आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • DRDO Launches Anti Covid Drug 2 DG; It Will Be Given To The Patients After Dissolving In Water In The Morning And E

एक्सप्लेनर:‘DRDO’ चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ लाँच, जाणून घ्या कोरोनाविरोधी लढाईत हे औषध भारतासाठी का ठरु शकते गेम चेंजर?

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आता हे औषध कोरोना रुग्णांना दिले जाणार आहे.

कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेने देशात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. मात्र देशात लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची देखील कमतरता जाणवत आहे. लसीकरणासोबतच बाजारत एक औषध उपलब्ध झाले आहे. ज्यामुळे कोरोना रुग्णांना बराच दिलासा मिळू शकतो.

डीआरडीओने विकसित केलेले अँटी-कोविड औषध 2 -डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) च्या 10 हजार डोसची पहिली तुकडी सोमवारी आपत्कालीन वापरासाठी बाजारात आणली गेली आहे. आता हे औषध कोरोना रुग्णांना दिले जाणार आहे. हे औषध कोरोना रुग्ण त्वरीत बरे करते आणि ऑक्सिजनवर असणा-या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. हे औषध पावडरच्या स्वरूपात असून एका पॅकेटमध्ये येते. ते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर प्यावे लागते. हे औषध सर्वप्रथम दिल्लीतील डीआरडीओ कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांना दिले जाणार आहे.

हे औषध डीआरडीओच्या पथकाने विकसित केले आहे. संकटाच्या वेळी एक वरदान मानले जाणारे हे औषध तयार करण्यात तीन वैज्ञानिकांचा सहभाग होता. यामध्ये डॉ. सुधीर चंदना, डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. अनिल मिश्रा हे होते.

असे म्हटले जात आहे की, कोरोनावरील उपचारांमध्ये 2-DG हे औषध भारतातील कोरोना रूग्णांसाठी गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते. डीआरडीओने या औषधासंदर्भात 2 दावे केले आहेत आणि हे दोन्हीही खूप महत्त्वाचे आहेत. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, या औषधामुळे रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबून राहणे कमी होईल, तसेच बरे होण्यासाठी त्यांना 2-3 दिवस कमी लागतील, म्हणजे कोविड 19 च्या रुग्णांचा हॉस्पिटलायझेशनचा कालावधी कमी होणार आहे. संपूर्ण देशामध्ये सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्सची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत,हे औषध गेम चेंजर सिद्ध होऊ शकते.

तर जाणून घेऊया डॉ. रेड्डीजच्या या फार्मा कंपनीच्या सहकार्याने तयार झालेले डीआरडीओचे हे औषध कोरोनाविरूद्धच्या लढाईत कशी मदत करू शकते…

 • कोरोनाविरूद्धच्या लढाईत DRDO च्या या औषधाला गेम चेंजर का म्हटले जात आहे?

तिस-या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी दरम्यान, ज्या रुग्णांना निश्चित औषधआंसह DRDOचे 2-deoxy-D-glucose (2-DG) हे औषध दिले गेले, त्यापैकी 42% रुग्णांना तिस-या दिवशी ऑक्सिजनची गरज भासली नाही. आणि ज्या रुग्णांना उपचाराच्या विहित मानकांनुसार म्हणजेच स्टँडर्ड ऑफ केअर (एसओसी) अंतर्गत औषधे दिली गेली, त्यांच्यात हा आकडा 31% होता.

त्याचप्रमाणे, ज्या रुग्णांना 2-DG हे औषध दिले गेले त्यांच्यात Vital Signs म्हणजेच हृदय गती (पल्स रेट), रक्तदाब, ताप आणि श्वासोच्छवासाचे प्रमाण, इतर रुग्णांच्या तुलनेत सरासरी 2.5 दिवसांपूर्वी सामान्य झाले. हे औषध घेतलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या लक्षणांमधे तीव्र घट झाल्याची नोंद झाली. सोबतच या रुग्णांना जास्त काळ रुग्णालयात रहावे लागणार नाही, हेही स्पष्ट झाले. यात 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोरोना रुग्णांमध्ये समान परिणाम आढळले.

या निकालांमुळे डीआरडीओ शास्त्रज्ञ म्हणतात की, या औषधामुळे केवळ ऑक्सिजनवरील अवलंबन कमी होणार नाही तर रुग्णालयातील बेडच्या कमतरतेवरही विजय मिळू शकेल. म्हणूनच 2-DG ला गेम चेंजर म्हटले जात आहे.

 • हे कोरोना औषध कसे कार्य करते? त्याचे वैशिष्ट्य काय आहे?

डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) च्या प्रयोगशाळेत तयार केलेले हे औषध ग्लूकोजचे एक सब्स्टिट्यूट आहे. हे स्ट्रक्चरल ग्लूकोज सारखे आहे, परंतु प्रत्यक्षात ते वेगळे आहे. हे पावडर स्वरूपात आहे आणि पाण्यात विरघळून रूग्णांना दिले जाते.

कोरोना विषाणू त्यांच्या उर्जेसाठी रुग्णाच्या शरीरातून ग्लूकोज घेतात. तर, हे औषध केवळ संक्रमित पेशींमध्येच साठवले जाते. कोरोना विषाणू ग्लूकोज म्हणून हे औषध वापरण्यास सुरवात करतात. अशा प्रकारे, विषाणूंना ऊर्जा मिळणे बंद होते आणि त्यांचे विषाणूजन्य संश्लेषण थांबते. म्हणजेच नवीन व्हायरस तयार होण्याची प्रक्रिया थांबते आणि उर्वरित व्हायरस देखील मरतात.

प्रत्यक्षात हे औषध कर्करोगाच्या उपचारांसाठी तयार केले जात होते. हे केवळ संक्रमित पेशीमध्येच भरले जाते, त्यामुळे त्याच्या गुणधर्मांमुळे हे औषध केवळ कर्करोगाने ग्रस्त पेशी नष्ट करण्याच्या विचाराने तयार केले जात होते. हे औषध कर्करोग ग्रस्त पेशींना कीमोथेरपी देण्याच्या उद्देशाने वापरण्याची तयारी सुरु होती.

 • हे औषध कसे आणि कोणत्या प्रमाणात दिले जाईल?

सामान्य ग्लूकोजप्रमाणे, हे औषधदेखील सॅशे (पाउच) मध्ये पावडर रुपात मिळेल. ते पाण्यात विरघळून रुग्णांना मुखावाटे दिले जाईल. औषधाचा डोस आणि वेळ हे रुग्णाचे वय, वैद्यकीय स्थिती इत्यादींचे परीक्षण करून डॉक्टरांकडून निश्चित केले जाईल. डीआरडीओ शास्त्रज्ञांनीही वैद्यकीय सल्ल्याशिवाय किंवा कोरोनाच्या नावावर जास्त प्रमाणात हे औषध न घेण्याचा इशारा दिला आहे.

 • औषधाची किंमत किती असेल?

औषधांच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. डीआरडीओचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सुधीर चंदना म्हणतात की, औषधाची किंमत उत्पादनाच्या पद्धती आणि प्रमाणावर अवलंबून असेल. या प्रोजेक्टचे इंडस्ट्रिअल पार्टनर डॉ. रेड्डीज लॅबला हा निर्णय घ्यायचा आहे. लवकरच किंमत देखील समोर होईल. असे मानले जाते की, औषध जेनेरिक रेणूपासून बनविलेले आहे, म्हणून ते महाग असणार नाही. दुसरीकडे, सूत्रांच्या माहितीनुसार, या औषधाच्या एका सॅशेची किंमत 500-600 रुपये असू शकते. सरकार यात काही अनुदानाची घोषणा देखील करू शकते, असा विश्वास आहे.

 • आवश्यकतेनुसार हे औषध उपलब्ध आहे का?

कोरोनाचे हे औषध 2-DG जेनेरिक रेणूपासून बनवलेले आहे, म्हणजे अशा रसायनापासून बनवले आहे जे जेनेरिक आहे. म्हणजेच, याच्या मुळ रसायनावर विकसित करणा-या कंपनीच्या पेटंटची मुदत कायदेशीररित्या संपली आहे. जेनेरिक औषधांमध्ये मुळ ब्रँडेड औषधासारखे सर्व गुणधर्म असतात. पण त्यांचे पॅकेजिंग, तयार करण्याची प्रक्रिया, रंग, चव इत्यादी भिन्न असू शकतात. बर्‍याच देशांमध्ये मुळ औषध विकसित करणार्‍या कंपनीला 20 वर्षांसाठी पेटंट मिळते. म्हणजेच, या काळात कोणीही त्या कंपनीच्या परवान्याशिवाय औषध बनवू शकत नाही. त्या बदल्यात त्यांना औषध विकसित करणा-या कंपनीला एक मोठी रक्कम द्यावी लागते. जेनेरिक असल्याने, हे औषध कमी किंमतीत भरपूर प्रमाणात बनवता येते.

 • 2-डीजी औषध तयार करण्यासाठी कच्चा माल भारतात उपलब्ध आहे की तो आयात करावा लागेल?

हे औषध ग्लूकोज अ‍ॅनालॉग आहे, म्हणजे हे एक ग्लूकोज आहे जे नैसर्गिकरित्या मिळणा-या ग्लुकोजसारखे असते, परंतु हे कृत्रिम मार्गाने तयार केले गेले आहे. याचे उत्पादन करणे देखील सोपे आहे. डीआरडीओच्या या प्रोजेक्टचे डायरेक्टर डॉ. सुधीर चंदना यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, कच्च्या मालाच्या उपलब्धतेत कोणतीही अडचण नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हे औषध व्यावसायिकदृष्ट्या बनविणार्‍या डॉ. रेड्डीज लॅबकडे पुरेसा कच्चा माल आहे.

 • गंभीर रुग्णांसाठी हे औषध महत्त्वाची कामगिरी बजावेल का?

प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सुधीर चंदना यांच्या म्हणण्यानुसार, सौम्य, मध्यम आणि तीव्र असे तिन्ही लक्षण असलेल्या रूग्णांवर 2-डीजीची चाचणी घेण्यात आली. सर्व प्रकारच्या रूग्णांना याचा फायदा झाला व त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. म्हणूनच, हे एक सुरक्षित औषध आहे. दुस-या टप्प्यातील चाचणीत रुग्ण बरे होण्याचा दर चांगला होता आणि तिस-या टप्प्यातील चाचणीत रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबून राहणे यात लक्षणीय प्रमाणात घट बघायला मिळाली.

 • हे औषध बाजारात कधीपर्यंत उपलब्ध होईल?

डीआरडीओने डॉ. रेड्डीज लॅबला या प्रोजेक्टमध्ये आपला इंडस्ट्रियल भागीदार बनवले आहे. डीआरडीओचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सुधीर म्हणतात की, डीआरडीओ डॉ. रेड्डीज लॅबच्या सहाय्याने वेगाने उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहे. आज दहा हजार डोसची पहिली तुकडी बाजारात आणली गेली आहे. सध्या हे औषध डीआरडीओच्या दिल्लीतील कोविड सेंटरच्या रुग्णांना देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...