आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी मुलाखत:लोकांच्या टीकेला आपले बलस्थान कसे ठरवायचे हे आईने शिकवले : लवलीना

दिलीपकुमार शर्मा | गुवाहाटी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी कठोर दिनक्रम ठरवून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले, आता केवळ प्रशिक्षणाकडे लक्ष
  • आई किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत; मात्र, मुलीच्या प्रशिक्षणाची काळजी

आसाममधील गाव बारह मुखिया आता लवलीना बोरगोहाईमुळे ओळखले जात आहे. २३ वर्षांची लवलीना ६९ किलाे वजनी गटात जगातील तिसऱ्या क्रमांकाची महिला मुष्टियोद्धा आहे. वयाच्या १५ व्या वर्षीच बॉक्सिंग सुरू करणाऱ्या लवलीनाने १९ व्या वर्षी एशियन बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक पटकावले. २०१८मध्ये इंडियन ओपनमध्ये सुवर्ण, नंतर आयबा जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी लवलीना बंगळुरूत प्रशिक्षण घेत आहे. तिच्यासोबतच्या बातचीतचा संपादित भाग...

बॉक्सिंगमध्ये एवढे पुढे जाणे माझ्यासाठी एवढे सोपे नव्हते. वडील टिकेन बोरगोहाई घरापासून लांब एका चहाच्या मळ्यात मजुरी करायचे. त्यांना केवळ अडीच हजार रुपये मिळायचे. आई मामोनी बोरगोहाई हिने एकटीनेच आम्हाला वाढवले. ती सर्वात मजबूत महिला आहे. तिनेच कुक्कुटपालन आणि मजुरी करुन आम्हा बहिणींना पुढे जाण्यास प्रेरणा दिली आणि प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायला व जिंकायलाही शिकवले. लोकांची पर्वा न करता तिने आम्हाला खेळण्यासाठी बाहेरगावी पाठवले. या मुली काहीच करू शकणार नाहीत, असे टोमणे आम्हाला गावातील लोक मारायचे. अनेक अडचणी असतानाही आईने आम्हाला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने मी अशा लोकांना मोठ्या गांभीर्याने घेतले. काही जण तर वडिलांना असेही सांगायचे की, तुम्ही नक्कीच पाप केले असेल, त्यामुळेच देवाने तीन मुली दिल्या. मात्र, आज संपूर्ण गाव आम्हा बहिणींचा अभिमान बाळगून आहे. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी लीशा आणि लीमा जुळ्या आहेत. त्यांनी मुआई थाई मार्शल आर्टमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकले आहे. वयाच्या १३ व्या वर्षी मीदेखील मुआई थाई खेळणे सुरू केले. मात्र, भारतीय मुष्टियोद्धे कोच पदुम बोडो यांनी माझे खेळणे बघितले आणि प्रशिक्षणासाठी माझी निवड केली. आधीपासूनच ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न आहे, यामुळे कठोर दिनक्रम आखला आहे. ऑलिम्पिकला चार महिने आहेत, त्याआधी माझ्यातील त्रुटी दूर करत आहे. आता प्रशिक्षणावर मी भर देईन. तिला आदर्श असणाऱ्या बॉक्सर बाबत सांगते की, मी मोहंमद अली आणि माइक टायसनचे व्हिडिओ बघत असते. विशेषत: मोहंमद अलींकडून शिकते, कारण ते उंच बॉक्सर होते आणि माझी उंचीही ५ फूट ११ इंच आहे. ते पायांची हालचाल करत आणि लांब अंतरावरून जास्त खेळायचे. मीदेखील त्यांच्यासारखेच खेळायचा प्रयत्न करते.

आई किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत; मात्र, मुलीच्या प्रशिक्षणाची काळजी

वडील टिकेन सांगतात की, मुलींवरून माझी ओळख आहे. तिन्ही मुलींच्या यशामागे त्यांची आई आहे. सध्या लवलीनाची आई किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत आहे. लवलीना सांगते की, आईच्या प्रकृतीबाबत खूप काळजी आहे. या वेळी मला तिच्यासोबत राहायला हवे होते. मी रोज फोनवरून तिच्याशी बोलते. वडील सांगतात की, पूर्ण कुटुंबाला लवलीनाच्या आईची काळजी आहे. मात्र, लवलीनाने सध्या केवळ प्रशिक्षणाकडेच लक्ष द्यावे, अशी तिची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...