आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:मीच जबाबदार !

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाने राज्यात पुन्हा डाेके वर काढले अाहे. त्याला प्रशासकीय शिथिलता जितकी जबाबदार तितकीच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक अापली बेफिकिरीही कारणीभूत अाहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून ओढवलेल्या या संकटाने अनेक अाप्तेष्ट अापल्यातून हिरावून नेले. लाॅकडाऊनने अनेकांचे राेजगार हिरावले, अर्थव्यवस्थाही रसातळाला गेली. काेराेना याेद्ध्यांच्या अथक परिश्रमांमुळे दिवाळीनंतर कसाबसा हा संसर्ग अाटाेक्यात अाणण्यात महाराष्ट्राला यश अाले. ‘सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग’ या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळेच हे शक्य झाले. मात्र, जसजसा रुग्णसंख्येचा अालेख घसरू लागला, तसतशी लाेकांमधली बेफिकिरी वाढत गेली. त्यातच लस अाल्याच्या बातमीने सारेच बिनधास्त झाले. हजाराेंच्या गर्दीत लग्नसाेहळ्यांचे बार उडू लागले. ग्रामपंचायत, पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय मेळाव्यांनाही जाेर चढला. ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असे नुसतेच बाेर्ड एसटीला चिकटवण्यात अाले; पण प्रवासीच काय, चालक-वाहकही मास्क विसरले. शासकीय-खासगी कार्यालयांतही असाच निष्काळजीपणा दिसत हाेता. इतकेच काय, जी व्यक्ती मास्क घालून फिरत असे तिलाही वेड्यात काढले जाऊ लागले. बाजारपेठेत बहुतांश लाेक ‘उघड्या ताेंडा’ने फिरत असताना प्रशासनही त्याकडे कानाडाेळा करत राहिले. अखेर या बेजबाबदारपणाचे व्हायचे ते दुष्परिणाम दिसू लागले अन‌् फेब्रुवारीतही काेराेनाचा राक्षस आणि लाॅकडाऊनचे संकट पुन्हा अापल्यासमाेर उभे ठाकले. अाज अमरावतीसह काही शहरांत अंशत: टाळेबंदी लावण्यात अाली असली, तरी संपूर्ण राज्यालाही त्याचे चटके बसण्याची भीती व्यक्त केली जात अाहे. तसे झाल्यास पुन्हा बेराेजगारी, उपासमारी अाेढवेल. गेले वर्षभर झालेल्या नुकसानीतून महाराष्ट्र कसाबसा सावरत असताना सलग दुसऱ्या वर्षी हे संकट अापल्याला झेपणार नाही. म्हणूनच ही परिस्थिती उद‌्भवू द्यायची नसेल, तर अापल्याला पुन्हा जबाबदारीचे भान ठेवून ‘सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग’ या त्रिसूत्रीचा अवलंब करावाच लागेल. केवळ मुख्यमंत्री म्हणताहेत म्हणून नव्हे, तर या राज्याचा ‘जबाबदार नागरिक’ म्हणून अापल्याला स्वत:च्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी हे भान राखावेच लागेल.

बातम्या आणखी आहेत...