आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं:भटक्या जमातीच्या जीवन प्रणालीचे भावविश्व अधोरेखित करणारा ग्रंथ

डॉ. सर्जेराव पद्माकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरुवातीला दलित साहित्याचा एक भाग म्हणून आपले लेखन करणारा मात्र दलितापेक्षा अनेक बाबतीत कमी अधिक प्रमाणात आपले वेगळेपण,जीवनानुभव व वैशिष्ट्ये असणारा भटका समाजसमूह नव्वदीनंतर आपले स्वतंत्रपणे भटके-विमुक्त साहित्य या नामाभिदानाने वावरु लागल्याचे दिसून येते. याच भटक्या विमुक्त जातीतील दोन स्त्रियांच्या आत्मकथनावर संशोधनात्मक मांडणी करणारा डॉ. सतेज दणाणे यांचा ग्रंथ म्हणजे 'भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने' हा होय.

मराठी वाङमयाच्या परिघामध्ये अनेक वाड.मयीन प्रवाह स्थिरावल्याचे निदर्शनास येते. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामुळे झालेल्या जाणीव जागृतीचा परिणाम म्हणून याकडे पाहावे लागते. फुले शाहू आंबेडकरांनी या शिक्षणाद्वारे बहुजनांमध्ये निर्माण केलेली ही आत्मजागृती, सन्मानाची ओळख बहुसंख्य लोकांच्या विकासाचे सूत्र ठरलेली आहे. हे नव्याने सांगायला नको आणि म्हणूनच माणसांच्या अनेकविध बदलाचा विचार करता साठोत्तरी वाड.मयीन प्रवाहमध्ये झालेला अमूल्य बदल.दलित,आदिवासी स्त्रिया भटके इ.जाती जमाती मधून लिहिती झालेली नवलेखक, कवीमंडळी यांच्याद्वारे मानव्यवादी विचारसरणीची मांडणी साहित्यातून होताना दिसते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा शिरोधार्य मानून "दलितसाहित्य' हा वाड.मय प्रवाह मराठी वाड.मयाच्या प्रांतांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यात मान्यताप्राप्त म्हणून स्थिरावला.सुरुवातीला याच दलित साहित्याचा एक भाग म्हणून आपले लेखन करणारा मात्र दलितापेक्षा अनेक बाबतीत कमी अधिक प्रमाणात आपले वेगळेपण,जीवनानुभव व वैशिष्ट्ये असणारा भटका समाजसमूह नव्वदीनंतर आपले स्वतंत्रपणे भटके-विमुक्त साहित्य या नामाभिदानाने वावरु लागल्याचे दिसून येते. याच भटक्या विमुक्त जातीतील दोन स्त्रियांच्या आत्मकथनावर संशोधनात्मक मांडणी करणारा डॉ. सतेज दणाणे यांचा ग्रंथ म्हणजे 'भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने' हा होय. हा नुकताच प्रकाशित झाला याविषयी थोडं...

प्रस्तुत ग्रंथामध्ये डॉ. सतेज दणाणे यांनी एकूण चार प्रकरणांमध्ये मांडणी केलेली असून मराठी साहित्यातील आत्मकथनाची पार्श्वभूमी, त्यांचा विकास यांचा सविस्तर आढावा घेऊन, भटक्या जमातीतील,दलित साहित्यातील विविध आत्मकथनांचा संशोधनात्मक आढावा घेतला आहे.साठोत्तरी आत्मचरित्र,आत्मकथनांचा धांडोळा घेताना पुरुष लेखनाबरोबरच संख्येने कमी असेनात पण स्त्रियांच्या आत्मकथनांचा संक्षिप्त आढावा घेऊन भटक्या जमातीतील जनाबाई गि-हे यांच्या 'मरणकळा' आणि विमल मोरे यांच्या 'तीन दगडाची चूल' या दोन आत्मकथनासंबंधी सांक्षेपाने विचारमंथन केले आहे.

"मरणकळा' या जनाबाई गि-हेच्या आत्मकथनातून गोपाळ समाजाची जीवन कहाणी, त्यांचे राहणीमान, सण-समारंभ,भाषा,जातपंचायत, स्रियाविषयी, शिक्षणाविषयी असणारी त्यांची मते,अंधश्रद्धा, गरिबी,दारिद्र्य, होणारी हालअपेष्टा,सततची भटकंती,भुकेसाठी करावी लागणारी चोरी,खावा लागणारा मार इ.स्वभाववैशिष्ट्ये सांगून लेखिकेला शिक्षण घेत असताना करावा लागलेला संघर्ष,भीक मागून शाळा शिकणे.डीएड व नंतर शिक्षिका.शिक्षिकेची नोकरी हा जीवनसंघर्ष डॉ.सतेज दणाणे यांनी अत्यंत तटस्थपणे समीक्षाद्वारे या ग्रंथात मांडलेला आहे.ज्या समाजात मुलींने शिक्षण घेणेच.चुकीचे आणि वाईट मानले जायचे.ज्या समाजाला तीन दिवसांहून जास्त एका ठिकाणी वास्तव करण्याचे नाकारले होते.अशा समाजातील एक मुलगी शिकते व शिक्षिका होते हे उदाहरण समाजमानस,समाजव्यवस्था बदलणारे आहे. हा डॉ.दणाणेंचा निष्कर्ष या ग्रंथाचे महत्त्व पटवून देणारा ठरतो.

'तीन दगडाची चूल' या विमल मोरे यांच्या आत्मकथनाचासुद्धा डाॅ.दणाणे यांनी तटस्थपणे अभ्यास केला आहे. गोंधळी या भटक्या समाजाचे जीवन चित्रं यामध्ये येते.मात्र दोन्ही समाजाचा 'भटकंती'हा स्थायीभाव जरी असला तरी जनाबाई गि-हे यांना शिक्षण घेण्यासाठी जितका संघर्ष करावा लागला आहे. तितका विमल मोरे यांना करावा लागला नाही. कारण मोरे यांचा मोठा भाऊ आणि वहिनी यांचे सहकार्य होते. त्यामुळे या आत्मकथामध्ये गोंधळी समाजाला भोगावे लागणारे दुःख,स्वतःची भटकंती, पालावरचे जीवन, भीक मागणे, अंधश्रद्धा, रूढी-परंपरा,समजुती, गोंधळी समाजातील स्त्रियांचे जीवन इ. अनेक गोष्टी कशा पद्धतीने या ग्रंथात अभिव्यक्त झालेल्या आहेत.याचे अगदी वेचक चित्रण या समीक्षाग्रंथात आलेले आहे.

भटक्या-विमुक्तांच्या संज्ञा संकल्पना,विविध अभ्यासकांची या समाजाविषयी ची मते, साहित्यलेखन इ. संबंधी विस्तृत चर्चा या ग्रंथामध्ये डाॅ.दणाणे करताना दिसतात. उपरोक्त दोन स्रियांच्या आत्मकथनातील विविध गोष्टीमध्ये असणारे साम्य व फरक हे अगदी बारकाव्याने मांडतात. भटक्यांची जीवनप्रणाली विशेष: या दोन्ही समाजातील स्त्रियांचे स्थान, या आत्मकथनातील वर्णनाच्या सहाय्याने डाॅ.दणाणे आपली स्वतंत्र भूमिका मांडताना दिसतात. भटक्यांची स्वत:ची असणारी गुप्तबोली शिवाय अनेक भटक्या जातीजमातीची असणारी मराठेत्तर इतर बोलीचा डॉ.दणाणेंनी घेतलेला संदर्भ विशेष उल्लेखनीय वाटतो.

एकूणच भटक्या-विमुक्तांच्या साहित्य,जीवनप्रणालीविषयीची एक विशेष अभ्यासदृष्टी देणारा हा डॉ.सतेज दणाणेंचा ग्रंथ वाचक त्यांचे स्वागत करतील अशी आशा वाटते.

भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने'

डॉ. सतेज दणाणे,

मंजुळ प्रकाशन.g>, पुणे.

एप्रिल,2021.

पृष्ठे-112, मूल्ये-150/-

संपर्क - 8329812012

बातम्या आणखी आहेत...