आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इये बोलिचिये नगरी...:एक तरी अक्षर गिरवावे...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अच्युत पालव

सुलेखन ही साहित्यिक, वाङमयीन, पाैराणिक संदर्भ अभ्यास, आख्यायिकांच्या प्रकटीकरणातून शब्दांचे साैंदर्य वाढवणारी अनुपम्य अशी कला आहे. अक्षरं किंवा शब्द हे लिहिण्यापुरतीच मर्यादित नसून त्यातून भावाेत्कटता प्रवाहित हाेणे अपेक्षित असते. मराठी भाषेचे अभिजात साैंदर्य टिकवण्यासाठी सुलेखनातून अक्षर गिरवण्याच्या संस्काराची गरज आहे, असे मत प्रख्यात सुलेखनकार, कॅलिग्राफर अच्युत पालव यांनी व्यक्त केले. मराठी भाषा दिनानिमित्त पालव यांनी भाषा विकास आणि त्यातील साैंदर्य, त्यातील भावार्थ, तंत्रज्ञानाचा वापर, अक्षर आेळख, साहित्य, वाङमयीन अंग आदींवर भाष्य केले.

सुलेखन करतांना, मांडतांना त्या साहित्य कृतीचा अभ्यासही लागतो. जो त्या साहित्य कृतीचा मतीत अर्थ आपल्याला अपेक्षित असतो. त्याचवेळी समोरच्या माणसाला दाद ही देत असतो.आमचे गुरुवर्य र.कृ.जोशी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेंव्हा त्यांनी मर्ढेकरांची कविता लिहिली होती. " एक तुतारी द्या मज आणूनी' मर्ढेकरांच्या कवितांचा कार्यक्रम तो होता. विजया राजाध्यक्ष अध्यक्ष होत्या. तेंव्हा कळाले की अक्षरे ही केवळ लिहिण्यापुरती नाही. एक साहित्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. ही दृष्टी बदलली पाहिजे. हेच मी विद्यार्थ्यांना सांगत असतो. दृष्टी बदलली तरच तो भाव लेखनात येतो. ते सुलेखन अधिक सुंदर होते. ज्ञानेश्वर तुकाराम, रामदास यांचे विषय मी जेंव्हा केले तेंंव्हा प्रथम त्यांच्या विषयी वाचन केले. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य समजून घेतले. जेंव्हा मोडी लिपी लोकांसमोर गेली तेंव्हा लोकांनी म्हटलं की अच्युत पालवने काही तरी चांगलं, उत्तम दिलं आहे. एकमेकांना समजून घेण्याची भावना आली की ती अक्षरांमध्येही आणि सुलेखनातही येते. केवळ सुंदर लिहिणे ही माझी भावना नाही. आशयाला हात घालता आला पाहिजे. मराठी देवनागरीत जे बदल होत आहेत त्या विषयी सांगायच झालं तर नवनवीन प्रयोग करण्यापेक्षा लोक काम करत आहेत. प्रयोग करण्यासाठी धाडसी वृत्ती लागते ती लोकांमध्ये नाही. प्रयोग केला आणि कागदावर उतरवला. त्यापेक्षा साहित्य,अक्षरं टिकली पाहिजे. ती मनात रुजली पाहिजेत. लोक शब्दांच्या आशयाकडे लक्ष देत नाहीत. हे मी नेहमी माझ्या मित्रांनाही सांगतो की फक्त लिहू नका आशयाकडे देखील लक्ष द्या. मी नाशिकला एक वर्कशॉप घेतला होता. ज्यात वि.वि.शिरवाडकरांच्या कविता घेतल्या . सगळ्या मुलांनी लिहायला सुरुवात केली. त्यावेळी चंद्रमोहन आमच्याकडे आले होते. चित्रकार चंद्रमोहन यांनी शब्द, कविता आणि चित्र वाचायला शिका, कविता ही प्रथम वाचता यायला हवी. ती नुसती वाचून उपयोग नाही त्याचा भावार्थ समजला पाहिजे. त्यातून जो भावार्थ येतो तो निर्माण केला पाहिजे अशी मांडणी केली. तो भावार्थ मला वाटतं सुलेखनकाराने केला पाहिजे. जसं ग्रेस यांच्या कवितांना ह्दयनाथ मंगेशकर यांनी लावलेल्या चाली लता मंगेशकर गातात आणि लोकांना

भावतात, नांदतात, लोकांना रुजतात. त्याप्रमाणे जगातील सर्व सुलेखनकारांनी त्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. अलिकडे मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. याकडे तरुण आणि नवोदित पिढी कशी पाहते असे विचारालं, तर तरुणांमध्ये सुलेखनाविषयी गांभीर्य नाही. सगळ्यांचा दृष्टीकोन हा तात्पुरता आहे. आज मी जेंव्हा सांगतो की पाया पक्का होण्यासाठी मी बेसिक दहा वर्ष कॅलिग्राफीची प्रॅक्टीस केली आहे. तेंव्हा ते म्हणतात दहा दिवस नाही, पाच-दहा तासातंच शिकवा. मी र.कृ. जोशी, अशोक केळकर, ल.ह. खरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी प्रबंध लिहिला होता. आज लोकांना अस वाटतं की, मोडी ही पटकन लिहिता येते. त्यासाठी जुनी पत्रं, लेखन हे नव्या लोकांसाठी खुलं केलं पाहिजे. ज्ञानदेव कालीन, रामदासांचे हस्ताक्षर, पेशवेकालीन या हस्ताक्षरातील फरक जेंव्हा डोळ्याने लोकांना दिसतील तेंव्हा त्यांना सुलेखन काय हे कळेल. आताची पिढी या विषयी गांभीर्याने पाहत नाही. कॅलिग्राफी, वाचन यांचा संबंध जोडाल तर वाचल्याशिवाय लिहिता येत नाही. चांगलं लिहिण्यासाठी चांगलं वाचावं लागेल. त्यावर चर्चा केली पाहिजे. ग्रेस, ना.धो.महानोर, मर्ढेकर हे सुलेखनकाराला माहितीच नसतात. पण एक्सक्लुसिव्ह कॅलिग्राफीचा जो भाग आहे, तो भाग करण्याकरिता तुम्हाला वाचलंच पाहिजे. कारण मराठी लिहून काढणं म्हणजे सुलेखन नाही. आता बरेच लेखक, कवी चांगलं लिहित असतात. प्रत्येकाचे साहित्य वाचकांपर्यंत जातेच असे नाही. काहींकडे खूप चांगलं साहित्य असते. बोली भाषेचे तर महत्व खुपच वाढतयं. त्याचाही विचार व्हावा. अक्षराकडे साहित्य म्हणून पहा. राज्य आणि केंद्र सरकारने सुलेखनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्या त्या भाषेचे म्युझियम व्हायला हवेत. देवनागरीबरोबरच अशा कित्येक भाषा आहेत ज्यांची माहिती मिळवताना जीव जातो. अनेक बाहेरचे अभ्यासक आपल्याकडे येऊन अभ्यास करत असतात. भाषेचे म्युझियम आपल्याकडे झाले पाहिजे. मराठीसह, पंजाबी, गुजराती भाषेचे म्युझिम व्हावे. भाषा टिकण्यासाठी, भाषेची समृद्धी वाढिवण्यासाठी लोकांपर्यंत पोहचवलं पाहिजे. र.कृ. जोशींचे दालन व्हायला हवे होते. त्यांनी सुलेखनात खूप काम केलं आहे. त्याची नाेंद व्हायला हवी होती असं नेहमी वाटतं. अभ्यास केला इथपर्यंत ठीक आहे. पण इतिहासातील घटना, नवीन गोष्टी समोर आणण्यासाठी तो वाचला पाहिजे. पण ते करणार कोण? ही वृत्ती बदलली पाहिजे. आपण खूप सांस्कृतिक आहोत पण ती संस्कृती लोकांपर्यंत पोहचली पण पाहिजे ना! तर मग नाही रुजली तर विकास होत नाही असे आपणच म्हणतो. त्यासाठी नुसत्या समिती असून चालणार नाही. लोकांपर्यंत किती पोहचतं याची दखल कुणीतरी घ्यायला हवी होती. भाषेच्या विकासासाठी आपल्याकडचे राजकारण फार वेगळे आहे. शाळा-महाविद्यालय स्तरावर भाषेचा विकास होण्यासाठी जहांगिर आर्ट गॅलरी, चित्रकला प्रदर्शन याला किती लोक जातात. कला दालनांची संख्या वाढवली पाहिजे,त्यांना आदर मिळाला पाहिजे. वर्षातून एक पुरस्कार देणे म्हणजे भाषेचा विकास नव्हे... याबाबत रशियातील एक अनुभव सांगतो. रशियाच्या अध्यक्षांनी सर्व सुलेखनकारांना बोलवलं. तुम्ही आमच्या मुलांशी संवाद साधा, हाताने लिहिणे, वाचणे किती महत्त्वाचे आहे ते सांगा असे आ‌वाहान त्यांनी केले होते. खरं सांगतो रांगाच्या रांगा लागल्या होत्या.

संमेलना घेणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा मराठी साहित्य संमेलनात चित्राला साहित्य म्हणून का समजत नाही हेच कळत नाही. मुखपृष्ठाची, आतील चित्रांची पुस्तकात गरज लागते. आपल्याकडे त्या अंगाने बघितलेच जात नाही. चित्रकाराला कायम शेवटचे स्थान. सुभाष अवचट यांनी मुखपृष्ठासंबंधी खुप मोठं काम करून ठेवलं आहे. त्यांना साहित्यिक का म्हणून नये? आपला देश सोडून सुलेखनकारांना बाहेरच्या देशात अधिक मान-सन्मान आहे. प्रत्येक कलेचा आदर करता आला पाहिजे. शाळेत टॅब वाटले जातात. चित्रकलेचा विषय बाजूला होतो आहे. मग लेखन संस्कृती वाढणार कशी? तंत्रज्ञान शिकवा पण तंत्रज्ञान म्हणजे अभ्यास, विकास नाही. विकासाला मुळ मानसिक जोड विकसित झाली पाहिजे. पण थेट तंत्रज्ञान दिलं तर मुलं विसरून जातील. भाषा व्यावसायिक होण्यापेक्षाही सक्षम व्हावी आयुष्य म्हणजे करिअर आहे. कोणतीही गोष्ट विकायची झाली तर ती शांतपणे अभ्यास करुन केली पाहिजे. तसंच भाषेचही आहे. कोल्हटकरांच्या कवितांची मध्यंतरी पुस्तक झाली. शब्द मोठे होण्यासाठी ती पुस्तक घराघरात लागायला हवी होती. ते एखाद्या गीताकाराने, चित्रकाराने काढले असते तर त्याची व्याप्ती वाढते. व्यापारीकरणापेक्षा त्यातील सक्षमीकरण सजून घ्यायला हवे. गीतकार, संगीतकार, चित्रकार, नृत्यकार यांच्याशी बोलल्यानंतर भाषा बदलत असते. कॅलिग्राफी माझी भाषा आहे. मी आज ४० वर्ष झाली काम करतो आहे. "एक एक अक्षर होऊन गिरवावें! एक एक अक्षर होऊनी उरावें !!' असं माझ्या फेसबुकवर वॉलवर आहे. स्वत:ची चुक समजून घेण्यासाठी पाटीवरच परत एकदा लिहिल पाहिजे. सर्व भाषा राजभाषेप्रमाणे साहित्यसंमेलन आले की बेळगावचा विषय, मराठी दिन आला की राजभाषा विषय पुन्हा पुन्हा येतच असतात. भाषेला भाषेसारखं राहू दे. दर्जा देऊन आणखी काही वेगळे करणार आहोत का? आपण मनात ठरवलं पाहिजे ही आपली राजभाषा आहे. कोणाविषयी तक्रार नाही. माझ्यामते माझी देवनागरी जगातील मोठ्या सहा लोकांमध्ये सूर्याप्रमाणे तळपते आहे. यापेक्षा आणखी काय हवं.

(लेखकाचा संपर्क - ९८२११६३१४१ designs.resonance@gmail.comdesigns.resonance@gmail.c om

शब्दांकन - विद्या गावंड

बातम्या आणखी आहेत...