आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:वाईट तितुके इथे पोसले...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून दहा कोवळे जीव कायमचे हिरावले. महाराष्ट्राला लांछन वाटावं अशी ही घटना व्यवस्थेच्या हलगर्जीमुळे, निर्ढावलेपणामुळे घडली. तिला चार दिवस उलटूनही बेपर्वा वृत्ती आणि असंवेदनशीलता कमी झालेली नाही. पाहणी, जाब-जबाब, अहवाल असा सारा ‘सरकारी’ मामला या प्रकरणातही सुरू झाला आहे. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री अन् नेत्यांच्या गाड्यांनी भंडारा हे सायरनचे शहर बनले आहे. ज्यांच्या कुटुंबाचं, घराचं भविष्यच या दुर्घटनेत भस्मसात झालं, त्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची जणू अहमहमिका लागली आहे. त्यातून जबाबदारी आणि संवेदनेपेक्षाही राज्य व केंद्रातील सत्ताधारी पक्षांच्या परस्परस्पर्धेचा, झालंच तर राजकीय लाभाचा भाव जास्त डोकावतो आहे. त्यातच दोन्ही सरकारांनी मदत जाहीर केल्यानंतर राज्यपालांनीही वेगळी मदत देण्याचा प्रकार या निमित्ताने घडला आहे. या कुटुंबांना मदत आवश्यक असली, तरी त्यामुळे त्यांच्या आयुष्यातून गेलेला आनंद आणि हिरावलेली स्वप्ने परत येणार नाहीत. त्यांच्या आणि दुसऱ्यांच्या वाट्याला अशा वेदना येऊ नयेत, यासाठी काम होत नाही. उलट ज्या गावात लोकांच्या घशाखाली अजूनही घास उतरत नाही, तेथील विश्रामगृहावर मंत्र्यांच्या दौऱ्यातील कर्मचारी मांसाहाराची मेजवानी झोडतात, ही लाज आणणारी घटना आहे. दुसरीकडे, दहापैकी दोन बालकांचे शवविच्छेदन करुन उर्वरित आठ बालकांच्या मृत्यूचा अहवाल केवळ कागदोपत्री तयार केला गेला. चौकशी समितीचे आरोग्यमंत्र्यांनी नेमलेले अध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी बदलल्याने सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एरवी अशा घटना घडताच चौकशी वगैरे होण्याआधी संबंधितांवर तत्काळ निलंबन वा बडतर्फीची कारवाई केली जाते. पण, या प्रकरणात तसे काही झाले नाही. एकुणातच, काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटनेनंतरही सरकारी यंत्रणेतील अनास्था संपायला तयार नाही. उलट कोरड्या पाहण्या अन् ओल्या मेजवान्यांतून ती आणखी घट्ट होते आहे. जिथे फुलांना जन्मत:च मरण येते अन् दगडांना मात्र चिरंजीवित्व लाभते, भलेपणाचे भाग्य नासते नि वाईट मात्र पोसले जाते, ते सरकार कुणाचेही असले, तरी जगासाठी अजबच ठरते.

बातम्या आणखी आहेत...