ना वेळाचा. तो त्या सगळ्याच्या पलीकडचा. पलीकडे जाण्यासाठी बोट धरून रस्ता दाखवणारा. गेली अनेक शतकं कबीर अस्तित्वात आहे, शाश्वत शब्दब्रह्माच्या रूपानं. अनेकांनी त्याचं अनेक अंगांनी आकलन करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळा कबीराच्या दोह्यात नवं काही सापडतं. हे नवंपण त्या त्या काळातल्या जीवनव्यवहाराला सहजी व्यापून टाकतं.

जाती-धर्मांमधील तणाव तीव्र झाले असताना मध्ययुगापेक्षा आजच्या काळात कबीराची गरज अनेक पटींनी वाढली आहे. माणसा-माणसातील दरी रुंदावत चालली आहे. देश फुटेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही वीण दोन्ही बाजूंनी ताणली जात आहे. सर्व धर्मांतील पुरोहितशाही अतिशय आक्रमक झाली आहे. त्यांच्या पंखाखाली अर्थव्यवस्था, राजव्यवस्था, विद्यापीठे आली आहेत. ज्ञानाची केंद्रे या कचाट्यात सापडली आहेत. अशावेळी कबीर हाच दिलासा आहे...

कबीराची आणि माझी भेट संगीताच्या माध्यमातून झाली. साठच्या दशकात महाराष्ट्राच्या तळागाळातील जातींमध्ये कबीरपंथाची भजने गाणारी मंडळी होती. विशेषत: अस्पृश्य वस्त्यांमध्ये मयताच्या प्रसंगी, दशक्रिया विधीच्या वेळी ही मंडळी भजने गात. त्यांचा अर्थ त्यावेळी मला कळतनव्हता, पण ते संगीत खोलवर भिडलं होतं. कबीराच्या भजनांच्या त्या चाली भैरवीत होत्या. त्यांचे बोल ही त्यांची ताकद होती. सांप्रदायिक भजनांपेक्षा त्यांचा आशय वेगळा होता. ती भजनं माणसाला प्रश्न विचारणारी होती. ती तिथपर्यंत कशी पोहोचली माहीत नाही. ती भाषांतरित नव्हती, पण कबीराच्या तत्त्वज्ञानावरच बेतलेली होती. मौखिक परंपरेने चालत आलेली होती. एकतारी, दिमडी आणि टाळ एवढीच वाद्य होती त्या भजनांमध्ये. देहाची तार करून बनवला ताऱ्या... अशी ही कबीराची शब्दप्रधान गायकी आशयघन होती. संगीतात हरवून जाणारी नव्हती.

कबीराच्या भजनांची ही आशयघनता, माणसालाच प्रश्न विचारण्याच्या पद्धत यामुळे मी भारावून गेलो. मी कोण,माझ्या जगण्याचे प्रयोजन काय, हे कबीराचे प्रश्न मला अस्वस्थ करू लागले. माझ्या जगण्याची दिशा शोधण्यास प्रवृत्त करू लागले.

नंतर गाव सुटले आणि कबीराशी जोडलेले ते नातेही. पुढे मुंबईत आल्यावर कबीराचे हे सूर पुन्हा सापडले. घाटकोपरला असल्फा व्हिलेजमध्ये बारदानाच्या वस्तीत एका अंत्यविधीच्या प्रसंगी कबीराच्या भजनांचे ते बोल माझ्या कानावर पडले आणि तो धागा पुन्हा जुळला. त्या मंडळींचा शोध घेत मी बराच भटकलो. शेवटी घाटकोपरच्या पश्चिमेला एका डोंगरावरच्या कच्च्या वस्तीत ते सापडले. ते जालन्याकडून मुंबईत आले होते जगण्यासाठी. कुणी रस्त्यावर चप्पल शिवण्याचे काम करीत होते, कुणी प्लास्टिकवर लसूण विकण्याचे काम करीत होते. काहीजण तर काच-कचरा-भंगार विकणारे होते. पण, सगळ्यांच्या तोंडी कबीराची भजने. सहा महिने त्यांच्यासोबत काम केले. त्यांचेे

हार्मोनियम उचल, त्यांची एकतारी पकड अशी कामे करत त्यांची भजनं शिकलो. तेथे मला कबीराचा खरा भावार्थ कळला. त्यात भेटलेले आसाराम उमप आजपर्यंत माझ्यासोबत जलसे करीत आहेत. कबीराचे बोल अवैदिक होते. श्रमणाकडे जाणारे. पूर्णपणे या देशाच्या मातीतील. त्याचा पाया प्रेम होता. त्याने सर्व धर्मांतील पुरोहितांना प्रश्न विचारले. धर्मशास्त्राशिवाय ते प्रश्न गहरे होते... मुंह को कहा ढुंडे रे बंदे, मै तो तेरे साथ में.. हा प्रेमाचा संदेश देणारे होते. कबीर हा मध्ययुगीन संत असला, तरी त्याची दृष्टी काळाच्या खूप पुढे होती. त्याने सर्व धर्मांतील कर्मठ पुरोहितांना खडे सवाल विचारले. कबीराच्या त्या जीवघेण्या प्रश्नांची उत्तरे अजूनही कोणाला देता आलेली नाहीत. कबीराने त्यांनाच विचारले, ‘बोल, तुझा देव कुठे आहे?’ त्यांनी धर्मशास्त्रातील कवने सांगितली, पण कबीराच्या या मूलभूत प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाही. त्यांचे तत्त्वज्ञान मायावादी होते, कबीराने प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडले. किंबहुना कबीरासह संत नामदेव, संत रोहिदास, संत मीराबाई या सर्वच बहुजन संतांनी प्रेमाची दिशा दिली. मानवतेची भाषा शिकवली.

कबीराने विचारले, बमन हो के पुराण वाचे तो क्या साहेब मिलता है? हात मे लकडी उलटी पकडी तो क्या साहेब मिलता है? मुल्ला होके बांग पुकारे वो क्या साहेब बहरा है? मुंगी के पैर में घुंगरू बांधे तो साहेब सुनता है! प्रेमभाव से ध्यान लगावो उसको साहेब मिलता है!

कबीराने असे वेड लावल्यावर मग मी देशभरातील कबीर गाणाऱ्यांना गाठले. त्यांना भेटलो, त्यांची भजनं ऐकली. त्यांच्याकडून कबीर अधिक जाणून घेतला. कबीराचा तो काळ आणि त्याचे काम जसजसे उलगडत गेले, तसे त्याचे अफाट दर्शन होत गेले. तो काळ सोपा नव्हता. मध्ययुगात जिथे प्रेमाचा प्रवेश होतच होता, प्रेमाची चार कोवळी किरणे या जगावर पडत होती, त्यातूनच प्रेमाचा संदेश देणारे चिरस्थायी साहित्य निर्माण झाले. अजून खऱ्या अर्थाने जगात प्रेमाची निर्मिती व्हायची होती, प्रेमाचा सूर्य उगवायचा होता, पण कबीरासारख्या संतांमुळे मध्ययुगात जगाची दारं प्रेमासाठी किलकिली झाली.

उत्तरेकडून आलेल्या सुफी परंपरेचा कबीरावर प्रभाव होता तसाच सुफींवर कबीराचा. दोन्हीचा धागा एकच होता - देव वैगरे काही नाही, मानवी प्रेम हाच देव आहे, देव ही माणसाची निर्मिती आहे. या जगातील मुक्तिगामी तत्त्वज्ञानाचा पाया बुद्धाने रचला आणि कबीरासारख्या संतांनी प्रेमाचा कळस चढवला. मुक्तिगामी राजकीय - सांस्कृतिक चळवळीवर कबीराचा प्रभाव आहे. आत्मा वगैरे बाजूला काढून माणसा-माणसातील प्रेम, करुणा या मूल्यांची रुजवात त्यांनी केली. वारकरी

संप्रदायावर त्याचा प्रभाव दिसतो. ज्योतिराव फुलेंच्या धर्मचिकित्सेच्या मांडणीत कबीर सापडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तर तो गुरूच होता.

आजच्या परिस्थितीत जाती-धर्मांमधील तणाव तीव्र झाले असताना मध्ययुगापेक्षा कबीराची गरज अनेक पटींनी वाढली आहे. माणसा-माणसातील दरी रुंदावत चालली आहे. देश फुटेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही वीण दोन्ही बाजूंनी ताणली जात आहे. सर्व धर्मांतील पुरोहितशाही अतिशय आक्रमक झाली आहे. त्यांच्या पंखाखाली अर्थव्यवस्था, राजव्यवस्था, विद्यापीठे आली आहेत. ज्ञानाची केंद्रे या कचाट्यात सापडली आहेत. अशावेळी कबीर हाच दिलासा आहे. विद्यापिठांच्या रुपात असलेली ज्ञानाची केंद्रे तर आजही उच्चवर्णीयांच्या हातात बंदिस्त आहेत. कबीराची परंपरा तर खूप खाली आहे. त्यांच्यासाठी कबीर म्हणजे मध्ययुगीन भाषेच्या सौंदर्यशास्त्राची समीक्षा करण्यासाठी, साहित्यात तोंडीला लावण्यासाठीचा एक घटक. कबीराने सांगितलेले तळागाळातील लोकांचे, पददलितांच्या जगण्याचे तत्त्वज्ञान हा त्यांच्या अभ्यासाचा विषय अद्याप होत नाही. विज्ञानाचा शोध लागला नव्हता, तेव्हा कबीराने जगण्याचे मूलभूत तत्त्वज्ञान मांडले. प्रस्थापित मायावादी वैदिक तत्त्वाज्ञानाचा फोलपणा सिद्ध केला. त्यामुळे उघड्या पडलेल्या प्रस्थापित समाजात कबीराचा अभ्यास झाला नाही.

गुजरातची दंगल झाली तेव्हा आम्ही एका प्रभावी माध्यमाच्या शोधात होतो. मानवतेच्या भूमिकेतून लोकांच्या मनाला साद घालता येईल, असा मंच शोधत होतो. जाती-धर्माच्या पलीकडे लोकांना भिडेल, असा विचार शोधत होतो. तेव्हा कबीर हेच त्याचे एकमेव उत्तर बनले आणि कबीर कलामंचाचा जन्म झाला. धर्मांधतेच्या बजबजपुरीने माखलेल्या आजच्या काळात सर्व धर्मांना सामावून घेणारा आणि माणुसकीची साद घालणारा कबीर हाच प्रेमाचा खरा संदेश आहे

माणुसकीची शाळा : भारतीय संस्कृतीचा जागर संतांची खूप समृद्ध अशी प्रबोधन परंपरा आपल्याला लाभली. पण त्याबाबत गैरसमजही आहेत. त्यामुळे संतांचे मूळ विचार, मूळ तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही "माणुसकीच्या शाळे'तून करीत आहोत. यातील ४० व्याख्यानांपैकी १५ व्याख्याने संतांच्या प्रबोधन परंपरेवर आधारित होती. त्यात संत तुकारामांपासून कबीरांपर्यंत आणि संत नामदेवांपासून मीरेपर्यंत सगळ्यांची मांडणी झाली. सामाजिक, धार्मिक तणाव तीव्र झाले आहेत. माणसापेक्षा त्याची जात, धर्म शोधला जात आहे. भारतीय संस्कृती त्यापलीकडे आहे. तिचा जागर म्हणजे ही "माणुसकीची शाळा'. ही शाळा तीन मूल्यव्यवस्थांवर उभी आहे. पहिली मूल्यव्यवस्था आहे, भारतीय संविधानातील २१ संकल्पांची, जी फ्रेंच राज्यक्रांतीतून जन्माला आली आणि आधुनिक मानवतावादाचे वैश्विक सूत्र बनली. दुसरी व्यवस्था आहे, बुद्ध आणि कबीरापासून दाभोलकर-पानसरेंपर्यंत अनेकांनी भारतीय मातीत रुजवलेल्या मानवतावादाची. या देशाच्या मातीत चार्वाकापासून लोकायतापर्यंत रुजलेली मूल्यव्यवस्था मानवतेचा संदेश देणारी आहे. ती कलेकलेने विकसित होऊन वैज्ञानिक आधाराकडे जाते. प्रेमाच्या पूर्ण स्वरुपाकडे जाते. करुणेकडे जाते. प्रज्ञा आणि शिलाकडे लक्ष वेधते. ही या मातीतील परंपरा आम्ही या शाळेद्वारे वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ती सम्यक समतेवर, माणुसकीवर आधारली आहे. कबीर म्हणतात, मी म्हणजेच पृथ्वी. पृथ्वीवर पाणी आहे,

माझ्यात पाणी आहे. पृथ्वीवर डोंगर आहेत, माझ्यात हाडे आहेत. पृथ्वीवर हवा आहे, माझ्यात हवा आहे. मी मरतो तेव्हा ही तत्त्वे यातच विलीन होतात. मृत्यूकडे बघण्याचं एवढं साधं तत्त्वज्ञान कबीरानं सांगितलं. आणि तिसरी व्यवस्था आहे, निसर्गातील मूल्यांची. स्वातंत्र्य, समता आणि साहचर्य ही निसर्गाने मानवाला दिलेली मूल्यव्यवस्था आहे. त्यावर "माणुसकीची शाळा' उभी आहे. कबीराने विषमता नाकारली. धर्माची गुलामगिरी नाकारणाऱ्या भारतीय परंपरेच्या मातृसत्ताक पद्धतीतील स्त्रीचे रुप हा या शाळेचा चेहरा आहे. माणसात माणूसपण पेरणं हा या शाळेचा ध्यास आहे. कबीरानं सांगितले, मी या चराचराचा भाग आहे. हे चराचर हेच माझे मूळ स्वरूप आहे. त्यामुळे निसर्गातील प्रेम हाच माणसाचा मूळ स्वभाव आहे. एक झाड उठतं आणि दुसऱ्या जातीच्या झाडाला मारत सुटतं, असे दिसत नाही. हे साहचर्य माणूस विसरला. त्यातून दु:खाची निर्मिती झाली. निसर्गाने विस्तारणे शिकवले, प्रसरण पावणे शिकवले, माणूस मात्र संकुचित होत गेला. "मी कोण?' हेच तो विसरला. माणूस माणसापासून , समाजापासून आणि स्वत:पासून तुटत चालला आहे. अशावेळी माणसाला माणसाचा, आपल्या आतला शोध घेण्यासाठी कबीर महत्त्वाचा आहे.

शब्दांकन : दीप्ती राऊत

बातम्या आणखी आहेत...