आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Dragon Fruit Of Thailand Flourishes In Marathwada Soil, Experiment Of A Farmer In Sengaon Taluka In Hingoli District

दिव्य मराठी विशेष:मराठवाड्याच्या मातीमध्ये बहरले थायलंडचे ड्रॅगन फ्रूट, हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा प्रयोग

मनीष जोशी | अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतात केलेली ड्रॅगन फळपिकाची लागवड. फळबागेतील शेवग्याचे आंतरपीक.
  • शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्नासाठी प्रयोग करावा : रमेश जाधव

सततची नापिकी, कर्जाच्या ओझ्याला कंटाळून राज्यासह विदर्भ, मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, जीवनातील संकटाला सामोरे जात, वेगळी वाट चोखाळत मराठवाड्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाटा देऊन थायलंड येथील ड्रॅगन फळाची यशस्वी लागवड केली. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील गोंधनखेड येथील रमेश जाधव यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. या पिकासोबत त्यांनी सोयाबीन, शेवग्याचे आंतरपीक घेत चांगले उत्पन्न मिळवले. दरम्यान, यावर्षी कोरोनाने सुरू असलेल्या लॉकडाऊनने काही प्रमाणात त्याला फटका बसला.

अशी करा लागवड : 

जाधव सांगतात, या पिकाची लागवड १२ बाय ८, १४ बाय ७ फूट,१० बाय ८ फूट म्हणजे ३ मीटर बाय अडीच मीटर अंतरावर: ५ ते ६ फूट उंच सिमेंट खांब उभारून त्यावर अडीच ते तीन फुटांची रिंग लावावी. मातीचा बेड करून सिमेंट खांबाच्या बाजूंनी चार रोपे लावावी. त्या खांबाच्या आधाराने रोपे वाढतात. रोपे मोठी झाल्यावर त्या रिंगमधून वर काढावी लागतात. या फळाच्या लागवडीसाठी रोप, कलमही वापरता येते. आैरंगाबाद येथे या फळाची कलम,रोप उपलब्ध आहे. ५० रुपये प्रति रोप असा त्याचा दर असतो. या पिकाला एकरी तीन लाख रुपये खर्च येतो. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीनंतर या फळपिकाला सेंद्रिय, शेणखत लागत नाही, रासायनिक खतही वापराची गरज नाही. या फळपिकाच्या झाडावर रसायन फवारणीची आवश्यकता नाही. या पिकाला लागवडीपासून १० ते १२ महिन्यांनंतर पहिला बहार येतो. लागवडीपासून पहिल्या वर्षी एका झाडाला ३ ते ५ किलो फळे लागतात. त्यानंतर प्रत्येक वर्षी ५, १०, २०, ३०, ४०, ५० किलो फळांचे उत्पादन एका झाडापासून मिळते. लागवडीपासून पाचव्या वर्षी एका झाडापासून ४० किलो फळांचे उत्पादन मिळते. वर्षातून जून ते सप्टेंबर या कालावधीत एक वेळ या झाडाला फळे लागतात. या फळांची विक्री पुणे, मुंबई, आैरंगाबाद, जालना येथील बाजारपेठेत करता येते. त्याचा ठोक भाव : १२० ते १५० रुपये असतो. फळबागेतील फळांची ठोक विक्रेत्यांना जागेवरच विक्री करता येते. एका फळाचे वजन २०० ते ५५० ग्रॅमपर्यंत असते. एक किलोमध्ये लहान-मोठी मिळून ३ फळे बसतात. या फळबागेचे वय सरासरी २० वर्षे असते

अशी मिळाली प्रेरणा : 

जाधव म्हणाले, थायलंड येथील ड्रॅगन फ्रूटची माहिती वृत्तवाहिनीवरून मिळाली. त्यात आैरंगाबादचे शेतकरी रमेश पोखर्णा यांनी लागवड केलेल्या फळबागेविषयीची माहिती होती. त्याची माहिती कडोळीचे शेतकरी संतोष भादलकर यांच्याकडून कळली. आैरंगाबाद येथील विष्णू पाटील यांनी माहिती देऊन या ड्रॅगन फळबागेसाठी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्नासाठी प्रयोग करावा : रमेश जाधव

शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्नासाठी विविध पिकांचे, फळपिकांचे प्रयोग करावेत. माझ्याकडे ८ एकर शेती आहे. मी जून २०१७ मध्ये एक एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. मत्र २०१८ मध्ये फळबाग सुकली. या भागातील तापमान उन्हाळ्यात ४० अंश सेल्सियसवर जाते. या पिकाला ४० अंश तापमान आवश्यक असते. या पिकाला डाळिंबापेक्षा तिप्पट कमी पाणी लागते. माझ्याकडील शेतजमीन काळी आहे. मात्र, या पिकासाठी जमीन खडकाळ असली तरी चालते. शेतातील तापमान कमी होण्यास आंतरपीक शेवग्याची झाडे लावली. शेताच्या चारही बाजूंनी तारी/गजरा गवत लावले. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची सोय झाली, शेतातील तापमान कमी झाल्याने २०१९ मध्ये झाडाला चांगली फळे लागली.

यापूर्वी घेत होतो पारंपरिक पिके : 

ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीपूर्वी मी वर्षातून दोन पिके घेत होतो. त्यात होते सोयाबीन, हरभरा. त्यात एकरी ८ पोती सोयाबीन,१० पोती हरभऱ्याचे पीक होत होते. सद्य:स्थितीत या पिकात सोयाबीन, शेवग्याचे आंतरपीक घेत आहे. शेवग्यातून वर्षाला ५० हजारांचे उत्पन्न होते. यावर्षी लॉकडाऊनने नुकसान झाले.