आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ; जीव गेला तरी बेहत्तर, पण आरक्षण मिळेपर्यंत उपोषणस्थळच आमचे घर!

कृष्णा तिडके, लहू गाढे | जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुणवत्ता असूनही डावलले जात असल्याने तरुणाईमध्ये संताप, तरुण पिढीसाठी ज्येष्ठ मंडळीही मैदानात

एमए झाले पण नोकरी नाही, टक्केवारी आहे पण मनासारखं कॉलेज मिळत नाही, ८०-९० टक्के तरीही आई-वडिलांना लाखो रुपयांचे कर्ज काढून फीस भरून प्रवेश घ्यावा लागतोय. वेटिंग लिस्ट टक्केवारी जास्त असतानाही केवळ आरक्षण नसल्यामुळे नंबर कटतोय, अशा भावना आंदोलनकर्त्यां तरुण-तरुणींनी पाणावलेल्या डोळ्यांतून बोलताना मांडल्या. अन्नपाणी सोडलेल्या ६५ वर्षीय आजीने आरक्षणाअभावी मुलाला नोकरी मिळाली नाही, तो शेती करतोय, पण नातवांनाही कर्ज काढून शिक्षण द्यावे लागत असल्याची खंत खाेकलत-खाेकलत व्यक्त केली. आम्ही तर हलाखीतच जगलो, पण नातवांसाठी का होईना हा लढा सुरू असल्याचे मुक्ताबाई ढेपे (६८) यांनी म्हटले. जोपर्यंत आरक्षण जाहीर होणार नाही, तोपर्यंत उपोषणस्थळच हे घर राहणार आहे. आरक्षणासाठी जीव गेला तरी पर्वा नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे नऊ दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोनाला नऊ दिवस उलटले असून उपोषणाला बसलेल्यांमधील दोन जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. परंतु, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या गावातील ग्रामस्थ आंदोलन अजूनच आक्रमक करू लागले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नागपूर यासह विविध जिल्ह्यांतील विविध गावांतून दुचाकी रॅली येऊन पाठिंबा देत आहेत. मनोज जरांगे पाटील व ग्रामस्थांच्या पुढाकारातून या राज्यव्यापी आंदोलनासह उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. पहिल्या दिवशी उपोषणात सहभागी होण्यासाठी बैलगाड्या, ट्रॅक्टर, दुचाकी, सायकली आणून नागरिक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. साष्टपिंपळगाव परिसरातील जवळपास ३० गावांतील महिला, पुरुष या आंदोलनासाठी दररोज येऊन पाठिंबा देत आहेत. शुक्रवारी या आंदोलनाला तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांनी येथे भेट दिली आहे.

अन्नपाणी घेणार नसल्याचा पवित्रा

मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत अन्नपाणी सोडण्यात आले आहे. चार दिवसांपासून संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य, मुक्ताबाई ढेपे (६८), मनोज जरांगे यांनी अन्नपाणी सोडले आहे. या सर्वांचीच तब्येत आता खालावली आहे. डॉक्टरांनी येऊन त्यांची तपासणी केली आहे. परंतु, या चौघांनीही पाणी पिण्यास नकार दिल्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली असल्याचे शुक्रवारी आंदोलनस्थळी दिसून आले.

शेतीची कामे थांबवली

पहिल्या दिवशी अनेक शेतकरी बैलगाड्या, दुचाकी, ट्रॅक्टर काढून मोठ्या गाजावाजात उपोषणाला बसले आहेत. दररोज विविध गावांतून हजारो नागरिक येत आहेत. साष्टपिंपळगाव येथील या आंदोलनाची आता संपूर्ण देशात चर्चा होत आहे. ग्रामस्थ शेतीची कामे थांबवून मंडपातच बसून आहेत. महिला घरचे कामे आटोपून पुन्हा मंडपात येऊन बसत आहेत. या आंदोलनाला विशेषकरून तरुणी, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.

५२२ गावांत होणार उपोषण :

शिक्षणावर बहिष्कार टाकून ग्रामस्थांनी आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दररोज वेगवेगळ्या गावांतून रॅली जाऊन गावात उपोषणाला बसणाऱ्यांना पाठिंबा देत आहेत. दरम्यान, गुरुवारी या ठिकाणी मशाल पेटली असून या ठिकाणाहून आता ५२२ गावांत मशाल पेटवून नेल्या जाऊन त्या-त्या गावांमध्ये उपोषणास मराठा बसणार आहेत.

पालक होताहेत कर्जबाजारी

टक्केवारी आहे परंतु आरक्षण नसल्यामुळे स्कॉलरशिप मिळत नाही, मार्क असतानाही पाहिजे त्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळत नाही. अवाढव्य फीस भरून शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे पालकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. शिक्षणात आरक्षण न मिळाल्यास हे आंदोलन अजून आक्रमक करणार आहोत. भक्ती गोवर्धन तांबडे, कॉम्प्युटर सायन्स, साष्टपिंपळगाव, ता. अंबड

९० टक्के तरी भरले सव्वा लाख

९० टक्के असतानाही प्रवेश घेण्यासाठी वडिलांना १ लाख २० हजार फीस भरावी लागली. आरक्षण असल्यास कमी टक्केवारी असली तरी शिष्यवृत्ती मिळते. मग आम्हाला का मिळत नाही? या धोरणामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारीपणातून आत्महत्या करीत आहेत. सरकारने कुणाचे आरक्षण काढू नये, परंतु मराठा समाजालाही आरक्षण द्यावे. वैष्णवी दीपक जाधव, बीटेक, साष्टपिंपळगाव.