आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक:...हेचि दान देगा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.शेफाली भुजबळ

दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. प्रथेचा विचार करून बहुतांश लोक हे आपल्या जावयाला विविध प्रकारचे दान वाणाच्या माध्यमातून देतात. या प्रकारात सासरच्या मंडळींशी जावयाचे संबंध प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आहेत का? याचा विचार होताना दिसत नाही. फक्त 'द्यावे लागते' या एका रूढीचा विचार इथे होताना दिसतो. मूळ परंपरा मात्र फारच व्यापक आहे. एकमेकांविषयी आस्था वाढावी, प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी खरे तर अधिक महिना आहे. त्यावर दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न...

भारतीय संस्कृतीत सण, उत्सव, समारंभ यांची रेलचेल आहे. आपल्या संस्कृतीचे वैविध्यपूर्ण रंग दाखविण्यासाठी या सर्व सण-उत्सवांना कथा-प्रथा आणि परंपरा असल्याचे आपण वाचत आलो आहोत. कथेतून निर्माण होणारी प्रथा ही वर्षानुवर्षे पुढे जात राहिल्याने वेगळेच रूप धारण करते आणि मूळच्या कथेपासून खूप दूर निघून जाते हे जवळ जवळ सर्वच सण-उत्सवांच्या बाबतीत सांगता येण्यासारखे आहे. परंपरा ही नेहमीच कथेचा गौरव करणारी आणि त्यातून जीवनसन्मुख तत्त्वज्ञान सांगणारी असते. प्रथा मात्र अनेकदा सोयीसोयींनी आणि काहीतरी कारण घेऊन उभी राहाते. श्रावणातल्या कहाण्या जर आपण एकदा अभ्यास म्हणून वाचायला घेतल्या, तर त्यातून फार मोठे जीवनावश्यक तत्त्वज्ञान आपल्याला मिळते हे कुणीही नाकारणार नाही; पण जे वेगवेगळे पायंडे काळानुरूप आणि व्यक्तीनुरूप पडले आहेत ते अनेकदा हास्यास्पद ठरल्याशिवाय राहात नाही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे अधिक महिना १८ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. "अधिकस्य अधिक फलम्’ असे या महिन्याविषयी ग्रंथामध्ये म्हटले गेले आहे. अधिक महिन्याला जे महत्त्व भारतीय संस्कृतीने दिले त्याचे मूळ कारण शोधले तर ते फारच शास्त्रीय असे आहे. अधिक महिन्याच्या पाठीमागे असणाऱ्या कथा यादेखील उद्बोधनपर असून अधिकाची प्रत्येक गोष्ट ही अगणित व्यक्तिमत्त्वांच्या वागण्या-बोलण्यातील-जगण्यातील संगती आणि विसंगती, चांगले आणि वाईट, भले आणि बुरे, सुख आणि दु:ख, आचार आणि अनाचार, नीती आणि अनीती असे सर्व प्रकार सांगणारी आहे. त्यामुळे या प्रकारचे वाचन जर आपण अभ्यास म्हणून केले, तर जीवनाकडे पाहाण्याचा सकारात्मक आणि सत्शील दृष्टिकोन वाचकाच्या ठिकाणी निश्चितच जागृत होईल; पण फक्त देवधर्म म्हणून जर आपण या संपूर्ण महिन्याकडे पाहिले, तर हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे अधिक महिना हा एका वेगळ्या पद्धतीने किंवा मूळ समजून घेऊन जर आपण साजरा करू शकलो तर त्यातून व्यक्तींचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल. अधिक महिन्याच्या कालखंडात जावयाला 'वाण' देणे हा एक प्रकार आपल्याकडे रूढ झालेला आहे. या वाण देण्याच्या प्रकाराने अनेक घरांमध्ये राग, लोभ, भांडणे झाल्याची अनेक उदाहरणे

आपल्या अवतीभवती सापडतील. अमूकच गोष्ट अधिक महिन्यात सासू-सासऱ्यांनी जावयाला द्यायला हवी इथपासून सुरू होणारा हा हट्ट सोने, चांदी, गाडी इथपर्यंत जाऊन पोहोचतो तेव्हा मात्र मला खरोखर अशा स्वार्थलोलुप व्यक्तींची किव वाटू लागते. सासरचे लोक आणि जावयाचे घर अथवा प्रत्यक्ष जावई यांच्यामध्ये हवा तेवढा स्नेह, प्रेम, जिव्हाळा नसतानादेखील त्या घरातली मुलगी जेव्हा आई-वडिलांकडे अधिकाच्या वाणासंबंधी हट्ट आणि तक्रार करून टाकते त्यावेळी आम्ही आमची संस्कृती चुकीच्या मार्गाने घेऊन चाललो आहोत की काय, असाही प्रश्न पडतो. माणसामाणसातील, नात्यागोत्यातील स्नेह वाढीस लागावा किंबहुना तो वाढावाच याच हेतूने सणवार आणि त्यापाठीमागील तत्त्व आपल्या संस्कृतीत निर्माण झाले आहेत. ते सोडून देऊन आई-वडिलांकडे मुलीने अथवा सासू-सासऱ्यांकडे काहीएक वस्तूची अधिकाच्या निमित्ताने मागणी करणे हा मला त्या महिन्याचा आणि त्या महिन्यातील देवता असणाऱ्या पुरुषोत्तमाचा अपमान वाटतो. एका बाजूला लग्नात हुंडा न देणारे लोक मोठ्या अभिमानाने फिरतात. शक्य तिथे ’आम्ही हुंडा घेतला नाही’ असेही वेळोवेळी सांगतात. मग अधिक महिन्यामध्ये जर ही मंडळी सासरच्या लोकांकडून चांदीचे ताट अथवा तत्सम कोणतीही वस्तू घेत असतील, तर हा एक प्रकारे हुंड्याचाच प्रकार नाही का? अशा वस्तूंची देवाणघेवाण करण्यापेक्षा चांगल्या विचारांची देवाणघेवाण केल्यास त्यातून सगळ्यांचाच उत्कर्ष साधला जाईल. परस्परांचा विषयीचा आदर जर यामुळे वाढला, तर सुखी जीवनाची गुरुकिल्ली आपोआपच मिळेल. मुलगी ज्यावेळी माहेरी जाते त्यावेळी आजही ती आपल्या सासू-सासऱ्यांची आणि अगदी नवऱ्याचीही गार्हाणी आपल्या आई-वडिलांजवळ, जवळच्या मैत्रिणींजवळ करीत असते. एकदा एखाद्या घराला किंवा त्या घरातील व्यक्तींना आपले केले-मानले, तर ते सर्व जण गुणदोषांसहीत आपलेच असतात. त्यामुळे आपल्या माणसांची गार्हाणी जाहीरपणे मांडून त्यांची निंदा करणे हे योग्य नाही. असे अयोग्य काम करूनही मुली अधिक महिना आला की, काय हवे-नको याची मागणी आई-वडिलांकडे करीत असतील तर हे सामाजिकदृष्ट्या चुकीचे नव्हे काय? दान देण्याची प्रथा चुकीची आहे, असे मला अजिबात म्हणावयाचे नाही. दिल्याने वाढते या तत्त्वाशी मी सहमत आहे; मात्र ओरबाडून घेणे, मागणी करणे, त्यासाठी हट्ट करणे, वाद घालणे या गोष्टीचे अजिबात समर्थन देवधर्माच्या नावाखाली करता येणार नाही. सत्प्रेरणा शिकवणाऱ्या देवाला तरी ते आवडेल का? असा प्रश्न आपण कधीतरी स्वत:ला विचारायलाच हवा. समाजसेवा करणाऱ्या अनेक व्यक्ती या तेच तेच काम करीत राहातात. प्रश्न हे अगिणत प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून आवासून उभे राहातात. ते सोडवायला हवेत. खूप खोलवर जाऊन समाजोन्नतीचे काम करण्याची, ते प्रत्यक्षात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. हिरण्यकश्यपू या राक्षसाला मारण्यासाठी भगवान विष्णूने ज्या अनेक गोष्टी करून नृसिंह अवतार धारण केला तोदेखील या अधिक महिन्यातच केल्याचे पौराणिक कथा सांगतात. भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूला मारणे म्हणजे दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृतीने विजय मिळवणे आहे. आपल्या आतदेखील अशा अनेक दुष्प्रवृत्ती आहेत, की ज्यामुळे आपल्याबरोबर अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अधिक महिन्यात या दुष्प्रवृत्ती जाऊन त्या ठिकाणी सत्प्रवृत्तींची स्थापना कशी करता येईल याचा विचार करायला हवा. असे म्हटले जाते, की कोणतीही चांगली गोष्ट जर आपण अधिक

महिन्यात केली, तर त्याचे फळ शतपटीने वाढते. त्यामुळे या अधिक महिन्यापासून कोणतीही समाज विघातक वृत्ती दूर करण्याचे काम आपण का सुरू करू नये? वैदिक परंपरेमध्ये दोन वर्ष मानली जातात. त्यात सूर्य आणि चंद्र हे जेवढ्या दिवसात ग्रह क्षेत्र पूर्ण करतात; त्यातून होणाऱ्या दिवसाच्या गणितावर अधिक महिन्याची निर्मिती झाली आहे. म्हणजे सूर्य ३६५ दिवसात आपले ग्रह क्षेत्र पूर्ण करतो, तर चंद्र ३५४ दिवसात आपले ग्रह क्षेत्र पूर्ण करतो. म्हणजे एका वर्षात अकरा दिवसांचा फरक पडतो. याप्रमाणे २ वर्ष ८ महिने १६ दिवस आणि ४ तास मिळून अधिक महिना तयार होतो. हे झाले शास्त्र. या शास्त्राला भारतीय संस्कृतीने जी अध्यात्माची बैठक बहाल केली त्यावरून हा महिना म्हणजे 'पुरुषोत्तम मास' म्हणवला जातो. पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि कृष्ण म्हणजे भक्ती, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, श्रद्धा यांचे प्रतीक होय. तेच प्रतीक आपल्या जीवनामध्ये यावे यासाठी अधिक महिन्यात आपण आपल्यातले एकमेकांविषयीचे प्रेम वाढवले पाहिजे. याच महिन्याचे दुसरे नाव 'मल मास' असेही आहे. याचा अर्थ आपल्या अंत:करणामध्ये जो मल म्हणजे वाईट गोष्टी आहेत, त्या काढून टाकण्याचा हा महिना आहे. काही ठिकाणी या महिन्याला 'धोंड्यांचा' महिना असेही म्हणतात. धोंडे म्हणजे पुरण भरलेले आणि दगडासारखे दिसणारे छोटे गोळे. असे हे गोडाचे वाण देण्याची प्रथा ज्या महिन्यात असते तोच हा धोंड्याचा महिना होय. यावरून आपल्या असे लक्षात येईल, की आपल्या ऐपतीप्रमाणे आनंद व्यक्त करणे आणि तो इतरांनाही देणे हेच या धोंडे वाणामागचे मूळ कारण आहे. त्यामुळे या सर्व प्रथा-परंपरांचा मूळ अर्थ आपण लक्षात घेतला, तर तो असाच आहे की, परस्परांविषयीचे प्रेम वृद्धिंगत होत राहावे. स्वार्थ दूर ठेवून आपलेपणाच्या जागा अधिकाधिक वाढाव्या, त्यातूनच हा समाज सुखी-समृद्धी आणि संपन्न होऊ शकेल. यासाठी या अधिक महिन्याचा अधिक फळ मिळण्याच्या दृष्टीने विचार करायला हवा.

bhujbal.shefali@gmail.com

बातम्या आणखी आहेत...