आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:डॉ. आंबेडकरांच्या ज्ञानसाधनेचा वैश्विक प्रभाव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अनेक देशांत, छोट्या-मोठ्या समूहांमध्ये अन्यायामुळे त्रस्त झालेले कितीतरी वर्ग आहेत. अशा सर्वहारा वर्गांसाठी बाबासाहेब नेहमीच दीपस्तंभ ठरले आहेत. अलीकडे बाबासाहेबांच्या ज्ञानसाधनेचा वैश्विक पैसही विस्तारतो आहे. त्यांचा हाच ज्ञानमार्ग भारताला सर्वार्थाने समर्थ करेल. येत्या मंगळवारी (६ डिसेंबर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त त्यांचे विचार आणि कार्याच्या कालातीत प्रभावाचा हा वेध...

वि साव्या शतकात बहुविध सांस्कृतिक असा खंडप्राय देश असलेल्या भारतातील स्वातंत्र्यलढ्याच्या पोटात आणखी एक संघर्ष सुरू होता. तो मानवतेचा संघर्ष होता, माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत हक्कांचा लढा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मानव मुक्तिलढ्याचे सरसेनानी होते. विसावे शतक संपत असताना जेव्हा या शतकावर कुणाचा ठसा उमटला, अशी चर्चा माध्यमांतून, अभ्यासकांमधून आणि काही संस्था-संघटनांच्या दृष्टिकोनातून सुरू झाली, तेव्हा निर्विवादपणे गांधीजींचे नाव समोर आले. त्याच वेळी केवळ भारतच नव्हे, तर काही पाश्चिमात्य आणि दक्षिण आशियाई देशांमधून डॉ. आंबेडकरांचे नाव समोर आले. कारण भारतासारख्या देशात जातीच्या-धर्माच्या नावाखाली आपल्याच समाजातील बंधू-भगिनींना अस्पृश्यतेची वागणूक मिळत असताना त्या विरुद्ध आवाज उठवण्याची धाडसी भूमिका त्यांनी घेतली होती.

अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि आफ्रिकेतील अनेक देशांत सुरू राहिलेली वर्णद्वेषी राजवट या सगळ्यासंदर्भात बरीच वर्षे जागतिक मंथन सुरू आहे. वंशवाद, वर्णवाद अथवा श्वेतवर्णीयांचा प्रभुत्ववाद या सामाजिक विषमतेबाबत भारतातील उच्चवर्णीय भूमिका घेत होते, मात्र ती जागतिक व्यासपीठावर मांडायला त्यांचा नकार होता. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुरस्काराने भरलेल्या वंशवादविरोधी परिषदेत भारतातील जातीयतेचा आणि अस्पृश्यतेचा प्रश्न मांडायला भारत सरकारचे प्रतिनिधी तयार नव्हते. तिथे आलेल्या अनेक सामाजिक संघटनांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यामुळे निदान माध्यमातून त्याची चर्चा सुरू झाली. जागतिक स्तरावरील या सर्व मंथनाला फार मोठा आधार होता, तो डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आणि त्यांनी या विषयावर लिहिलेल्या विविध ग्रंथांचा. लाहोरमधील जातपात तोडक मंडळासाठी त्यांनी लिहिलेले भाषण तिथल्या संयोजकांनी नाकारले. त्यानंतर बाबासाहेबांनी या भाषणाचे पुस्तक केले, जे आज ‘जातीचे निर्मूलन’ या रूपात आपल्यासमोर आहे. याशिवाय, ‘कास्ट इन इंडिया’यांसारखे अतिशय मूलभूत असे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिले .

आर्थिक आणि सामाजिक विषयावरील बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आज जगातील विविध विद्यापीठांच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. तिचा उपयोग विविध देशांतील अभ्यासक, संशोधक आणि विद्वान करत आहेत, त्यावर लिहीत आहेत, बोलत आहेत. बाबासाहेबांच्या लेखनातील आणि विचारातील जागतिक परिप्रेक्ष्य अगदी आरंभीच्या काळापासून आपल्याला दिसतो. विशेषत: अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि त्यानंतर इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन संस्थांमधील बाबासाहेबांचे अध्ययन आणि संशोधन यांमुळे सामाजिक संघर्षासाठी लागणाऱ्या वैचारिक दृष्टिकोनाला एक नवा पैलू लाभला. बाबासाहेबांचा कोलंबिया विद्यापीठातील तीन वर्षांचा अध्ययन कालखंड म्हणजे ज्ञानसाधनेचा महान असा अध्याय आहे. या काळात बाबासाहेब ग्रंथलेखन करत होते, तेथील ग्रंथालयामध्ये अखंड अध्ययन करत होते. त्यांच्या या ज्ञानपिपासू विद्यार्थी अवस्थेकडे तेथील जगद्विख्यात प्राध्यापक जाॅन ड्युई फार कौतुकाने पाहत होते. शिक्षण व लोकशाहीचा सिद्धांत मांडणारे प्रोफेसर ड्युई आणि प्रोफेसर एडवीन सेलिन्गमन यांचे ते आवडते विद्यार्थी होते.

या दोन्ही प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी आपले संशोधन, अध्ययन पूर्ण केले. प्रोफेसर ड्युई यांची व्याख्याने आणि मार्गदर्शनातून बाबासाहेबांचे लोकशाहीविषयक मूलभूत चिंतन होत होते. केवळ मतांचा अधिकार दिल्याने लोकशाही यशस्वी होणार नाही, तर त्यासाठी मूलत: शिक्षण आणि जागरूक नागरिक व त्यांच्या संघटना या गोष्टी आवश्यक आहेत, हे प्रोफेसर डुई अधोरेखित करीत होते. बाबासाहेबांच्या एकूण विचारांवर याचा मोठा ठसा आपल्याला दिसतो. विशेष म्हणजे, प्रो. ड्युई यांच्या विचारांचे आपण ऋणी असल्याचे जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी लिहिलेल्या भाषणातही त्यांनी नमूद केले होते. बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या आत्मप्रतिष्ठेबाबत जी भूमिका पुढील काळात सातत्याने मांडली, त्याचे बीजारोपणही कोलंबिया विद्यापीठातील अभ्यासात झाले होते. आज प्रोफेसर ड्युई यांच्यासंदर्भात काही अभ्यास केंद्रे अमेरिका आणि अन्य देशात उभी राहिली आहेत. त्या निमित्ताने पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचारांचे आणि भारतीय राज्यघटनेसाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान असे मंथन सर्वत्र सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज सेंटरने टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापक स्कॉट स्ट्राऊड यांच्या सहकार्याने प्रोफेसर जॉन ड्युई स्टडीज सेंटर सुरू केले आहे. या केंद्रासाठी प्रोफेसर स्ट्रॉऊड यांनी जॉन ड्युई यांची ग्रंथसंपदा दिली आहे.

कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्ही संस्थांनी बाबासाहेबांचे स्मरण जागते ठेवले आहे. कोलंबिया विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात ‘आंबेडकर इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेचे वैचारिक मंथन सुरू ठेवले आहे. सामाजिक न्याय व समतेचा मूलभूत आराखडा तयार करणारे आणि तो ढाचा समोर ठेवून भारतीय राज्यघटना निर्माण करणारे असा गौरव कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये बाबासाहेबांना मानद डी. लिट. देताना केला होता. बाबासाहेबांचे ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बाबासाहेबांचे अपुरे राहिलेले आत्मचरित्र ‘वेटिंग फॉर अ व्हिसा’ हे छोटेखानी पुस्तक या विद्यापीठाने अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी विद्यापीठाने आपल्या ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारापाशी त्यांचा अर्धपुतळा उभारला. त्या ग्रंथालयात येता-जाताना जगभरातील अनेक अभ्यासक बाबासाहेबांच्या प्रेरणेचा एखादा तरी बिंदू आपल्यासोबत घेऊन जातात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब लंडनमध्ये जिथे राहत होते, ते निवासस्थान महाराष्ट्र सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी स्मारकात रूपांतरित केले. गेल्या वर्षी लंडनमधील कायदे शिक्षणातील सर्वोच्च अशा ‘ग्रेज इन’मध्ये डॉ. आंबेडकर दालन उभे करण्यात आले. तेथे बाबासाहेबांचे सुंदर असे तैलचित्र लावण्यात आले आहे. या दालनामध्ये शैक्षणिक प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या ‘ग्रेज इन’मधूनच बाबासाहेबांनी ‘बॅरिस्टर’ ही पदवी घेतली होती.

आधुनिक काळाच्या संदर्भात बुद्ध धम्म स्वीकारून तो विचार पुढे नेणाऱ्या बाबासाहेबांचे स्मरण श्रीलंका, जपान या देशांमधूनही होत असते. दोन्ही देशांमध्ये बुद्धिस्ट सोसायटी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. बाबासाहेब ५ जून १९५० ला कोलंबोला गेले होते. तिथे दिलेल्या भाषणात त्यांनी बुद्ध धम्माचा उदय, प्रसार आणि ऱ्हास याबाबत विवेचन केले होते. जपानमधील कोयासन विद्यापीठातही बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. युरोपीय देशांमध्ये हंगेरीत रोमा नावाच्या जिप्सी समूहाला अस्पृश्यांसारखी वागणूक मिळत होती. काही प्रमाणात भटके असलेले हे समाजवर्ग या विषम वागणुकीने अस्वस्थ झाले होते. त्यांनी भारतात येऊन डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास केला आणि नंतर पुढे शिक्षणानेच मार्ग निघेल, या बाबासाहेबांच्या विचारातून संघटनात्मक काम सुरू केले. हंगेरीमध्ये स्थापन झालेल्या ‘भीम नेटवर्क’ने तेथे तीन हायस्कूल सुरू करून त्यांना डॉ. आंबेडकरांचे नाव दिले आहे. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांनीही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीसाठी बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला होता. १४ एप्रिल २०१६ पासून दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांना आदरांजली अर्पण केली जाते.

बाबासाहेबांचे मूळ ग्रंथलेखन इंग्रजीत असल्यामुळे त्यावर अमेरिका आणि पाश्चात्त्य जगतात मोठ्या प्रमाणात संशोधन व चर्चा सुरू असते. अमेरिकेतील तरुण अभ्यासक सूरज येंगडे हे बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेवर तसेच दलितांच्या समकालीन प्रश्नांवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून लिहीत असतात. आज अनेक देशांत, विविध छोट्या-मोठ्या समूहांमध्ये अन्यायामुळे त्रस्त झालेले कितीतरी वर्ग आहेत. अशा सर्वहारा वर्गांसाठी बाबासाहेब नेहमीच दीपस्तंभ ठरले आहेत. तथापि, बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सामाजिक-आर्थिक लोकशाही अजूनही प्रस्थापित झालेली नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मरण करताना पुन्हा एकदा सर्वांनी त्यासाठी वचनबद्ध होण्याची गरज आहे. अलीकडे बाबासाहेबांच्या ज्ञानसाधनेचा हा वैश्विक पैसही आणखी विस्तारतो आहे. त्यांचा हाच ज्ञानमार्ग भारताला सर्वार्थाने समर्थ करेल, यात शंका नाही.

अरुण खोरे arunkhore @hotmail.com संपर्क : 9284177800

बातम्या आणखी आहेत...