आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर बुलेट ट्रेनच्या डीपीआरचे काम सुरू

नामदेव खेडकर | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समृद्धी महामार्गालगत समांतर स्वतंत्र जमिनीचे संपादन करण्याचा विचार, डीपीआरसाठी निविदाही मागवल्या

मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनवण्याचे काम इंडियन हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने हाती घेतले आहे. ‘डीपीआर’साठी आवश्यक असणाऱ्या कामांच्या निविदाही कॉर्पोरेशनने मागवल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत बुलेट ट्रेनचा मार्ग असणार आहे.

इंडियन हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र सरकारच्या कंपनीमार्फत देशभरात बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचे काम करणार आहे. या कंपनीने बुलेट ट्रेनसाठी देशात नव्याने सात मार्ग जाहीर केले आहेत. यात मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर या मार्गांचाही समावेश आहे. याच जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्गही चालला आहे. सध्या या प्रस्तावित प्रकल्पाचा डीपीआर बनवणे सुरू आहे. डीपीआरच्या पूरक कामांसाठी निविदादेखील मागवल्या आहेत. डीपीआरनंतर या प्रकल्पाची किंमत निश्चित होईल. डीपीआरमध्ये स्टेशन्स, इतर पायाभूत सुविधा, अंडरपास, जागेची आवश्यकता आदी बाबींचा समावेश असेल, असे हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमधील सूत्रांनी सांगितले.

अनुभव, यंत्रणा असल्याने भूसंपादनासाठी ‘एनएचएआय’चा विचार होण्याची शक्यता

नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे (एनएचएआय) भूसंपादनासाठी आवश्यक असणारी यंत्रणा आहे. भूसंपादनासाठी या विभागाकडे उपजिल्हाधिकाऱ्यांचे एक स्वतंत्र पददेखील आहे. ग्रीन फिल्डमधून जाणाऱ्या या मार्गाच्या निर्मितीत भूसंपादन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अनुभव आणि परिपूर्ण यंत्रणा असल्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाची जबाबदारी ‘एनएचएआय’कडे येण्याची शक्यता आहे. दुसरे एक कारण म्हणजे या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही आहेत आणि योगायोगाने ‘एनएचएआय’ हा विभागदेखील गडकरींच्या खात्यातलाच आहे.

‘समृद्धी’तून अशक्य, मात्र समांतर भूसंपादन शक्य

समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेली १२० मीटर रुंदीच्या जमिनीपैकी ५० मीटर रुंद जागा प्रत्यक्ष रस्त्यासाठी व यात १५ मीटर रुंदीचे दुभाजक आहेत. दुभाजक किंवा संपादित जागेपैकी एका बाजूने बुलेट ट्रेन धावू शकेल, असाही विचार हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने केला होता. याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे विचारणाही केली होती. मात्र, समृद्धी महामार्गाला काही ठिकाणी वळणे आहेत, बुलेट ट्रेनचा वेग अधिक असल्याने वळणांचा ट्रॅक जमत नाही. त्यामुळे सध्यातरी समृद्धी महामार्गावरून बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव मागे पडला आहे. मात्र, समृद्धीलगतच समांतर स्वतंत्र जमीन संपादित करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईला जोडणारे तीन मार्ग

या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये मुंबईला जोडणारे तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग ज्याचे प्रत्यक्ष काम सुरू आहे तो मुंबई-अहमदाबाद (गुजरात) हा मार्ग. आता नव्याने जाहीर झालेल्या सात मार्गांमध्येही मुंबईला जोडणारे दोन मार्ग आहेत. यात मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर आणि मुंबई-पुणे-हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...