आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:बुद्धिबळासाठी नववीतच शाळा सोडली, आता एक अब्ज डॉलरचा व्यवसाय उभा करण्यात त्याचा उपयोगच झाला : निखिल कामत

स्कंद विवेक धर | बंगळुरू, भोपाळ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युनिकॉर्न स्टार्टअप उभे करणाऱ्या निखिल यांनी 16 वर्षांखालील गटात केले आहे देशाचे प्रतिनिधित्व

आपल्या देशातील बहुतांश स्टार्टअप आयआयटी आणि आयआयएममधून उत्तीर्ण झालेल्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांनीच उभे केले आहेत. मात्र, अलीकडेच हुरूनच्या यादीत स्थान मिळवणारे आणि एक अब्ज डॉलरचे मूल्यांकन मिळवलेले एक स्टार्टअप असे आहे, ज्याचे सहसंस्थापक ‘स्कूल ड्राॅपआऊट’ आहेत. ‘जिरोधा’ या डिस्काउंट ब्रोकरेज फर्मबाबत आपण चर्चा करत आहोत. त्याचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी व्यावसायिक बुद्धिबळासाठी नववीतच शिक्षण सोडून दिले होते. निखिल सांगतात की, औपचारिक शिक्षण नसणे ही माझी कमकुवत बाजू ठरली नाही, उलट बुद्धिबळामुळे शेअर बाजारात खूप फायदा झाला. निखिल यांनी मोठा भाऊ नितीन यांच्यासोबत २०११ मध्ये ‘जिरोधा’ची सुरुवात केली होती. दहा वर्षांपेक्षा कमी काळात ‘जिरोधा’ देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म ठरली आहे. अर्थात, निखिल तिला एक ‘फिनटेक कंपनी’ असे संबोधतात.

‘दैनिक भास्कर’शी संवाद साधताना निखिल म्हणाले- ‘बालपणापासूनच मला बुद्धिबळाचा छंद होता. लवकरच मी व्यावसायिक बुद्धिबळ खेळू लागलो. वर्ष २००२ मध्ये १६ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. बुद्धिबळात करिअर करण्यासाठी शिक्षण सोडले होते, त्यामुळे बँक अधिकारी असलेल्या माझ्या आईवडिलांची कुठलीच तक्रार नव्हती. औपचारिक शिक्षणाचे एक महत्त्व आहेच, ते नाकारता येऊ शकत नाही. पण शाळा सोडल्याने माझ्यात एक बदल झाला, तो म्हणजे जे विषय मला आ‌वडत होते त्या विषयांचे माझे वाचन वाढले. मित्र शाळेत जात होते, ते पाहून मलाही शिकण्याची इच्छा होत होती आणि बहुधा त्यामुळेच मी अनेक पुस्तकांचे वाचन केले. बुद्धिबळ खेळत असतानाच अत्यंत कमी वयात मी आणि नितीनने शेअर बाजारात ट्रेडिंग करणे सुरू केले होते. हळूहळू आमचे ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप वाढले आणि आपण खूप जास्त ब्रोकरेज आपल्या ब्रोकरला देत आहोत याची जाणीव झाली. जे ब्रोकरेज आम्ही देत होतो ते वाचवणे हाच जिरोधा सुरू करण्याचा सुरुवातीचा उद्देश होता.’

शेअर बाजार हाच आपल्या आवडीचा व्यवसाय असल्याचे सांगताना निखिल कामत म्हणाले की, शेअर बाजाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी कुठल्याही पदवीची गरज नसते. ट्रेडिंग करण्यासाठी कुठल्याही परवान्याची गरज भासत नाही. तसेच शेअर बाजारात व्यवसाय करण्यासाठी खूप मोठ्या पायाभूत सुविधांचीही गरज भासत नाही.

बुद्धिबळाप्रमाणे शेअर बाजारातही स्मरणशक्ती गरजेची, दोन्हीत अनेक साम्यस्थळे

कामत म्हणाले की, बुद्धिबळ आणि शेअर बाजार यात खूप साम्य आहे. बहुधा बुद्धिबळाचा एक चांगला खेळाडू असल्यामुळेच मी शेअर बाजारातही चांगली कामगिरी करू शकलो. बुद्धिबळात बुद्धिमत्तेपेक्षा स्मरणशक्ती आवश्यक असते. तुम्हाला काही चाली लक्षात ठेवाव्या लागतात. काही तत्त्वांचे अनुसरण करावे लागते. शेअर बाजारातही असेच असते. हे ‘लेव्हल प्लेइंग फील्ड’ आहे.

बातम्या आणखी आहेत...